नवीन लेखन...

व्हरक्याच्या मांडवाखालचा गारवा….

बाकावरचे दिवस

गावाकडचे चित्र आज संपूर्ण बदललेले दिसते.पूर्वीची दगड-मातीची अन् उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात ऊब देणारी माळवंदाची घरं तर आता अत्यंत दुर्मिळ झाली आहेत.सगळीकडे सिमेंट काँक्रीटचे भयान जंगल उभे राहिले आहे.

माळवद म्हणजे लाकडी वासे किंवा सरं वापरुन त्यावर लाकडी फळ्यांचे छत तयार केलेले असते..त्या छतावर चिखलाचा एक ते दोन फुट उंचीचा पेंड टाकला जायचा.आता वासे किंवा सरं हे लवकर कळत नाही पण बीम आणि कॉलम असं म्हणलं की लवकर समजतं.

आमच्या लहानपणी श्रीमंतांची घरं माळवदाची असायची.आमच्या आजुबाजूची भाऊकीची घरं माळवदाची होती. आमचं घर मात्र पूर्वी पासूनच पत्र्याचं होतं.उन्हाळ्यात पत्रे गरम होऊन घरात नुस्तं उकडायचं तर पावसाळ्यात गळत असल्यामुळे जागोजागी भांडे ठेवावे लागत अन् मग सुरु असायची .‌..टिप टिप..म्हणून गावाकडचा हिवाळाच तेवढा आवडता होता…

खरं तर घर हा मनुष्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो.जीवनात घराला सर्वार्थाने मोठे स्थान असते..हिवाळा संपताच पौष महिन्याच्या अखेरीस आमच्याकडे घराच्या समोर मांडव घालण्याची गडबड सुरू व्हायची. कारण उन्हाळ्यात पत्र्याच्या घरात नुस्त्या घामाच्या धारा लागत असंत.. घराच्या अंगणात चार डिळ्या (खांब)रोवले जायचे त्याच्यावर उभे आडवे लाकडं बांधून त्यावर पळसाच्या पानांचं दाट आवरण असायचं.. या मांडवाखाली एवढं गार वाटायचं की आमचं सगळं कुटुंब पावसाळ्याची चाहूल लागेपर्यंत तिथेच असायचं.या मांडवावर टाकण्यासाठी पळसाची पानं असायची त्याला आमच्याकडे एक विशिष्ट शब्द होता,त्याला ‘व्हरका’ असं म्हणायचे…

आमच्या गावशिवेवरच्या माळावर पळसाची खूप झाडं होती,तिथून हा व्हरका आणावा लागायचा….व्हरका आणणे हे काम आमच्यासाठी फार आनंदाचे आणि मजेचे होते.सकाळी लवकरं माळावर जाऊन पळसाचे फाटे तोडायचे…आमचं काम म्हणजे तोडलेले फाटे गोळा करणे व बैलगाडीच्या साट्यात भरणे…खूप गंमत वाटायची पळसाच्या फांद्या आणि पानं अंगाखांद्यावरून वाहून न्यायची…पळू…पळू…गोळा करायची…आमचे बाबा आणि सोबत असलेला एखादा गडी झाडावर जाऊन फांद्या तोडून खाली टाकायचे…दोन-चार फुटाची फांदी…एकेक फांदी गच्च्‍ पानांनी लदबदलेली असायची…पानांचा आणि फांद्यांचा झाडाखाली तो हलकासा स्पर्श…फांद्याचं ओझं म्हणून असं काही वाटायचं नाही…उलंट खूप मजा वाटायची…सगळा व्हरका गोळाकरून झाला की बैलगाडीच्या साट्यात रचला जायचा..त्याचा शिग साटयाच्या वर एवढा उंच लागायचा की बैलगाडी म्हणजे एखाद्या लॉरी किंवा टेम्पोसारखी वाटायची..तेवढया उंच बसून हालत डुलत यायची मजा काही निराळीच होती..सुरूवातीला वर चढायला भीती वाटायची पण एकदा त्या फांद्यापानांनी तुम्हाला मध्ये सामावून घेतले की मऊ सीट तयार व्हायची अन् धरण्यासाठी दोरी असली की भीती कुठल्याकुठे दूर पळून जायची….

आधीच माळ उंच आणि त्यात बैलगाडीत उंच पानांच्या ढिगावरून सारे शिवार बघता यायचे….एका बाजूला खोलात गाव दिसायचे….दुसरीकडे उंचच् उंच माळा दिसायचा….घरी येईपर्यंत दुपार व्हायची…दुपारी जेवणं आटपून लगेच दारासमोरच्या मांडवावर पळसाचा व्हरका टाकला जायचा वा-या–वादळानं उडू नये म्हणून त्याच्याच फांद्याचा वापर करून शिवले जायचे..सुंदर हिरवा गार मांडव तयार व्हायचा..आमच्यासाठी रामाने वनवासात घातलेल्या पर्णकुटीचा अनुभव असायचा जणू…एका बाजूला पाण्याचा माठ ठेवलेला असायचा…एखादी बाज घातलेली असायची…त्या मांडवाखाली आमचे जेवण-खाणे रोजचे व्हायचे आणि अभ्यास ही चालायचा…कविता…गाणी…खेळ…कधी…भावकीतली सारी पोरं..सोरं गोळा व्हायची…गार सावली वाटायची…

आज स्लॅबच्या घरात सावलीत वावरतांनाही व्हरक्याच्या मांडवाखालचा गारवा मनाला सुखावून जातो..…

— संतोष सेलूकर,परभणी
7709515110

Avatar
About डॉ.संतोष सेलूकर 25 Articles
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..