ज्यांच्या शास्त्रीय संगीताने रंगमंच गाभारा आणि सभागृह मंदिर बनत असे अशा उच्च दर्जाची सांगीतिक क्षमता असलेल्या किशोरी आमोणकर या जयपूर अत्रौली घराण्याच्या श्रेष्ठ गायिका. त्यांचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी झाला.
किशोरी आमोणकर या ख्यातनाम गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्या कन्या; मात्र त्यांनी शास्त्रीय संगीत शिकायला प्रारंभ केला तो भेंडी बाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर यांच्या तालमीत. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी मातोश्री मोगुबाईंकडे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. मोगुबाईंचे शिक्षण अल्लादियॉं खॉं साहेबांकडे झाले होते. घराण्याचे गाणे शिकत असताना त्यात किशोरी आमोणकर यांनी प्रयोगशीलता आणली. घराणी वेगवेगळी असली तरी संगीत एकच आहे असे त्या म्हणायच्या. गाण्यामध्ये रस महत्त्वाचा असतो, असे त्या सांगायच्या. साहित्यशास्त्रात रससिद्धांत वापरला जातो. भारताच्या प्राचीन संगीत परंपरेचा वेध घेण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. हे तत्त्व आजच्या काळात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची धडपड होती. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते. घराण्यांच्या रूढ भिंतींना फारसे महत्त्व न देणाऱ्या बुद्धिमती किशोरीताईंनी कालांतराने सर्व घराण्यांच्या गायकीचा अभ्यास केला; आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बंदीशी असोत किंवा ठुमरी गायिकीतला कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. सिनेसंगीतालाही त्यांनी त्याज्य मानले नाही. १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या “गीत गाया पत्थरों ने’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्व गायन केले. चित्रपटसृष्टीत आलेल्या कटू अनुभवांमुळे त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. मुंबईतल्या एलफिस्टन महाविद्यालयात शिकलेल्या किशोरीताईंना मुळात डॉक्टर व्हायचे होते. परंतु त्यात मन रमल्याने त्यांनी शास्त्रीय संगीताला वाहून घेतले. “जाईन विचारीत रानफुला’ हे मराठीतील त्यांचे गीतही स्वरशिल्पाचा नमुना ठरला. त्यांनी ‘स्वरार्थरमणी – राग रससिद्धान्त’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. १९८७ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने; तर २००२ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरवले. तसेच १९८७ साली संगीत सम्राज्ञी पुरस्कार, २००२ साली संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप इ पुरस्कार मा.किशोरी आमोणकर यांना मिळाले होते. शास्त्रीय संगीतात मोलाची कामगिरी बजावताना त्यांनी शिष्यांची फौज तयार केली. माणिक भिडे, नंदिनी बेडेकर, आरती अंकलीकर-टिकेकर, देवकी पंडित आणि रघुनंदन पणशीकर हे त्यातील काही महत्त्वाची शिष्यगण.किशोरी आमोणकर यांचे ३ एप्रिल २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
किशोरी आमोणकर यांचे गायन
अवघा रंग एक झाला.
किशोरी आमोणकर यांची गाजलेली गाणी :
अवघा रंग एक झाला,बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,माझे माहेर पंढरी,हे श्यामसुंदर राजसा,अवचिता परिमळु,कानडा विठ्ठल,अवघा तो शकुन,जनी जाय पाणियासी,जाईन विचारित रानफुला,पडिलें दूरदेशीं,पाहतोसी काय आता पुढे,मी माझें मोहित राहिलें,या पंढरीचे सुख,सोयरा सुखाचा विसांवा
Leave a Reply