भा. रा. तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७३ रोजी झाला.
भा.रा.तांबे यांच्या कवितेचे वैशिष्ठय म्हणून आपणास त्यातील गेयता व भावमधुरता या गुणांचा उल्लेख करता येईल. त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनाचे निर्दोष व आनंदी असे वर्णन केले आहे. म्हणून त्याच्या कवितेस ‘संतुष्ट कविता’ असे यथार्थतेने संबोधता येते. बालगीत व नाटयगीत हे काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच समर्थपणे हाताळले व लोकप्रिय केले.
त्यांच्या ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ‘मधु मागशी माझ्या सख्या परी’ ‘कळा ज्या लागल्या जीवा’ ‘रुद्रास आवाहन’ ‘रुणझुणू ये’ यांसारख्या कविता स्मरणात राहतील अशाच आहेत. भा. रा. तांबे हे मराठी काव्य सृष्टीमध्ये फुललेले, व रसिकतेला आपल्या हजारो नवकल्पनांच्या पाकळ्यांनी भुरळ पाडणारे विलोभनीय व सप्तरंगी कमळ होते. मृत्यूसारख्या धीरगंभीर व अथांग अशा खोल विषयाला कल्पक शब्दरचनांच्या शृंखलांमध्ये बांधण्याचा प्रयत्न त्यांच्या कवितांनी केला. मृत्यू या शब्दाबद्दल पहिल्यापासून, त्यांना कसले तरी सुप्त आकर्षण होते. मृत्यूविषयी आतुरता, असाहाय्यता, निराशा, वात्सल्य, भय, निराशा, साशंकता, अनामिक खिन्नता अशा विविध भावनांची चित्रे शब्दकुंचल्याने रंगवित, तांबे मृत्यूच्या स्वागतासाठी स्वतःला तयार करत गेलेले दिसतात. मृत्यूविषयीच्या त्यांच्या कविता इतक्या करूणसुंदर आहेत, की प्रत्यक्ष मृत्यूलाही पाझर फुटावा!
मृत्यु म्हणजे परमेश्वरभेटीचे एक माध्यम असल्याचे त्यांनी मानले. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असे समजून स्वतःचा आणि इतरांचा प्रवास सुखकर कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी नेहमी सुचविले. ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी होते. म्हणून ‘राजकवी तांबे’ या नावानेही ते ओळखले जात.
भा.रा.तांबे यांचे ७ डिसेंबर १९४१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
कवीवर्य तांबेंच्या कवितांचे रसग्रहण आपल्या लेखणीतून उतरले व ते वाचायला मिळाले तर रसिक जनांना अलौकिक प्राप्तीचा आनंद मिळेल असे वाटते ..