वेळेत घ्यावी निवृत्ती
नसावी क्रोधाची पुनरावृत्ती
सोडुनी द्यावी आवृत्ती
संस्कार असावे!!
कार्य करुनी जो निघतो
तोचि लक्षात रहातो
जो तेथेचि घुटमळतो
कटकट त्याची
अर्थ–
देवाने आयुष्य दिले ते जगण्यासाठी, जागण्यासाठी नव्हे हे ज्याला कळले तो सुखी होतो. एखादा माणूस मरेपर्यंत झटत राहतो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करत राहतो त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच. पण हे सगळे करत असताना त्याच्या घरच्यांच्या निर्णयक्षमतेला बळकटी आणणे हेही त्याचेच काम असते हे विसरून चालत नाही.
वैराग्य अंगी आणणे महा कठीण पण त्याच्या जवळ जरी जाऊ शकलो तरी खूप मोठा पल्ला गाठला म्हणायला हरकत नाही. परमार्थ करणे फार गरजेचे पण त्यात अडकून किती राहायचे आणि त्याने किती लाख वेळा क्रोधीत व्हायचे? हे कोण ठरवणार? अशाने किंमत शून्य होऊन कर्ता पुरुषावर नाकर्ते पणाचा मुखवटा लावला जातो आणि मग उर्वरित आयुष्य भरलेल्या घरात एकट्याने काढायची नामुष्की ओढवते.
पुस्तकाच्या आवृत्या निघणं म्हणजे वाह वाह होते पण क्रोधाची आणि अहंकाराची आवृत्ती जर आपल्या पुढच्या पिढीत आली तर? अशा वेळी संस्कार होणे महत्त्वाचे, म्हणून बालवयात दासबोध ग्रंथ जर घरोघरी शिकवला गेला तर आवृत्ती सुखाची येईल हो घरा, जणू प्रत्येक दिवस होईल दिवाळी दसरा.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply