ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांचा जन्म १४ सप्टेंबर १९४८ रोजी उत्तर प्रदेशातल्या कानपूर शहरात झाला.
आपल्या वडिलांकडूनच बालपणापासून वीणा सहस्त्रबुद्धे यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. पुढे ज्येष्ठ बंधू काशीनाथ बोडस यांच्याकडूनच त्यांनी शास्त्रीय संगीताचे कठोर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मोठे बंधू काशिनाथ, पं. बलवंतराय भट्ट, पं. वसंत ठक्कर आणि पं. गजाननराव जोशी यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे घेतले. त्यामुळे त्यांची गायनशैली ग्वाल्हेर घराण्याची असली तरी जयपूर, किराणा घराण्याचाही प्रभाव त्यांच्या गाण्यावर होता. १९६८ मध्ये कानपूर विद्यापीठातून शास्त्रीय संगीताची बी.ए. ही पदवी मिळवली. याच विद्यापीठातून त्या संस्कृत आणि इंग्रजी भाषेच्या पदवीधर झाल्या. शास्त्रीय संगीतातील एम.ए. आणि नंतर शास्त्रीय संगीताचे संशोधन करून पीएच.डी. या पदव्याही मिळवल्या होत्या.
ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यांनी आत्मसात केली होती तरीही, जयपूर आणि किराणा घराण्याच्या गायकीचाही त्यांनी अभ्यास केला होता. ही गायकीही त्यांनी आत्मसात केली होती. विवाहानंतरही त्यांनी शास्त्रीय संगीताची साधना निष्ठेने पुढे सुरू ठेवली होती. ख्याल आणि भजन गायनात त्यांचा हातखंडा होता. देश-विदेशात त्यांनी गायनाच्या अनेक मैफिलीही केल्या होत्या.
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळाल्यावरही, आपण परिपूर्ण गायक आहोत, असा अहंकार त्यांनी कधीच बाळगला नाही. दररोज त्या गायनाचा रियाज नियमितपणे करीत असत. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घराण्याच्या शिस्तबद्धतेनेच व्हायला हवे, असा त्यांचा आग्रह होता. त्या स्वत: त्याच शिस्तीने संगीतात प्रवीण झालेल्या होत्या. जयपूर आणि किराणा घराण्याच्या गायकीचा अभ्यास आणि संशोधन करून त्यांनी संगीत क्षेत्रात नवे प्रयोगही केले होते.
१९८५ मध्ये पुण्यातल्या ना. दा. ठाकरसी विद्यापीठात त्या शास्त्रीय संगीताच्या प्राध्यापक झाल्या. याच विद्यापीठात त्या पुढे संगीत विभागाच्या प्रमुखही होत्या. सवाई गंधर्व संगीत स्मृती सोहळ्यात त्यांचे शास्त्रीय गायन म्हणजे, गानरसिकांना पर्वणी वाटत असे. तबलापटू पं. सुरेश तळवलकर आणि रामदास पळसुले, गायक विकास कशाळकर यांच्यासह संगीत क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांना सहस्त्रबुद्धे यांचे मार्गदर्शन सातत्याने मिळत असे. पारंपरिक भजनाचे त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय झाले होते. २०१३ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता.
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ऑल इंडिया रेडिओवर शास्त्रीय संगीताचे गायन करणार्या सहस्त्रबुद्धे यांनी निष्ठेने शास्त्रीय संगीताची सेवा केली. उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. ऑस्ट्रेलिया, युरोप, आखाती देश, तसेच उत्तर अमेरिकेसह विविध देशांत त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले होते. त्यांनी अनेक शिष्य घडविले. त्यामध्ये प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांचा समावेश आहे.
वीणा सहस्त्रबुद्धे यांचे २९ जून २०१६ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply