एस.एच.बिहारी यांचे पूर्ण नाव शमशूल हुदा बिहारी. आपल्या या रोमँटिक गीतलेखनाने तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे एस. एच. बिहारी यांचा जन्म बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील अरा येथे. लहानपणापासूनच त्यांना भाषेचे प्रचंड वेड. त्या वेडातून त्यांनी हिंदी, उर्दू आणि बंगाली भाषांवर प्रभुत्व मिळवले. पण भाषेइतकेच एस. एच. बिहारी यांना फुटबॉलचेही वेड होते. कोलकात्याच्या मोहन बगानकडून तरुणपणी ते फुटबॉल खेळायचे. फुटबॉल खेळत असताना पायांच्या लयबद्ध हालचालीबरोबरच बिहारी यांच्या मनात शब्दांचा मेळा भरायचा. पुढे या काव्यप्रतिभेला गीतांचा आयाम लाभला आणि एस. एच. बिहारी नामक गीतकार जन्माला आला. पोटापाण्यासाठी मुंबईला आल्यानंतर बिहारी यांनी काही काळ रबराच्या कारखान्यात असिस्टंट मॅनेजर म्हणून काम पाहिले, परंतु गीतलेखनाचे वेड काही स्वस्थ बसू देत नव्हते. त्यातच राजा मेहंदी अली खान यांच्याशी बिहारी यांची मैत्री झाली. खान साहेबांनी त्यांना निर्माते-दिग्दर्शक शशधर मुखर्जी यांच्याकडे पाठवले. मुखर्जींनी बिहारी यांच्याकडे साशंकतेने पाहिले आणि त्यांनी प्रश्न विचारला, ‘क्या बेचते हो?’ या पठ्ठ्याने तत्काळ उत्तर दिले, ‘दिल के टुकडे बेचता हूँ।’ बिहारींच्या उत्तराने मुखर्जी प्रभावित झाले. त्या वेळी मुखर्जी ‘शर्त’ चित्रपट बनवत होते. त्यांनी विनाशर्त ‘शर्त’च्या गीतलेखनाची जबाबदारी बिहारींवर टाकली. ना ये चाँद होगा, मोहब्बत में मेरी तरह, देखो वो चाँद चुपके या त्यांच्या गाण्याला हेमंतकुमार यांच्या संगीताचा साज लाभला आणि ‘शर्त’मुळे एस. एच. बिहारी हे नाव रसिकांच्या कानात रुजले. ‘शर्त’च्या आधी संगीतकार अनिल विश्वास यांनी बिहारी यांना संधी दिली होती. मात्र शर्तमधल्या मधाळ व प्रेमरसयुक्त गाण्यांनी बिहारींना नाव मिळवून दिले. त्यानंतर मात्र बिहारी यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर बिहारी यांच्या गीतांची लय आणि ओपी यांचा ठेका यांचे सूर जुळले आणि रसिकांच्या भेटीला आली रसाळ, रोमँटिक अविस्मरणीय गाणी. काश्मीर की कली, ये रात फिर ना आयेगी, सावन की घटा, मोहब्बत जिंदगी है, किस्मत, प्राण जाए पर वचन ना जाए, एक मुसाफिर एक हसीना आदी चित्रपटांतील गाणी ओपी-बिहारी कॉम्बिनेशनची काही उदाहरणे. त्या वेळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शंकर-जयकिशन या संगीतकाराबरोबरही बिहारींचे सूर चांगले जुळले. कौन है जो सपनों मे आया, कहाँ चल दिये इधर तो आओ, उनसे मिली नजर (झुक गया आसमान) ही काही गाणी. ये चाँद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आँखे, कोई राज है इनमें गहरा… काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्यातही उठून दिसणारी शर्मिला टागोर आणि तिच्या सौंदर्याने भारावलेला शम्मी कपूर. जोडीला ओ. पी. नय्यरचे ठेकेबाज संगीत. या गाण्याने एका पिढीला अक्षरश: वेड लावले. शर्मिला टागोरच्या त्या काळच्या सौंदर्याचे एवढे अचूक आणि लयबद्ध वर्णन करणार्यान या गाण्याचे शब्द होते गीतकार एस.एच.बिहारी यांचे. रोमान्स, इश्क, मोहब्बत या प्रेमाच्या भावनांना शब्दरूपी उपमा आणि अलंकाराने सजवून त्याचे लयबद्ध काव्य तयार करणे, ही मा.बिहारी यांची खासियत होती. इशारो इशारों मे दिल देनेवाले (काश्मीर की कली) मधून येणारा प्रेमाविष्कार ये चाँद सा रोशन चेहरा अशा स्तुतीवर येऊन बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी (एक मुसाफिर एक हसीना) या वळणावर कसा स्थिरावतो, हे बिहारींच्या मधाळ शब्दांत ऐकण्याचा आनंद विरळाच. मै शायद आप के लिए अजनबी हूँ (ये रात फिर ना आयेगी)मधला अनोळखी भाव, किसी ना किसी से कभी ना कभी(काश्मीर की कली)मधला दुर्दम्य आशावाद, जरा होले होले चलो मेरे साजना (सावन की घटा)मधले आर्जव, उनसे मिली नजर के मेरे होश उड गये (झुक गया आसमान)मधली सर्वस्व हरपल्याची भावना, चाहे लाख तूफान आये (प्यार झुकता नही)मधला वज्रनिर्धार, हैरान हूँ आपकी झुल्फों को देखकर (जबाब हम देंगे)मधले कौतुक, चैन से हमको कभी आपने जीने ना दिया (प्राण जाए पर वचन ना जाए)मधला विरक्त भाव, लाखो है यहाँ दिलवाले (किस्मत)मधले नैराश्य, कजरा मोहब्बतवाला अखियों मे किसने डाला (किस्मत)मधला प्रफुल्लित भाव, यही वो जगह है (ये रात फिर ना आयेगी)मधला आठवणींचा धांडोळा, कौन है जो सपनों मे आया (झुक गया आसमान)मधला स्वप्नवाद, तुमसे मिलकर ना जाने क्यो (प्यार झुकता नही)मधला स्मृतिगंध आणि प्यार हमारा अमर रहेगा (मुद्दत)मधला आशावाद, असा विविध नवरसांनी युक्त शब्दांचा मळा एस. एच. बिहारी यांनी फुलवला होता. एस.एच.बिहारी यांचे निधन २५ फेब्रुवारी १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / http://www.shbihari.com
मा.एस.एच.बिहारी यांची वेब साईट. http://www.shbihari.com
Leave a Reply