लग्नाचं विचारून आपण खूप मोठी चूक केली अस बाबूला वाटू लागला , त्याला पुन्हा बायडा च्या सामोर जायची पण हिम्मत होईना .
पण बायडा जेव्हा केव्हा त्याच्या समोर येई ती मात्र त्याच्या कडे एकटक रोखून पाही.
अशोक ने पुन्हा बाबुला बायडाच्या बाबतीत काही विचारल नाही, बाबू चा चेहरा बघून अशोक ला देखील खूप वाईट वाटत असे , पण बाबुला कितीही समजावलं तरी तो काही त्याच्या मनातून ते काढून टाकायला तयार न्हवता…
पाहता पाहता नववीच वर्ष संपल आणि बाबू दहावीत गेला, त्याच्या काही महिन्यातच दादांना म्हणजे बाबूच्या वडिलांना एका एकी कामावरून काढून टाकल , कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आता नकळत पण बाबू वर येऊन पडली.
दादा छोटीमोठी नोकरी बघत होते , पण पहिल्या सारखी मिळकत त्यांना भेटत न्हवती, बाबूने शाळा सोडली आणि त्याने कामावर जायचा निर्णय घेतला .
खूप शोधाशोध केल्यावर त्याला कळल कि एका सुताराच्या हाताखाली काम आहे , सुरुवातीला थोडे कमी पैसे मिळतील पण काम शिकल्यावर काम बघून पैसे वाढतील , बाबू तयार झाला , रोज सकाळी ९ ते रात्री ९ तू सुताराच्या हाताखाली काम करायला जाऊ लागला .
त्याची आणि बायडाची कामावर जायची वेळ हि एकच होती , ते दोघ रोज एका ठराविक वळणापर्यंत एका मागोमाग चालत असायचे.
बाबू ने त्या दिवसापासून बायडाकडे बघण देखील सोडून दिल होत , त्याला तिची सतत भीती वाटायची , त्याला वाटायचं कि तिने हि गोष्ट तिच्या घरी आबांना सांगितली असेल आणि आबा कधीही त्याच्या घरी येऊन त्याच नाव त्याच्या घरच्यांना सांगतील , पण बायडा ने मात्र तसे काहीही केले न्हवते , ती त्याच्या कडे रोखून जरी पाहत असली तरी मात्र ती मनातल्या मनात तिला त्याच खूप हसू यायचं,
बाबू सकाळी जेव्हा डोक्या पर्यंत पांघरून घेऊन झोपलेला असायचा तेव्हा ती पाणी भरताना त्याच्या जवळून जायची आणि मुद्दाम तिच्या हंड्यातल पाणी त्याच्या गोधडीवर सांडवायची ती काहीही न बोलता जणू त्याला “ उठ आता कामावर जायचयना तुला” अस म्हणायची ,
सुरुवातीला बाबुला काही कळत न्हवत , हि मुद्दाम पाणी टाकते कि रोज चुकून हिच्या हंड्यातल पाणी आपल्या गोधडीवर पडतंय.
नंतर नंतर त्याला जाग आली तरी तिने उठवल्याशिवाय तो उठत नसे . एक अनामिक ओढ त्या दोघांमध्ये त्याच्याही नकळत सुरु झाली होती,
आणि त्या दिवशी कामावर असेच रोजच्या प्रमाणे पुढे मागे चालत असतानाच बाबूच्या खांद्याला बायडा ने मागून स्पर्श केला , त्या नंतर बाबू काहीही हालचाल न करता तसाच थिजून उभा राहिला , शेवटी तीच त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्याला म्हणाली “ मला ५० रुपय मिळतील का , माझा फगार जाला कि दिन तुला” बाबू ने लगेचच होकार अर्थी मन हलवली आणि मान खाली घालून उभा राहिला.
“मंग , उंद्या त्या उजव्या अंगाला यक इमारत बनतीये तिकड मी थांबण इथे वाटत नको कुट पैस देऊस, उगीच कुणी पाहिलं तर घोळ हुईल”
मंग ये तू , जाती मी “ अस म्हणून बायडा निघून गेली तिच्या वाटेने .
