नवीन लेखन...

प्रसिद्ध चित्रपटनिर्माते– दिग्दर्शक मृणाल सेन

मृणाल सेन यांचे मूळ नाव माणिकबाबू; पण ‘मृणालदा’ या नावानेच ते चित्रपटसृष्टीत ओळखले जातात. त्यांचा जन्म १४ मे १९२३ रोजी फरिदपूर (बांगला देश) येथे झाला. मृणाल सेन यांच्या मातोश्री सूरजूबाला सेन स्वातंत्र्य चळवळीच्या मोठमोठय़ा सभांतून देशभक्तीपर गीत गायच्या. बिपिनचंद्र पाल यांचं त्यांच्यावर मुलीसारखं प्रेम होतं. मृणाल सेन यांचे वडील दिनेशचंद्र सेन हे वकील होते. ते कमाईतला मोठा हिस्सा क्रांतिकारकांना शस्त्रांसाठी पैसा पुरवायला द्यायचे. चित्तरंजनदास, नेताजी बोस अशी दिग्गज मंडळी फरीदपुरात त्यांच्याकडेच उतरायची. अशा वातावरणाचा योग्य तो परिणाम होऊन वयाच्या सातव्या वर्षी मृणालकांती दिनेशचंद्र सेनने पोलिसांच्या तोंडावर ‘वंदे मातरम’ नारा घुमवला आणि काही तास पोलीस ठाण्याची हवा चाखली..

त्यांचे माध्यमिक शिक्षण फरिदपूर येथे झाले. पुढे कोलकात्यामधील स्कॉटिश कॉलेजात त्यांनी भौतिकशास्त्राचे अध्ययन केले. या काळात त्यांचा संबंध कम्युनिस्ट पक्षाशी व पक्षाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांशी आला. मात्र ते पक्षाचे सदस्य झाले नाहीत. तसेच ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) या संघटनेशी ते संबंधित होते (१९४३–४७). दरम्यान चित्रपटाच्या सौंदर्यशास्त्रावरील ब्लादिमीर नेल्सन यांचे सिनेमा अॅतज ग्राफिक्स आर्ट हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. तेव्हापासून त्यांची चित्रपटविषयक आस्था आणि रुची वाढीस लागली. सुरुवातीला काही काळ पत्रकारिता व वैद्यकीय प्रतिनिधीची नोकरी केल्यानंतर कोलकात्यामधील एका चित्रपट स्टुडिओत ध्वनितंत्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले. येथपासूनच त्यांच्या चित्रपटकारकीर्दीस सुरुवात झाली.

मृणाल सेन यांनी १९५५ मध्ये रात भोरे (द डॉन ) हा पहिला बंगाली चित्रपट दिग्दर्शित केला; मात्र तो यशस्वी ठरला नाही. त्यानंतरच्या नील आकाशेर नीचे (अंडर द ब्लू स्काय, १९५८) या चित्रपटाने ते सर्वसामान्य लोकांमध्ये परिचित झाले; तर त्यांचा बैशे श्रावण (१९६०) हा चित्रपट व्हेनिस चित्रपटमहोत्सवात दाखवला गेल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. पुढील काळात पुनश्च५ (ओव्हर अगेन, १९६१), प्रतिनिधी (द रेप्रिझेन्टेटिव्ह, १९६४), आकाशकुसुम (अप इन द क्लाउड्स, १९६५) आणि माटीर मानिष (मॅन ऑफ द सॉइल, १९६६) हे चित्रपट त्यांनी निर्माण केले. त्यानंतर शासकीय अनुदानातून कमी खर्चात बनविलेल्या भुवन शोम (१९६९) या हिंदी चित्रपटाने त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर मानाचे स्थान मिळवून दिले.

मृणाल सेन यांचे नेटके कलात्मक दिग्दर्शन, उत्पल दत्त व सुहासिनी मुळ्ये यांचा प्रमुख भूमिकांतला उत्कृष्ट अभिनय, हलकाफुलका निरागस विनोद, अर्थगर्भ संहिता, अमिताभ बच्चन यांनी सूत्रधार म्हणून दिलेला उसना आवाज अशा अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत युगप्रवर्तक ठरला. ह्या चित्रपटापासून भारतातील वास्तवदर्शी चित्रपटचळवळीला चालना मिळाली, तसेच सेन यांच्या कारकीर्दीला नवे वळण लाभले. पुढील काळात सेन यांनी राजकीय पार्शभूमी असलेले सामाजिक आशयाचे चित्रपट बनविण्यास सुरुवात केली. त्यामुळे मार्क्सवादी कलावंत अशी त्यांची ख्याती झाली. या काळातील कोलकात्यामधील राजकीय अस्थिरतेस व अनागोंदीच्या स्थितीस मध्यमवर्गीय समाजाची उदासीन, निष्क्रिय वृत्ती कारणीभूत असल्याची त्यांची भूमिका होती. त्याचे प्रभावी दर्शन त्यांनी कोलकाता शहरावरील शोकात्म चित्रपटांतून घडवले. उदा., इंटरव्ह्यू (१९७१), कोलकाता ७१ (१९७२) आणि पदातिक (द गूरिला फायटर, १९७३) इत्यादी. हे चित्रपट व त्यांमागील त्यांची मध्यमवर्गीय समाजाला दोषी ठरवण्याची भूमिका त्या काळात काहीशी वादग्रस्त ठरली.

