दीपक शिर्के यांचा जन्म २९ एप्रिल १९५५ रोजी झाला.
दीपक शिर्के यांना आजही लोक अण्णा शेट्टी अथवा गेंडास्वामी या नावानेच ओळखतात. तिरंगा या चित्रपटातील त्यांच्या गेंडास्वामी या भूमिकेच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात खरं तर त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव गुंडास्वामी होते. पण या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या राजकुमार यांनी संवाद म्हणताना गुंडास्वामी असा उल्लेख न करता गेंडास्वामी असा उल्लेख केला. चित्रपटाच्या टीमला हे नाव खूपच आवडले आणि त्यामुळे त्यांच्या पात्राचे नाव गुंडास्वामी ऐवजी गेंडास्वामी ठेवायचे ठरले.
धुमधडाका, थरथराट, झपाटलेला यासारख्या मराठीतील दमदार चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासोबत काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे हरहुन्नरी कलाकार म्हणजे “दीपक शिर्के” होय.
दीपक शिर्के यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकीर्दीमध्ये शिर्के यांनी शंभरहून अधिक हिंदी, मराठी चित्रपट तसेच आणि २५ हुन अधिक मालिका त्यांनी साकारल्या आहेत. अभिनयाचा डिप्लोमा घेतल्यानंतर गोविंद निहलानींच्या ‘आक्रोश’मध्ये शिर्केंना चांगली संधी मिळाली. दूरदर्शन वरील “एक शून्य शून्य” मधील त्यांची भूमिकाही रसिकांच्या तितकीच स्मरणात राहिली आहे. सोनी वाहिनीवरील सी.आय.डी. या मालिकेतदेखील ते झळकले. याच वेळी ते ‘टुरटूर’, ‘माझे काय चुकले’, ‘उडून जा पाखरा’ या नाटकांमध्ये ते चमकले.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या ‘अग्निपथ’ चित्रपटामधील खलनायकी भूमिकेमुळे शिर्कें यांच्या कारकीर्दीला गती मिळाली. ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘घनचक्कर’, ‘धडाकेबाज’, ‘अफलातून’, ‘शेम टू शेम’, ‘अबोली’, ‘रात्र आरंभ’, ‘मराठा बटालियन’, ‘व्हेंटिलेटर’ हे त्यांचे महत्त्वाचे मराठी चित्रपट. ‘तिरंगा’, ‘वंश’, ‘जुडवा’, ‘खुदा गवाह’, ‘जय किशन’, ‘जीत’, ‘काला साम्राज्य’, ‘इश्क’, ‘भाई’, ‘टारझन द वंडर कार’ हे त्यांचे उल्लेखनीय हिंदी चित्रपट.
आपल्या दमदार भूमिकेने गाजवूनही त्यांच्या अभिनयाला आजपर्यंत कुठलाही मोठा पुरस्कार मिळाला नाही. एम एक्स प्लेअरवर दिग्दर्शक सारंग साठे यांच्या ‘पांडू’ या वेबसिरीज मध्ये दीपक शिर्के यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. दीपक शिर्के यांच्या पत्नीचे नाव गार्गी शिर्के आहे. त्या स्वतः सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि पीएच.डी. होल्डर आहेत. अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्या भाषणं द्यायला जातात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply