महानगरांच्या नशीबी नसतो भावनांचा ओलावा
निरर्थक धडपड, निर्जीव यांत्रिकता नि पोकळ गिलावा
आजूबाजूला सरपटणाऱ्या हातपायांना येथे नसतो चेहेरा
सारेच शोधतात निवाऱ्याला एक अपुरा कोपरा
भरकटणाऱ्या पतंगागत नसते आयुष्याला दिशा
परिस्थितीच्या काजळीने धुरकटणाऱ्या हाताच्या रेषा
इथे आयुष्ये नाही जगत रेटली जातात आपोआप
लोकलच्या रेटणाऱ्या गर्दीने फलाटावर फेकल्यागत
असाच (आणखी) एकदा सूर्य मावळतो, थकला – भागला
नि निघतो घड्याळ्याच्या ठोक्याबरोबर लगबगीने गलबला
जीव गुदमरवणाऱ्या गर्दीत मिसळून बेकाबू कोलाहलात
जीर्ण शरीरे सरकू लागतात, विटक्या मनाचं ओझं पेलत
थिजत्या आकांक्षांना सोबत घेऊन विझत्या आशेला
आणि कदाचित राखेआडला निखारा उरी जपलेला
घरट्याच्या ओढीनं निघून, प्रवासाच्या शक्तीपाताने शिणून
परततात आयुष्याची चिपाडं, निष्प्राण कलेवर बनून
पूर्ण पिट्ट्या पाडून घेऊन, काळं करुन दिवस पळताना
रात्र सामावे त्यांच्या गुपितांना, पापांना नि दिवसाच्या तापांना
आपापल्या बंदिस्त तुकड्यात, मग निवांत होऊन
अतृप्त आत्मे निजतात गाढ, खूपशी स्वप्ने उशाशी घेऊन
रात्रीच्या कुशीच्या उबेत, क्लांत जीव आश्वस्त निजे
भाळी लावूनी चंद्राचा टिळा, रात्र मग जागे, जोजवे
प्रेमाने थोपटे कपाळी अंकांना देता मंद मंद झोके
रात्र प्रहर – प्रहरांनी पिके, होत जाती रंग फिके
दिवस अस्पष्ट कुजबुजू लागे, झुंजुमुंजु होऊ लागे
काळोखाच्या दाट दडपणाला निर्धाराने सारुन मागे
धास्तावून जीव मग होतो जागा, विखुरली गात्रं गोळा करीत
पुन्हा प्रवासास दिशाहीनतेच्या टोकापासून, टोकापर्यंत
निघतो वेठबिगार पाठी थैली मारुन उत्साहाचा उसना आभास लेऊन
झापडांना ओढून डोळ्यांवर नि नीट जोखडात मान देऊन
पुन्हा होतं चक्र सुरु जगाच्या प्रचंड चरकाचे
पिळायला थेंब शेवटचे, शुष्क जीवनातल्या आशेचे
आणि नेलं जातं वाहून जू इमाने इतबारे जगाच्या अंतापर्यंत
गुलामांच्या असहाय पिढीपासून पुन्हा पुढल्या पिढीपर्यंत
— यतीन सामंत
Leave a Reply