इ.स. १८०० ते १८२० यादरम्यान इंग्लंड या देशात रेल्वेमार्ग बांधण्याचे आराखडे आखले जात होते. प्रयत्नांना आकार येत गेले आणि १८२५ साली ३८ डब्यांची जगातली पहिली वाफेच्या इंजिनाची प्रवासी रेलगाडी इंग्लंडमध्ये स्टॉकटोन ते डार्लिंग्टन मार्गावर धावली. वाफेच्या इंजिनाचे जनक जॉर्ज स्टीफन्सन यांनी या गाडीचं उद्घाटन केलं. एका नव्या वेगवान युगाचा तो प्रारंभ होता, पण प्रत्यक्षात इंग्लंडमध्ये मात्र रेल्वेच्या विरोधात मोठा गहजब माजला. दैनिकं, मासिकं, सार्वजनिक ठिकाणी झालेली भाषणं, या सर्वांमधून इंग्लंडमध्ये रेल्वे सुरू करण्याच्या कार्यक्रमावर ताशेरे झोडण्यात आले. रेल्वे म्हणजे सावळा गोंधळ आहे. यदाकदाचित, रेल्वेचा प्रवास यशाच्या मार्गाने जाऊ लागला, तर ती समाजाची शुद्ध फसवणूक होईल. व्यक्तिव्यक्तींमधील प्रेमाचे संबंध दुरावतील, बाजाराचे नीती नियम धाब्यावर बसवले जातील व यामुळे सामान्य जनतेचे जीवन विस्कळीत होईल. तशातच, हा प्रयोग जर फसला, तर सर्वसामान्य लोकांचा पैसा पाण्यात जाईल. जंगल, दर्याखोर्यांची शांतता पूर्णपणे भंग पावेल. शेतकऱ्यांचे शांत जीवन उद्ध्वस्त होईल असा त्या साऱ्या विरोधाचा मथितार्थ होता.
गाड्या जात असतानाचा आवाज जे लोक सतत ऐकतील ते बहिरे व वेडे होतील. आजूबाजूच्या शेतातील गाई म्हशींच्या दूध येण्यावर विपरीत परिणाम होतील. यावर उपाय म्हणून संपूर्ण रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना जाड पत्रे लावावे लागतील, असं मत एका जर्मन डॉक्टरनं तेव्हा व्यक्त केलं होतं.
रेल्वे सुरू झाली आणि या नव्या वाहनानं आपल्या गावाला जाण्याचा बेत फ्रेंच राजा लुई फिलिप यानं आखला. राजाचे मंत्रिगण मात्र हा बेत ऐकून घाबरले. त्यांनी आपल्या राजाला रेल्वेप्रवासाची इतकी जबरदस्त भीती घातली, की मंत्रिगणांनी घातलेल्या त्या भीतीचा परिणाम होऊन राजानं रेल्वेप्रवास तत्काळ रद्द केला आणि घोडा गाडीने प्रवास करून ते नियोजित ठिकाण गाठलं.
इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या युरोपियन देशात रेल्वेच्या सुरुवातीच्या दिवसात या अशा काही प्रतिक्रिया उमटल्या होत्या ,यावर आज घडीला आपला विश्वासही बसणार नाही ,पण अशा मोठ्या स्वप्नांच्या , मोठ्या उड्डाणाच्या मुळाशी असा प्रतिकूलतेचा इतिहास वसत असतो हे सत्य जगभर नांदताना दिसतं हेच खरं आहे . आज हीच रेल्वे जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांची जीवनवाहिनी बनलेली आहे .
— डॉ. अविनाश केशव वैद्य
Leave a Reply