विदुषी कीर्ती शिलेदार यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी पुणे येथे झाला.
वडील जयराम शिलेदार आणि आई जयमाला रंगभूमीवरील गायक व नट असल्यामुळे संगीत व अभिनय यांचे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच झाले.कीर्ती शिलेदार यांना वडील जयराम आणि आई जयमाला शिलेदार यांच्याकडून कलेचा वारसा मिळाला.
वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’ पासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. ‘संगीत सौभद्र’ या नाटकातील नारदाची भूमिका त्यांनी प्रथमच केली आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. संगीत आणि अभिनय याचे धडे घेत असतानाच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मराठी या विषयातील ‘बी.ए. ‘ची पदवीही कीर्ती शिलेदार यांनी मिळविली. विद्याधर गोखल्यांचे ‘स्वरसम्राज्ञी’हे खास शिलेदारांसाठीचे नाटक होते. यातील तमाशातील मैनेची भूमिका अत्यंत गाजली. तमाशातल्या मैनेपासून शास्त्रीय संगीत गाणाऱ्या घरंदाज गायिकेपर्यंतच्या अनेक छटा दाखविण्यासाठी कीर्ती शिलेदारांनी प्रचंड मेहनत घेऊन ही भूमिका ताकदीने सादर केली. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून विविध संगीत नाटकांचे त्यांनी चार हजारांहून अधिक प्रयोग सादर केले होते. देशविदेशात संगीत नाटकांचे प्रयोग, नाट्यपदांच्या मैफली, सप्रयोग व्याख्याने त्यांनी दिली. पारंपरिक संगीत नाटकांप्रमाणेच स्वरसम्राज्ञी, अभोगी, मंदोदरी आदी वेगळ्या धाटणीची नाटकेही त्यांनी आपल्या स्वराभिनयाने गाजवली होती. विद्याधर गोखलेंच्या ‘स्वरसम्राज्ञी’ या नाटकाच्या निमित्ताने कीर्ती यांना नीळकंठबुवा अभ्यंकर गुरु म्हणून लाभले. अभ्यंकरबुवांच्या तालमीत वाढलेल्या कीर्ती शिलेदार शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, ठुमरी अशा विविध संगीत प्रकारांत तयार झाल्या. आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेतूनच दोनदा त्यांचे गायन प्रसारित झाले. त्यांच्या १९०० च्या आसपास मैफली झाल्या.
अनेक जुन्या संगीत नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. रुक्मिणी, सुभद्रा, मंथरा, द्रौपदी, वसंतसेना, रेवती अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी संगीत रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. रंगतदार, ढंगदार गायकीबरोबरच त्यांचे २ लयीवरदेखील प्रभुत्व दिसून येई. तबला व पखवाज : वाजवण्यातही त्या निपुण होत्या.
कीर्ती शिलेदारांनी २७ नाटकांतून ३४ भूमिका केल्याअसून साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग केले. दीप्ती भोगले (लता शिलेदार) या त्यांच्या ज्येष्ठ भगिनींच्या संगीत नादलुब्ध मी’ आणि ‘संगीत चंद्रमाधवी’ या दोन्ही नाटकांचे संगीत दिग्दर्शनही कीर्ती शिलेदार यांनी केले. पारंपरिक संगीत नाटकांचा विचार आणि बदलत्या काळानुसार नावीन्याचा अंतर्भाव त्यांच्या संगीत नाटकात आणि संगीतातही दिसतो. ‘चंद्रमाधवी’ या नाटकाच्या संगीतासाठी त्यांना ‘झी’चा ‘सर्वोत्कृष्ट संगीत’ पुरस्कार मिळाला होता. कीर्ती शिलेदारांनी ‘स्वर-ताल-शब्दसंगती’ हा संगीतातील शब्दार्थाचे आणि काव्यार्थाचे महत्त्व सांगणारा शोधनिबंध लिहिला.
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ तर्फे विविध भाषक विद्यार्थ्यांकडून त्यांनी हिंदी भाषेतून नाट्यगीते गाऊन घेतली. एन. एस. डी. तर्फे झालेल्या ‘एकच प्याला’ च्या प्रकल्पामध्येही त्यांचा सहभाग होता. तसेच, ‘संगीत शारदा’ या नाटकाचा हिंदी नाट्यांशही त्यांनी सादर केला. संगीत नाटक अकादमीच्या समितीवरही त्यांनी पाच वर्षे काम केले होते.
नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
कीर्ती शिलेदारांना महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००९), नाट्यदर्पण रजनीचा ‘नाट्यव्रती’ सन्मान (१९९९), पुणे महापालिकेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००६) असे अनेक पुरस्कार मिळाले होते.काही काळापूर्वी त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘मम सुखाची ठेव ‘ हा लघुपट त्यांच्या भगिनी दीप्ती भोगले यांनी प्रदर्शित केला होता.
कीर्ती शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
कीर्ती शिलेदार यांची ध्वनिमुद्रित झालेली नाट्यगीते आणि त्या नाटकांची नावे.
अहो इथं मांडिला (संगीत स्वरसम्राज्ञी), एकला नयनाला विषय (संगीत स्वयंवर), एकलीच दीपकळी मी (संगीत स्वरसम्राज्ञी), कशि केलीस माझी दैना (संगीत स्वरसम्राज्ञी), दयाछाया घे निवारुनिया (संगीत एकच प्याला), नरवर कृष्णासमान (संगीत स्वयंवर), नाही मी बोलत (संगीत एकच प्याला), नृपकन्या तव जाया (संगीत स्वयंवर), पांडवा सम्राट पदाला (संगीत द्रौपदी),पावना-वामना-या मना (संगीत सौभद्र), पाही सदा मी (संगीत मानापमान), बलमा आये रंगीले (संगीत स्वरसम्राज्ञी), भक्तांचिया काजासाठी (संत अमृतराय महाराज यांचा अभंग), मम सुखाचि ठेव (संगीत स्वयंवर),येतील कधी यदुवीर, रे तुझ्यावाचून काही (संगीत स्वरसम्राज्ञी), लाजविले वैऱ्यांना (संगीत द्रौपदी), सखे बाई सांगते मी (रंगात रंगला श्रीरंग), हरीची ऐकताच मुरली (रंगात रंगला श्रीरंग)
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट/सचिन देशमुख
पुणे.
Leave a Reply