नवीन लेखन...

विचार वेध

प्रकाश सेकंदाला १,८६,००० मैल इतक्या वेगाने प्रवास करतो हे आता सिद्ध झालंय. पण विचारांना प्रवास करायला इतकाही वेळ लागत नाही. कोलकोत्याच्या सुस्वर गायनाचे बोल चेन्नईला ब्रॉडकास्टींग च्या माध्यमातून त्वरीत पोहोचतात. विजेच्या वहनाला माध्यम म्हणून इथर असते पण विचार त्यापेक्षाही अलवार असतात. संयम, शांती, सुसंवादयुक्त अध्यात्मिक विचार हिमालयातील एखाद्या संताच्या प्रवचनातून क्षणार्धात अमेरीकेतील त्याच्या शिष्यापर्यंत पोहोचतात. तद्वतच घृणा, शंकेखोर, सूड अशा भावना असलेल्या व्यक्तीचे विचार भोवताली चटकन पसरतात आणि तेथील वातावरण प्रदूषित करतात.

पाण्यात पत्थर टाकला की त्याची आवर्तने सर्वदूर पसरतात, मेणबत्तीचा प्रकाश आसपासचा परिसर उजळून टाकतो तसा आपला विचार (चांगला असो वा वाईट असो) समोरच्याच्या मनःपटलावर कंपने निर्माण करतो. तेथे व्रण ठेवतो. एका मनातील विचार दुसर्‍या मनात कसे प्रवेश करत असतील? आपल्या आसपासचे भवताल मानस युक्त असते. त्याद्वारे हे वहन होते. त्यामुळे आपल्यानंतरही आपले विचार आसमंतात फिरत असतात, कारण ते जिवंत असतात, त्यांच्यात प्राण असतो. मानवाच्या व्यक्तिमत्वाचे विचार, भावना, वर्तन(कृती) हे तिन्ही घटक आतून एकमेकांना घट्ट जोडलेले असतात. त्यामुळे बाह्यतः आपले जीवन या तीन घटकांचा आरसा असते. हे आपल्या लक्षात येवो अथवा न येवो, पण आपल्या विचार सामर्थ्याने आपण स्वतःची प्रतिकृती तयार करीत असतो. आपल्या बाह्य विश्वातील प्रत्येक परिणामाला आपली आतली घटना कारणीभूत असते. त्यामुळे आतील निर्मितिक्षमतेला वाव द्यायचा असेल तर आपणांस विचारांचे नियमन करणे भाग आहे. गौतम बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे – आपण जे कोणी असतो/बनतो ती आपल्या विचारांची सावली/प्रतिमा असते. आपले मनच सर्वतोपरी असल्याने आपण जसा विचार करतो तसे होतो.

मानवी मनात दिवसाला १२००० ते ७०००० विचार येतात. त्या प्रत्येकावर नियंत्रण केवळ अशक्य म्हणून तसे ध्येय स्वप्नातही ठेऊ नये. त्यातील जे विचार प्रबळ असतील तेवढेच आपण नियमन करण्याचा निश्चय करावा कारण त्यातून आपला मानसिक कल अधोरेखित होत असतो. या मार्गाला लागले की बाकीचे इतःस्ततः भिरभिरणारे विचार आपोआप स्थिरावतात आणि सकारात्मक बनतात. भौतिक जगाचे मूळ आपल्या आतील अदृश्य विचारांच्या विश्वात असते. त्यामुळे स्वतःच्या नियतीवर आरूढ व्हायचे असेल तर अंतर्गत प्रबळ विचारांवर लगाम ठेवणे अपरिहार्य ठरते. मगच तुम्हांला अभिप्रेत असलेले सर्वकाही तुमच्या आयुष्यात वाट्याला येते. आयुष्यातील परिस्थिती आणि वाट्याला येणारे भोग यांच्यावर तुमच्या श्रद्धा आणि विचारांची मजबूत पकड असते. जेम्स ऍलन म्हणतो – परिस्थिती तुम्हांला घडवत नाही, ती फक्त तुमचे अंतर्दर्शन तुम्हांला घडवत असते. जीवनाचा कोणताही घटक(आर्थिक, आरोग्य, नातेसंबंध) शेवटी तुमची विचारधारा ठरवीत असते आणि प्रकट करीत असते. तेव्हा आपल्याला जे अभिप्रेत आहे, ते घडवून आणणे सहजशक्य आहे कारण हा अंतरीचा मामला आहे. खूपशा लोकांची उलट विचारपद्धती असते- मी आज जो काही आहे, तो निव्वळ परिस्थितीमुळे आहे. मात्र त्यांना एका गोष्टीचा विसर पडलेला असतो – त्यांचे विचारच तशा परिस्थितीला कारणीभूत असतात.

सार्वकालिक अशी एकच जाणीव आपले आसमंत व्यापून उरलेली असते- ती म्हणजे वैश्विक मन. आपलं व्यक्तिगत मन हा त्याचा एक इवलासा घटक असतं.आपले विचार आपल्या मनातून उद्भवत असतात त्यामुळे आपल्या विचारसामर्थ्याला मर्यादा नसतात. एकदा हा शोध लागला की आपण ज्या ऊर्जेचा एक हिस्सा आहोत ती आपल्या आतमध्येच स्थित असते मग काहीही अशक्य उरत नाही. अंतर्मुख होताच हे विचार सामर्थ्य दृष्टीस पडते आणि आपल्याला भोवंडून सोडते. विश्वातील सर्व ज्ञानवंतांनी आणि गूढवाद्यांनी आता हे मान्य केलं आहे की सगळं जग म्हणजे ऊर्जा असते. संशोधक आणि विचारवंतही याची पुष्टी करताना आढळतात. विचार हेही ऊर्जास्वरूप असतात. विल्यम अत्किंसन म्हणतो – मन हे ऊर्जेचे स्थिर रूप असते आणि विचार हे चैतन्याने भारलेलं ऊर्जेचं गतिमान रूप असतात. चार्ल्स हानेल पुढे जाऊन असेही म्हणतो की स्थिर मनाचे गतिशील मनात रूपांतर होत असताना तयार होणारी कंपने म्हणजे विचारसामर्थ्य! विचार सजीव असल्याने जेव्हा आपल्या मनात एखादा विशिष्ट विचार येतो तेव्हा मनातून संबंधित ऊर्जेची कंपने प्रसारीत होतात.
ही ऊर्जा मग दुसर्‍या, समान ऊर्जेला आकृष्ट करते (यालाच आकर्षणाचा कायदा असे संबोधतात.) दी सीक्रेट चित्रपटाचा निर्माता माईक दुली च्या मते तुमच्या आसपास बघा, तुमचे विचार दृश्यरूपात प्रकटतील. कारण विचार म्हणजेच वस्तू! मात्र सगळे विचार एकसारखे प्रबळ नसतात. ज्या विचारांशी उत्कट भावना जोडलेल्या असतात तेच विचार प्रबळ ठरतात. त्यांना आपण जितकी ऊर्जा प्रदान करू तेवढ्याच ताकतीने ते समान विचारांना आकृष्ट करू शकतात. मात्र हे ही लक्षात ठेवायला हवे की दिवसभरात क्षणभर सकारात्मक विचार आणि त्यानंतर सलग नकारात्मक विचार ही साखळी चालत नाही. नकारात्मक विचार आधीच्या विहित विचारांचे फायदे नष्ट करतात. आपलं व्यक्तिमत्व म्हणजे सर्व प्रकारच्या विचारांची गोळाबेरीज असल्याने खूपशा घटकांचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो. त्यामुळे कारण(विचार) आणि त्याचा परिणाम(परिस्थिती) यांच्यातील कार्यकारण भाव सहज जोडता येत नाही. अंतर्मन आपल्या श्रद्धा आणि विचारांचा साठा करून ठेवीत असते. तेव्हा या अंतर्मनाची जडण घडण बदलण्याची गरज असते. त्यातून आपण परिस्थितीवर आघात करू शकतो. विचार अंतर्मनात शिरले की ते मेंदूच्या पेशींवर आपला ठसा उमटवितात. अंतर्मनाच्या ओल्या गोळ्याला जो आकार देऊ त्यानुसार तो धारण केला जातो. म्हणून योग्य प्रतिमा त्यामध्ये रुजविल्या पाहिजे. अशा प्रतिमा ज्यांना आपण वास्तवात साकार झालेल्या पाहू इच्छितो. थोडक्यात भविष्यात आपण जे साध्य करू इच्छितो, त्यांचाच विचार करावयास हवा. विचार, तर्क, तुलना हे कार्य सचेतन मनाचे असते. अंतर्मन फक्त त्याबाबत व्यक्त होत असते/प्रतिक्रिया देत असते. थोडक्यात काय तर सचेतन मनाविरुद्ध जाण्याची अंतर्मनाची प्राज्ञा नसते. अंतर्मन आपल्यावर विसंबून असते आणि जे आत पोहोचते त्यावर विश्वास ठेवीत असते. त्यांवर इतरांच्याही विचारांचा प्रभाव पडत असतो. लहानपणापासून आपणावर इतरांच्या नकारार्थी विचारांचे भडीमार होत असतात. तुला हे जमणार नाही, हे तुझ्या आवाक्याबाहेरचे आहे असा मारा मग अंतर्मनात जाऊन स्थिर होतो. स्वतःवरचा विश्वास उडायला एवढे पुरेसे असते. मग आपण प्रयत्नही टाळतो. एकदा शक्य नाही ठरल्यावर प्रयत्न करून का पाहायचे? शब्द बदलले की विचारांची दिशा झटकन बदलते. एखाद्या लहान मुलाला झाडावर चढताना पडशील असं दटविण्यापेक्षा सांभाळून चढ रे म्हटलं की काळजी, जबाबदारी बरोबरच सकारात्मकताही येते. शब्दांची निवड विचारांना दिशा देते. कारण आपली कल्पनाशक्ती विचारांचे वहन करीत असते. विचारांचे रूपांतर ती मानसिक प्रतिमांमध्ये करीत असते आणि यथावकाश त्यांना शारीर/दृश्य स्वरूप मिळते.

विचारांचा वेध घेण्याची सवय असायला हवी त्यातून नीरक्षीरविवेक वृत्ती विकसित व्हायला मदत होते. सर्वंकष सकारात्मक मानसिकता हवी असेल तर विचारांबरोबर समझोता करावा लागतो. हे जुळवून घेणे सुरुवातीला अवघड वाटत असले तरीही सवयीने जमते. मात्र मनात शिरलेल्या प्रत्येक विचाराला आपण मानाचे आणि कायमचे स्थान देऊ लागलो तर ते अनुत्पादक ठरेल आणि आपले मानसिक आरोग्य, संतुलन ढळेल. तेव्हा चाळणी हवीच. अशा नकोशा विचारांना थारा दिला तर, जणू त्यांना मान्यता दिल्यासारखे होईल आणि ते हळूहळू आपल्यावर कब्जा मिळवतील. आणि म्हणतात ना – ज्याला तुम्ही टाळता/विरोध करता तेच तुमच्या बोकांडी बसते. अशा नकारात्मक विचारांना विरोध न करता, सहजगत्या त्यांच्या जागी नवे, सकारात्मक विचार आणावेत.

याचे सध्याचे उदाहरण द्यायचे झाले तर रोज कोरोना या महामारीने किती जणांचा मृत्यू झाला या दूरचित्रवाणीवरील वृत्ताने भयकंपित होण्यापेक्षा रोज किती रुग्ण रोगमुक्त होऊन घरी गेले या वृत्ताने आशावाद जागवावा की – हा आजार म्हणजे मृत्यू नाही, त्यावर मात करणे शक्य आहे. विचार जितके प्रबळ असतात तितकी त्यांची सत्यात येण्याची शक्यता वाढते. विचारांना जितकं केंद्रित करू आणि जशी दिशा देऊ तितके ते यशस्वी होतात. छांदोग्य उपनिषदात उद्दालका आणि श्वेतकेतू यांच्यातील एका संवादात असा उल्लेख आहे की आपण जे अन्न भक्षण करतो (अन्न म्हणजे निव्वळ भोजनातील पदार्थ नव्हे तर पंचेंद्रियातून आपण जे जे ग्रहण करतो) त्यावरून आपले विचार घडतात. स्वच्छ, नितळ, शुद्ध विचारांची स्वतःची अशी एक प्रभावी संस्कृती असते. अशा विचारांची व्यक्ती ऐकणार्‍या श्रोत्यांच्या मनावर गारुड करू शकते. हजारो माणसांचे विचार/जीवन बदलण्याची शक्ती शुद्ध विचारांमध्ये असते. उदात्त विचारांचे आयुष्य दीर्घ असते. ते जखमा भरून त्यावर खपली धरू शकतात. विशेषतः योगी पुरुषाच्या भात्यातील ते अत्यंत शक्तिशाली अस्त्र असते. सर्व संतांचे विचार म्हणूनच शिरोधार्य असतात. विधायक विचार आमुलाग्र बदल घडवून आणू शकतात. या विचारांना वजन असते, आकार, रंगरूप असते, आणि गुणवत्ताही असते. योगी व्यक्तींना विचार दिसत असतात. त्यांनी विचारांचा उगम कसा होतो याबाबत मार्गदर्शन केले आहे. विचार इच्छेमधून प्रथम निर्माण होतात. वैश्विक आत्म्याच्या लहरींचे रूपांतर स्पंदनांमध्ये होते. मात्र हे गूढ आजही मानवी मनाच्या आवाक्याबाहेरचे आहे. विचार प्रवास करतात, नवनिर्मिती करतात त्यामुळे विश्वातील ही सर्वात मोठी गूढ शक्ती आहे. आपण विचारांच्या विश्वात राहात असतो. त्या विचारांचे व्यक्त होणे मुखातून संभवते आणि त्यातील शक्ती इतरांपर्यंत पोहोचू शकते.

