मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट भाऊराव कोल्हटकर यांचा जन्म ९ मार्च १८६३ रोजी झाला.
भाऊराव कोल्हटकर हे बडोदे येथील पोलीस आयुक्तांच्या कचेरीत साधे कारकून असले, तरी एक उत्कृष्ट गायक म्हणून त्याकाळी बडोद्यात त्यांची फार प्रसिद्धी होती. सुंदर रूप आणि गोड आवाज हे त्यांचे गुणविशेष. अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० रोजी संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग करून संगीत मराठी रंगभूमीची स्थापना केली. २० सप्टेंबर १८८२ रोजी भाऊरावांनी वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. त्याकाळी किर्लोस्करांच्या शाकुंतल नाटकात शकुंतला’, सौभद्र नाटकात ‘सुभद्रा’ व रामराज्यवियोग नाटकात ‘मंथरा’ या भाऊरावांच्या स्त्री भूमिका अतिशय लोकप्रिय झाल्या. ‘सुभद्रे’ची भूमिका तर त्यांनी १८८३ ते १८९७ या चौदा वर्षांच्या काळात अखंडपणे केली. महाराष्ट्रातील घराघरांतून त्यांच्या नावाचा उल्लेख आत्मीयतेने ‘भावड्या’ असा होऊ लागला. गोविंद बल्लाळ यांच्या विक्रमोर्वशीय नाटकांत ‘उर्वशी’ची भूमिका (१८८९) केल्यानंतर भाऊरावांनी नायकाच्या भूमिका करण्यास सुरुवात केली. देवल यांच्या शापसंभ्रम नाटकातील ‘पुंडरीक’ (१८९३) व मृच्छकटिक नाटकातील ‘चारुदत्त’ (१८९५); श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या पहिल्यावीरतनय नाटकातील ‘शूरसेन’ (१८९६) आणि देवलांच्या शारदा नाटकातील ‘कोदंड’ (१८९९) या भाऊरावांच्या लोकप्रिय व गाजलेल्या पुरुषभूमिका होत. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या मृत्यूनंतर (१८८५) ते किर्लोस्कर नाटक मंडळीचे भागीदार मालक झाले. अण्णासाहेब किर्लोस्करांनी स्थापन केलेल्या संगीत रंगभूमीची परंपरा त्यांनी आपल्या १८–१९ वर्षांच्या कारकीर्दीत चांगल्या प्रकारे समृद्ध केली.
भाऊराव कोल्हटकर यांचे १३ फेब्रुवारी १९०१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply