गोपीनाथ सावकार यांचा जन्म १२ जानेवारी १९१० रोजी झाला.
गोपीनाथ सावकार यांनी संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात मराठी रंगभूमीवर सातत्याने संगीत नाटकं सादर केली. ‘भावबंधन’, ‘शाकुंतल’, ‘सुवर्णतुला’, ‘ययाती देवयानी’ अशा अनेक संगीत नाटकांचे दजेर्दार प्रयोग सादर करून त्यांनी संगीत नाटकाचा प्रेक्षक टिकवून ठेवायचा जवळ जवळ एकहाती प्रयत्न केला.
‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे नाटक गोपीनाथ सावकार यांनी त्यांच्या ‘कलामंदिर’ या नाटय़संस्थेतर्फे २० ऑगस्ट १९६६ रोजी रंगभूमीवर आणले. पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या रंगभूमीवर सादर केला गेला होता.
गोपीनाथ सावकार गोव्याचे. धि गोवा हिंदु असोसिएशन या संस्थेचा सांस्कृतिक विभाग गोपीनाथ सावकार यांनीच सुरू केला. पु. भा. भाव्यांचं ‘वीषकन्या’ हे नाटक सावकार आपल्या संस्थे तर्फे’सादर करीत. यातली नीळकंठाची खलनायकी भूमिका त्यांनी अजरामर केली. आपल्या अभिनयाने त्यांनी रंगभूमीवर एक मानदंड निर्माण केला. आचार्य अत्रेंच्या ‘उद्याचा संसार’मध्ये गोपीनाथ सावकार प्रमुख भूमिका करीत होते. शरीर मधुमेहाने पोखरलेलं होतं. पायाला इजा झालेली. जखम चिघळत गेली, गॅंगरिन झालं. शेवटी पाय कापावा लागला. कुठच्याही नटाने आपली रिप्लेसमेंट तयार करा, असा सल्ला दिला असता. पण गोपीनाथ सावकार स्वत:च नाटक सादर करत होते. सांगणार कुणाला? आणि शरीरात भिनलेली नाटकाची झिंग शमवणार कशी? मागची पुढची तमा न बाळगता हा अवलिया कुबड्या घेऊन रंगमंचावर भूमिकेत उभा राहिला आणि त्यांनी ती भूमिका आपल्याला आलेल्या पंगुत्वाची फिकीर न करता शेवटपर्यंत उत्कृष्टपणे निभावून नेली. ही आठवण विजय तेंडुलकरांनी त्यांच्या ‘कोवळी उन्हे’ या सदरातल्या लेखात नोंदवून ठेवली आहे.
नाट्य-चित्रपट क्षेत्रातले ख्यातनाम अभिनेते अशोक सराफ हे गोपीनाथ सावकार यांचे भाचे. संगीत रंगभूमीवर गायक नट म्हणून प्रतिष्ठा पावलेले प्रसाद सावकार हे पुतणे. अनेक संगीत नाटकांत उत्तम स्त्री पार्टी नट म्हणून लौकिक मिळवणारे रघुनाथ सावकार हे त्यांचे चिरंजीव आणि शिष्यगणांत रामदास कामत, आशालता आणि अशा कित्येक हुन्नरी गायक कलावंतांचा भरणा होता. अशोक सराफ आणि सुभाष सराफ या गोपीनाथांच्या भाच्यांनी आपल्या मामांची कायमस्वरुपी आठवण राहावी म्हणून त्यांच्या नावे विश्वस्त निधी स्थापन केला आहे. या विश्वस्त निधीने अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या यशवंत नाट्य मंदिराला आणि पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाला गोपीनाथ सावकारांच्या तैलचित्राची प्रतिमा दिलेली आहे. गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीच्या वतीने गोपीनाथ सावकार स्मृती नाट्य महोत्सवाचे आयोजन केले जाते.
गोपीनाथ सावकार यांचे निधन १४ जानेवारी १९७३ साली झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply