कुलदीप पवार यांचे आजोबा हे शाहू महाराजांच्या कार्यकाळात वीज वितरण विभागात कार्यरत होते.
त्यांच्या आईचे नाव शांतादेवी आणि वडील वसंतराव पवार. वसंतराव पवार हे मराठी सिने सृष्टीत छोट्या भूमिका साकारत त्यामुळे सहाजिकच अभिनयाची आवड कुलदीप पवार यांच्यातही निर्माण झाली. त्यांचा जन्म १० जून १९४९ रोजी कोल्हापूर येथे झाला. कोल्हापूर येथून शिक्षण घेतल्यानंतर कुलदीप पवार मुंबईत दाखल झाले. तिथे प्रभाकर पणशीकर यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू‘ ह्या नाटकात संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यांची ही भूमिका खूप गाजली देखील.
पुढे बिन कामाचा नवरा, शापित, वजीर, अरे संसार संसार, गुपचूप गुपचूप, वेध, सर्जा, एका पेक्षा एक, गोष्ट धमाल नाम्याची, जाऊ तिथे खाऊ अशा वेगवेगळ्या चित्रपटात त्यांनी अनेक धाटणीच्या भूमिका साकारुन आघाडीच्या नायकांमध्ये आपले नाव कोरले.
रंजना आणि कुलदीप पवार यांनी एकत्रित अनेक चित्रपट साकारले, या जोडीला प्रेक्षकांकडून विशेष पसंती देखील मिळाली. ‘पाहिले न मी तुला…’ गुपचुप गुपचूप चित्रपटातील हे गाणे अभिनेते कुलदीप पवार यांच्यावर चित्रित झाले होते. हे गाणे आजही अनेक रसिकांना नक्कीच गुणगुणावेसे वाटते.
तू तू मै मै, दामिनी, आक्रोश, संसार या छोट्या पडद्यावरील मालिकाही त्यांनी साकारल्या. त्यांच्यातील अभिजात कलागुणांमुळे त्यांनी विनोदी तसेच खलनायकाच्या भूमिकाही तितक्याच नेटाने निभावल्या. पती सगळे उचापती, वीज म्हणाली धरतीला, अश्रूंची झाली फुले ही नाटके त्यांनी रंगमंचावर गाजवली. कुलदीप पवार यांच्या पत्नीचे नाव नीलिमा पवार. नीलिमा पवार या देखील नाट्यक्षेत्रात कार्यरत होत्या.
कुलदीप पवार यांचे २४ मार्च २०१४ रोजी निधन झाले.
Leave a Reply