एक न्यायमूर्ती होते. अतिशय निःस्पृह व कर्तव्यकठोर म्हणून त्यांची ख्याती होती. खुनाचा आरोप सिद्ध झालेल्या प्रत्येक खुन्याला कोणीतीही दयामाया न दाखविता त्यांनी फाशीची शिक्षा ठोठावली होती. कोणताही खून खटला त्यांच्या न्यायालयात असला की, आरोपीला फाशी होणारच हे जवळजवळ निश्चित झालेले असायचे.
आपल्या कर्तव्यकठोर स्वभावामुळे प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती घरातही तसेच वागायचे. त्यामुळे त्यांच्या मुलाला लहानपणापासून प्रेम मिळाले नाही. त्यामुळे तरुणपणी मुलगा वाईट संगतीने बिघडला. त्याच्याच हातून एकाचा खून झाला व तो खटला चालविण्यासाठी नेमका याच न्यायमूर्ती समोर आला.
एरवी प्रत्येक खुन्याला फाशी देणारे हे न्यायमूर्ती समोर आपला मुलगा आरोपी असल्याचे पाहून कचरले. त्यांची कर्तव्यकठोरता कमी झाली. त्यांचे मुलाविषयीचे ‘ ममत्व’ एकदम जागे झाले. त्यामुळे न्यायदान करताना ते आता बुद्धिवादाची भाषा बोलू लागले.
सध्याच्या काळात फाशीची शिक्षा अमानुष आहे. एकाने दुसऱ्याचा जीव घेतला म्हणून त्याचा पुन्हा आपण जीव घ्यायचा का? अशी भाषा त्यांनी सुरू केली. मात्र मुलानेच त्यांना अडविले. तो म्हणाला, ”माझ्यावरील ममत्वामुळे तुम्ही आता हे बोलत आहात. मात्र खुनाचा गुन्हा मला मान्य आहे. त्यामुळे तुम्ही मला फाशी दिलीच तरच ती योग्य होईल व तुमच्याही न्यायदानास ‘कलंक’ लागणार नाही.
मात्र न्यायमूर्तीना आपल्या मुलाकडून घडलेल्या अपकृत्यात आपणही थोडेफार वाटेकरी आहोत, असे वाटू लागले. त्यांना उपरती झाली, परंतु आता खूप उशीर झाला होता.
आपल्या हातून या खटल्याचा योग्य निकाल लागणार नाही हे ओळखून त्यांनी हा खटला दुसऱ्या न्यायमूर्तीकडे चालवावा, अशी शिफारस केली व आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते न्यायालयातून बाहेर पडले.
Leave a Reply