ती गेल्या नंतर बाबू भानावर आला , “ पैसे ते पण ५० रुपये, कुठून आणू, माझ्याकडे तर नाहीत इतके पैसे, काय कराव ती तर उद्या आपली वाट पाहत उभी असेल , काय करू , विचार करतच तो कामावर गेला,”
कामावर गेल्यावर त्याने त्याच्या मालकाकडे पैसे मागितले , मालकाने काही बाबुला पैसे दिले नाही . घरी येऊन देखील बाबू उदयच्या ५० रुपयांच्या विचारात होता आणि त्याला अचानक त्याने त्याच्या पैशांचा डब्बा आठवला ज्याच्यात तो आठवड्याला होणार्या त्याच्या पगारातून २ रुपये बाजूला काढून साठवीत असे , त्याने त्याचे ते साठवलेले पैसे मोजायला घेतले , बाबू कामावर लागून नाही म्हटलं तरी ६ महिने झाले होते त्याच्याकडे आता पर्यंत ४८ रुपये साठले होते आता आणखीन २ रुपये कुठून आणू त्याने आई ला मागितले.
“ आई तुझ्याकडे आता २ रुपये असतील” बाबू ने आईला विचारल.
“ हो आहेत कि , कशाला हवेत रे “ आई ने सहज म्हणून विचारल .
“ अग, हवेत द्यायचेत कुणाला तरी “ बाबू ने उत्तर दिल .
“ २ रुपये कुणाला द्यायचेत “ आई आता त्याच्याकडे पाहत बोलू लागली .
“ २ नाही ५० द्यायचेत माझ्याकडे आता साठवलेले ४८ रुपये आहेत , २ रुपये कमी पडतायेत तेच हवेत
“पण कुणाला द्यायचेत ५० रुपये, आणि मला सांग तू ते साठवलेले पैसे का देतोयस त्यातून तर तुला नवीन कपड्यांचे जोड घ्यायचे होते न ,”
“हो पण मी कपडे घेण्यापेक्षा ह्या पैशांची गरज माझ्याहून अधिक कुणाला तरी आहे “अस म्हणून बाबू ते सर्व पैसे घेऊन वाण्याच्या दुकानात बंदे पैसे आणायला निघून गेला .
दुसर्या दिवशी जरा लौकर उठून आणि सर्व लौकर आटोपून तो तिला भेटायला लगबगीने निघाला , जरा जास्त वेळ आरशासमोर रेंगाळल्या मुळे कि काय बाबू ला नेहमीपेक्षा १० मिनिट उशीर झाला , जवळपास पळत पळत धापा टाकत तो त्या बांधकाम चालू असलेल्या इमारती जवळ पोहोचला बायडा त्याची वाट पाहतच एका डोंगरासारख्या रचलेल्या खडीवर बसली होती .
बाबू ने प्रथमच तिला समोरासमोर पाहिलं होत , तो चालत चालत तिच्या दिशेने येऊ लागताच ती उठून रहिली ,उभी राहत असताना तिने खांद्यावर लपेटून घेतला पदर खाली निसटला आणि तिच्या दंडा जवळ तिचा फाटलेला पोलका त्याच्या दृष्टीस पडला , ते फाटलेल पोलक दिसू नये म्हणूनच तिने तिचा पदर अंगाभोवती लपेटून घेतला होता , त्याने लगेच मान खाली घातली आणि खाली बघतच तो तिच्या दिशेने चालत येऊ लागला , आणि त्याची नजर तिच्या पाऊलांवर गेली , तिच्या पायात चपला न्हवत्या आणि तिच्या डाव्या पाऊलाच्या तळव्याला काहीतरी लागल होत बहुतेक, तिने ते पाऊल एका चिंदी ने बांधल होत आणि ती चिंदी त्या जखमेला लावलेल्या हळदी मुळे पिवळी झाली होती , ती जखम तिच्या कडे चपल्या नसल्यामुळेच झाली असावी.
दोघे एकमेकांसमोर येताच त्याने लगेच खिशातून पैसे काढून तिच्यासमोर धरले , तिने ते पैसे घेतले आणि त्याच्या समोरच तिच्या पोलक्याच्या आत सरकवले , ती गोष्ट त्याला पाठ करून करावी अस तिला नाही वाटल , बहुतेक तिला त्याचा भोळा स्वभाव माहित असावा, हा काही तोंड वर करून आपल्याकडे बघणार नाही , आणि बाबू ने पैसे दिल्या नंतर देखील मान वर करून तिच्या कडे पाहिलं नाही,
“ चल, येती मी “ अस म्हणून बायडा तिची वाट चालू लागली,
आणि बाबू मात्र तसाच तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत तिथेच उभा राहिला, आणि त्याच्या डोक्यात त्यावेळी फक्त आठवडी पगार, एक पोलक आणि एक चपलेचा जोड इतकच होत.
क्रमश:
— निशा राकेश गायकवाड.
Leave a Reply