
निम्मी यांचे नाव नवाब बानू आहे. राजकपूर यांच्या बरसात चित्रपटात त्यांचे निम्मी हे नाव ठेवण्यात आले. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला.मुळात त्यांची बॉलिवूडमधील एंट्री मजेदार होती. त्या लाहोरहून मुंबईत आल्यानंतर सरदार अख्तर आणि महिबूब खान यांच्याकडे राहत होत्या. एकदा राजकपूर जद्दनबाई (नर्गिस यांची आई) यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांना ‘बरसात’ या चित्रपटासाठी हिरोईन हवी होती. बऱ्याच मुली पाहिल्यानंतरही त्यांना हवी तशी हिरोईन मिळत नव्हती. जद्दनबाई कडे आल्यानंतर शेजारी बसलेल्या निम्मी यांच्याकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांनी मेहबूब खान यांच्याजवळ जावून सांगितले, ‘ही मुलगी मला हिरोईन म्हणून हवी आहे’ त्यावेळी निम्मी काही बोलल्या नाहीत. त्यांना त्यांच्या आजी काय म्हणतील याची भीती होती. सरदार अख्तर यांनी त्यांच्या आजीशी संपर्क साधला, विशेष म्हणजे त्यांच्या आजीनेही होकार दिला. त्यानंतर त्यांची स्क्रीन टेस्ट झाली आणि त्या उत्तीर्ण होऊन, त्यांची बरसात चित्रपटासाठी निवड झाली. पन्नाशीच्या दशकात अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या निम्मी यांचे नाव दिलीपकुमारसह अनेकांशी जोडले गेले. पन्नासाव्या दशकात मधुबाला, नर्गिस, नूतन, मीना कुमारी, गीता बाली, सुरैय्या यांच्यासारख्या अभिनेत्रींसोबत काम करताना निम्मी यांनी आपले स्थान वेगळे राखले. बरसात (१९४९), दीदार (१९५१), दाग (१९५२), उडन खटोला (१९५५) मेरे मेहबूब (१९६३), पूजा के फुल, अकाशदीप (१९६५), लव्ह अँड गॉड या चित्रपटातून निम्मी यांनी काम केले. दिलीप कुमार यांच्यासोबतच्या यशस्वी कारकीर्दीमुळे अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. यावेळी दिलीप कुमार यांच्याशी त्यांचे प्रेम असल्याचे वृत्त पसरले होते. अर्थात दिलीप कुमार आणि निम्मी यांनी याचा इन्कार केला. दिलीप कुमार यांचे प्रेम त्यावेळी मधुबाला यांच्यावर होते. निम्मी यांचे प्रेम पटकथालेखक एस. अली रझा यांच्यावर होते. रझा हे विख्यात कथालेखक, पटकथालेखक आगाजानी कश्मिरी यांचे भाचे. दोघेही लखनौ येथील. रझा यांच्याशी लग्न करून त्या मुंबईत स्थायिक झाल्या. महेबूब स्टुडिओ सोडण्यास निम्मी याच कारणीभूत ठरल्या. संपूर्ण आयुष्य तू याच स्टुडिओत राहून आपली कारकीर्द संपविणार आहे का? असा प्रश्न निम्मी यांनी विचारल्यानंतर रझा यांनी हा स्टुडिओ सोडला. निम्मी त्यांच्या लिखाणाच्या फॅन होत्या. आकाशदीप हा त्यांचा शेवटचा चित्रपट. निम्मी आणि त्यांच्या पतींना मूल नव्हते. त्यांना दोनदा अपत्य होऊ शकले नाही. त्यांनी आपल्या बहिणीचा मुलगा दत्तक घेतला. मरताना त्यांच्या बहिणीने त्यांच्याकडून तसे आश्वासन घेतले होते. ४२ वर्षे लग्नानंतर म्हणजे एस. अली रझा यांच्या निधनानंतर त्यांची ताटातूट झाली. जून १९९१ साली निम्मी या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या. हिंदी अभिनेत्री किमी काटकर ही निम्मी यांची मुलगी आहे, अशा अफवा उठल्या होत्या.निम्मी या अत्यंत कमी बोलणाºया अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. बॉलीवूडमधील समारंभ, पार्टीजमध्ये दिलीप कुमार यांच्यासोबत त्या बर्याचवेळा दिसून आल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply