जेष्ठ व्हायोलिन वादक लक्ष्मीनारायण सुब्रह्मण्यम उर्फ एल सुब्रह्मण्यम यांचा जन्म २३ जुलै १९४७ रोजी मद्रास येथे झाला.
लक्ष्मीनारायण सुब्रह्मण्यम हे कुशल व्हायोलिन वादक म्हणून जगद्विख्यात आहेत. कर्नाटक शैली आणि पाश्चिमात्य शैली दोन्हींवर त्यांचं प्रभुत्व आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी लोकांसमोर आपली कला सादर करून आपल्या कुशलतेची चुणूक दाखवून दिली होती. एम.बी.बी.एस डॉक्टर असलेल्या एल. सुब्रह्मण्यम यांच्या दोनशेहून अधिक रेकॉर्डस् प्रसिद्ध झाल्या आहेत.
येहुदी मेन्यूइन, स्टेफान ग्रॅपेली, स्टीव्ही वंडर, रुजॅरो रीच्ची, हर्बी हॅन्कोक, जॉर्ज ड्युक, टोनी विल्यम्स, मेनार्ड फर्ग्युसन यांसारख्या जगप्रसिद्ध कलाकारांबरोबर त्यांनी मैफली केल्या आहेत आणि त्यांचे अल्बम्स निघाले आहेत. भारतापासून युरोपपर्यंत, अमेरिकेपासून सिंगापूरपर्यंत त्यांच्या कलेचा बोलबाला आहे. ‘सुब्रह्मण्यम यांच्या व्हायोलीनवादनाचा मी चाहता आहे. त्यांच्या वादनापासून मला नेहमीच स्फूर्ती मिळत आली आहे,’ असं खुद्द लॉर्ड येहुदी मेन्यूइन सारख्या अद्भुत व्हायोलीनवादकाने म्हटलंय.
यातूनच सुब्रह्मण्यम यांच्या कलेचं श्रेष्ठत्व आपल्याला कळतं! त्यांनी वेगवेगळ्या वाद्यवृंदांसाठी, बॅलेजसाठी, तसंच हॉलिवूड फिल्मसाठी आपल्या वादनकौशल्याची साथ दिली आहे. पीटर ब्रूकसारख्या महान दिग्दर्शकाने आपल्या महाभारतावरच्या महानाट्याच्या ध्वनिसंयोजनासाठी त्यांची मदत घेतली होती. त्यांना संगीत नाटक अकादमी आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच ‘नाद चक्रवर्ती’ या विशेष उपाधीनं सन्मानित करण्यात आलं आहे. ‘कॉन्व्हर्सेशन्स’ आणि ‘फॅन्टसी ऑन वेदिक चॅन्ट्स’ हे त्यांचे फ्युजन प्रकारातले अल्बम्स लोकप्रिय आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply