सुमारे ६० वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, आगगाडीच्या सिग्नलसाठी…अग्निरथ-गमनागमन-भयनिर्भरतासूचक-लोहताम्र-सदीप-पट्टीका….असा मराठी शब्द सुचविला असा समज होता. त्या काळी पेढा, टेबल टेनिस वगैरे साठीही लांबलचक शब्द सुचवून विनोदाची कारंजी अुडविली जात होती.
लोकसत्ता, लोकमुद्राच्या १३ ऑगस्ट २००६ च्या मुंबआी पुरवणीत, माझे, सावरकारांनी, सिग्नलसाठी सुचविलेला हा शब्द नेमका कळवावा असे आवाहनपर पत्र प्रसिध्द झाले. महाराष्ट्रात ही पुरवणी वेगवेगळ्या दिवशी प्रसिध्द होत असल्यामुळे अेक आठवडाभर, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून, वाचकांनी फोन करुन, सिग्नलसाठी, सुमारे ६० वर्षांपूर्वी गाजलेला शब्द कळविला. जवळजवळ ३०० फोन आणि २९ पत्रे आली. वाचकांनी कळविलेल्या प्रतिशब्दात अचूकता आणि अेकसूत्रता नव्हती. हा शब्द अैकीव असून माझाच शब्द बरोबर आहे, असे प्रत्येकाचे मत होते.
सारांशाने ः अग्निरथ-गमनागमन-भयनिर्भयतासुचक-लोहताम्र-सदीप-पट्टिका असा शब्द सर्वांना सामावून घेणारा होतो. यासंबंधी मी, स्वा. सावरकरांचे पुतणे, श्री. विक्रम सावरकर यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यांच्याकडून मिळालेली माहिती पुढे देत आहे ः-
हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नाही. त्यांनी भाषाशुध्दीवर अेक पुस्तक लिहीले आहे. त्यात त्यांनी, अिंग्रजी शब्दांसाठी सुचविलेल्या मराठी प्रतिशब्दांची सूचीही दिलेली आहे. त्यात सिग्नलसाठी बाहुटा हा शब्द आहे. त्याचेच रुपांतर आता बावटा असे झाले आहे. महापौर, दिनांक, कलामंदिर असे कितीतरी सोपे शब्द सावरकरांनी घडविले आहेत.मराठी प्रतिशब्द हा सुटसुटीत, सोपा आणि व्यवहार्य असावा असा सावरकरांचा कटाक्ष होता. स्वा. सावरकरांच्या भाषा शुध्दीवर, त्यावेळी बरीच टीका झाली. आचार्य अत्रे आघाडीवर होते. अग्निरथाचा हा शब्द बहुधा त्यांनीच घडविला असावा. या शब्दाने मात्र महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला. माझ्या मते हा प्रतिशब्द नसून ते सिग्नलचे वर्णन आहे.
रेल्वेचा पोर्टर, आगगाडी सुटण्याचे वेळी, हिरवी झेंडी (लहान झेंडा) हाताने हलवून, आगगाडी पुढे जाण्यास कोणताही धोका नाही हे सुचवीत असे. तसेच आगगाडी थांबविण्यासाठी लाल झेंडी दाखवीत असे. अशा
रितीने बाहूंच्या सहाय्याने सिग्नल
देण्याचे साधन म्हणून बाहुटा हा शब्द, सावरकरांनी सुचविला असावा. डॉ. रघुवीर यांनी अिंग्रजी-हिंदी शब्दकोशात, अग्निरथ-गमनागम…….हा शब्द घेतलेला आहे असे अिंदूरच्या अेका वाचकाने फोनवर कळविले. वाआीच्या विश्वकोशात, सिग्नलसाठी खूण, संकेत, संदेश असे शब्द आहेत.
स्वा. सावरकरांच्या नावावर चिकटविलेला, सिग्नलसाठीचा हा शब्द, आता तरी, मराठी भाषिकांनी कायमचा काढून टाकला पाहिजे. सिग्नल हा शब्द आता तर सर्वांनी स्वीकारला आहेच. माझ्या या लेखात, अ ची बाराखडीच वापरली आहे याची कृपया नोंद घ्यावी. गजानन वामनाचार्य, घाटकोपर, मुंबई.बुधवार, ६ अेप्रिल २०११.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply