आपलंच मन , आपलेच “विचार” ,
पण त्याचेही असतात अनेक प्रकार …. आजूबाजूच्या गोष्टींसारखे …
वेगवेगळे प्रकार समजून घेत ; त्यातली गंमत अनुभवण्यात मजा असते !!
काही विचार “पिंपळपाना” सारखे ..
मनाच्या पुस्तकात वर्षानुवर्षे जपून ठेवत ; त्याची जाळी करण्यात मजा असते !!
काही विचार “फुलपाखरा” सारखे ..
वेळीच कोषातून बाहेर काढत ; मुक्तपणे व्यक्त करण्यात मजा असते !!
काही विचार “नो एंट्री” सारखे ..
चुकीचं आहे याची कल्पना असूनही ; “कधीतरी” हळूच जाण्यात मजा असते !!
काही विचार “वाळवी” सारखे ..
मनाला पोखरून काढायच्या आत ; ताबडतोब नष्ट करण्यात मजा असते !!
काही विचार “छोट्याश्या रोपट्या” सारखे ..
छान खतपाणी घालून संगोपन करत ; हळूहळू फुलवण्यात मजा असते !!
काही विचार “फुग्या” सारखे ..
उगाच फुगवता फुगवता फाटकन फुटून ; भानावर येण्यात मजा असते !!
काही विचार “उतू जाणाऱ्या दुधा” सारखे ..
कितीही लक्ष ठेवलं तरी शेवटच्या क्षणी ; धावत जाऊन गॅस बंद करण्यात मजा असते !!
काही विचार “पहाटेच्या कोंबड्या” सारखे ..
झाकून ठेवले कितीही तरी ; शेवटी आरवण्यातच मजा असते !!
काही विचार “पहिल्या पावसा” सारखे ..
सोबत छत्री असूनही ; चिंब भिजण्यात मजा असते !!
काही विचार “समुद्राच्या लाटे” सारखे ..
आपली ईच्छा असो वा नसो ; उसळत्या प्रवाहासोबत ढकलले जाण्यात मजा असते !!
काही विचार “चकव्या” सारखे ..
कितीही दूर गेलो तरी ; पुन्हा पुन्हा तिथेच गुरफटण्यात मजा असते !!
काही विचार “हिमानगा” सारखे ..
इतरांना फक्त टोक दाखवत ; आपल्या अंतरंगात बरंच काही दडवण्यात मजा असते !!
काही विचार “फूलटॉस बॉल” सारखे ..
आल्या आल्या लगेचच ; चेंडू सीमापार करण्यात मजा असते !!
काही विचार “डोंबाऱ्यांच्या खेळा” सारखे ..
तारेवरची कसरत करत कसंबसं ; सावकाशपणे निभावून नेण्यात मजा असते !!
काही विचार “वातकुक्कुट यंत्रा” सारखे ..
ज्या दिशेला वारा वाहील ; त्या दिशेला भरकटण्यात मजा असते !!
काही विचार “झाडांच्या मुळा” सारखे ..
आली संकटं कितीही तरी न डगमगता ; ठाम ठेवण्यात मजा असते !!
काही विचार “ऋतूं” सारखे ..
वेगवेगळ्या परिस्थितीनुसार रंग बदलत ; निसर्गचक्र सुरळीत ठेवण्यात मजा असते !!
काही विचार “सिग्नल” सारखे ..
थोडं थांबून योग्य मार्ग निवडत ; पुढचा प्रवास करण्यात मजा असते !!
काही विचार “कापरा” सारखे ..
कितीही आपल्याच जवळ ठेवावेसे वाटले ; तरी उडून दरवळण्यात मजा असते !!
काही विचार या “वरच्या प्रकरांच्या यादी” सारखे ..
एकापुढे एक कितीही सुचत असले ; तरी योग्य वेळी थांबण्यात मजा असते !!
आपलंच मन , आपलेच “विचार” ,
पण त्याचेही असतात अनेक प्रकार …. आजूबाजूच्या गोष्टींसारखे …
वेगवेगळे प्रकार समजून घेत ; त्यातली गंमत अनुभवण्यात मजा असते !!
©️ क्षितिज दाते , ठाणे
आवडल्यास शेअर करायला माझी काहीच हरकत नाही ..
Leave a Reply