१९७९ नंतर त्यांच्या चित्रपटाचा रोख बदलला. चित्रपटातील सामाजिक वास्तवाच्या चित्रणाऐवजी मानवी अंतर्मनाच्या चित्रणाकडे ते वळले. आपल्या एकूण कारकीर्दीत त्यांनी सु. २८ चित्रपट, १४ लघुपट व ५ अनुबोधपट निर्माण केले. सेन यांनी चित्रपटमाध्यमाचा वापर कुशलतेने व समर्थपणे केला. केवळ एकाच पठडीतील साचेबद्ध चित्रपट न बनविता त्यांनी सातत्याने नवनवीन प्रयोग केले. त्यांच्या चित्रपटांतून अस्तित्ववाद, मार्क्सवाद, जर्मन अभिव्यक्तिवाद, इटालियन नववास्तववाद अशा विविध विचारसरणी व शैली यांचा प्रत्यय येतो. त्यांच्या चित्रपटांचे शेवट हे प्रेक्षकांना अंतर्मुख व्हावयास भाग पाडणारे, अगदी अनपेक्षित आणि वेगळे असतात.

चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी औपरोधिक विनोदाच्या साहाय्याने ग्रामीण भारताचे वास्तववादी दर्शन घडविले. कोलकाता शहरावरील शोकात्म चित्रपटांमध्ये त्यांनी नवीन चित्रीकरणशैलीचा प्रयोग करून तुकड्यातुकड्यांतून आविष्कृत होणाऱ्या निवेदनपध्दतीचा वापर केला. मध्यमवर्गीयांची नैतिकतेबद्दल असणारी मनोवृत्ती आणि तिच्या विविध सूक्ष्म पैलूंचे दर्शन त्यांनी इक दिन प्रतिदिन (अँड क्वाएट रोल्स द डे, १९७९) आणि खारिज (द केस इज क्लोज्ड, १९८२) या चित्रपटांतून घडविले. त्यांच्या अस्तित्ववादी आशयसूत्र असलेल्या खंडहर (द रुइन्स, १९८३) या चित्रपटाची पटकथा इंग्रजीत पुस्तकरूपात उपलब्ध आहे (१९८४). कोरस (१९७४) या त्यांच्या चित्रपटात पाश्चिमात्य प्रभावाखालील उद्योगजगताचे अतिवास्तववादी शैलीत चित्रण आहे, तर मृगया (१९७६) या हिंदी चित्रपटात ब्रिटिश राजवटीच्या वर्चस्वाखालील आदिवासी जमातीचे चित्रण आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्तीने साकारलेली आदिवासी नायकाची भूमिका राष्ट्रीय पारितोषिक विजेती ठरली. त्यांनी बंगालीशिवाय अन्य भाषांतही चित्रपट निर्माण केले.

त्यांत भुवन शोम व एक अधुरी कहानी (१९७२) हे हिंदी चित्रपट; माटीर मानिष हा ओडिया चित्रपट; ओका ऊरी कथा (अ व्हिलेज स्टोरी, १९७७) हा तेलुगू चित्रपट आदींचा समावेश होतो. अशा बहुभाषिक चित्रपटांमुळे राष्ट्रीय पातळीवर दिग्दर्शक म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली. सामान्य प्रेक्षकांना रुचणारे राजकीय विषयांवरचे बुध्दिवादी चित्रपट काढल्याने त्यांना भारतीय चित्रपटांच्या इतिहासात मानाचे स्थान प्राप्त झाले. अशा नव्या वळणाच्या राजकीय चित्रपटांच्या प्रवाहाचे ते प्रवर्तक मानले जातात.

मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये विविध पारितोषिके मिळाली. कान्स, बर्लिन, व्हेनिस, मॉस्को, कार्लोव्ही व्हेरी, माँट्रिऑल, शिकागो, कैरो इ. चित्रपटमहोत्सवांतून त्यांचे चित्रपट गौरविण्यात आले. भुवन शोम, इक दिन प्रतिदिन आणि अकालेर सान्धने (इन सर्च ऑफ फॅमिन, १९८०) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाची पारितोषिके मिळाली. तसेच भारत सरकारतर्फे पद्मभूषण (१९८१), भारतीय चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार (२००४) हे त्यांना लाभलेले अन्य पुरस्कार होत.

ते संसदेच्या सभागृहाचे सन्माननीय सदस्यही होते (१९९८–२००३). फ्रान्स सरकारने त्यांना कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या फ्रान्समधील सर्वोच्च पुरस्काराने गौरविले (१९८५). रशियन सरकारनेही ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप या किताबाने त्यांना सन्मानित केले (२००१). अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही मानद पदवी बहाल केली.

त्यांनी ऑलवेज बीइंग बॉर्न हे आत्मचरित्र लिहिले (२००४). त्यांना विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांतून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले (२००८; २००९; २०१२). आपल्या समुहाकडून मा.मृणाल सेन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / मराठी विश्वकोश

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..