आपला चेहेरा ग्रामोफोनच्या तबकडीसारखा असतो – आतील विचार त्यांवर कोरलेले असतात. विचारांच्या छिन्नीचे व्रण आपला चेहेरा मिरवत असतो. लहानग्याचा आणि संतांचा चेहेरा निरागस असतो कारण त्यांच्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नसतात. असे चेहेरे वाचायला सोपे असतात. विचारांवरून मनाच्या आरोग्याचे निदान करता येते. दिल की बात बता देता हैं – असली नकली चेहेरा| चेहेरा मनाचा साचा असतो आणि प्रत्येक विचाराचे घाव त्यांवर कोरले जातात. दैवी विचार चेहेर्‍याला उजळून टाकतात आणि दुष्ट विचार काळवंडून टाकतात. त्यानुसार आपले आभामंडळ ठरत असते. चेहेर्‍यावर सगळं नोंदलं जातं आणि त्याचा लेखाजोखाही ठेवला जातो. मनानुसार शरीर प्रतिसाद निर्माण करीत असते. मनात उंचावरून उडी मारण्याचा विचार आला की शरीरात आपोआप भीतीची लहर उठते आणि बाह्यरूपात ती प्रकटते. विचारांचे स्वतःचे असे काही नियम असतात आणि आपण ते समजून घ्यायला हवेत. तरच येथे आपले जगणे सोपे होऊ शकेल. जीविताचे ध्येय गाठण्यासाठी लागणारी विचारांची शिदोरी त्यामधूनच सापडेल. आपल्याभोवती जर वैरभाव आणि विद्वेषाचे वारे वाहत असतील तर त्यांचा प्रभाव सकारात्मक विचारांमधून कमी करता येईल. काळजी घेत स्वतःला सावरले तर अशा विरुद्धार्थी प्रवाहांमधून सहज पार जाता येईल. जहाजाच्या कप्तानाला समुद्राचे ज्ञान असते, वार्‍यांची गती आणि दिशा ज्ञात असते, प्रवाहाचे मार्ग माहीत असतात तेव्हाच तो जहाज कोणत्याही वादळातून लीलया पार नेऊ शकतो. तद्वतच जीवनाच्या हुशार नावाड्याला विचारांचे कायदेकानून माहित असणे आवश्यक असते. ते एकदा कळले की स्वतःचा मार्ग ठरविता येतो. तुम्ही जे ठरविता तसेच होता हा विचारांचा एक नियम आहे. मन चिंती , ते वैरी ना चिंती हा दुसरा कायदा आहे. एखाद्याला त्रास होईल असे कृत्य तुमच्या हातून झाले तर तुम्हालाही वेदना होतील. स्वतःच्या विचारांचे सतत काळजीपूर्वक निरीक्षण करता आले पाहिजे. मग मनाच्या कारखान्यातील वृत्तींचा, स्वभावविशेषांचा छडा लावता येतो. रोगट, अनावश्यक, त्रासदायी विचारांना मनाच्या दारातच प्रतिबंध करता येतो. विचार सामर्थ्याचा पूर्णांशाने वापर करायचा असेल तर विचार कंपने कशी कार्य करतात, विचार-नियमन कसे साध्य करायचे, विचार लाटांद्वारे दूरवर उपयुक्त विचार कसे पाठवायचे याचा अभ्यास हवा. चुकीचा विचार बंधनात बद्ध करतो आणि चांगला विचार मुक्त करतो. त्यातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो, आरोग्य (शारीरिक आणि मानसिक) सांभाळता येते. मात्र वाईट विचार मनाद्वारे मेंदूत प्रवेश करून तेथे रासायनिक बदल (सध्याच्या भाषेत केमिकल लोचा) घडवून आणतात. शरीरातील पेशींवर त्यांचा विपरीत परिणाम होऊन हृदय, किडनी, पोट अशा अवयवांचे विकार सुरु होतात. आपल्या पुराणांमध्ये विचारांचे सामर्थ्य किती असते याची काही उदाहरणे आहेत- शाप आणि वर हे दोन्ही शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. एखादा ऋषी संतुष्ट होऊन वर देतो आणि त्याच्या वचनातील शक्ती अशक्य ते शक्य करून दाखविते. याउलट खूपवेळा रुष्ट होऊन किंवा क्रोधीत होऊन शाप दिल्याच्या कथाही आपणांस माहित आहे. या शापामुळे ती व्यक्ती दग्ध होते, तिचे नुकसान होते, तिला शिक्षा मिळते. आणि मग क्षमा मागितल्यावर उ:शाप ही मिळतो आणि चुकीचे परिमार्जन होते. सकारात्मकतेच्या तत्वज्ञानात विचार हे मानसिक आरोग्याचे निर्देशक मानले जातात. वेदना, अडचणीच्या प्रसंगी आपले आरोग्य पुनर्स्थापित करण्यासाठी, आपली निरोगी वाढ होण्यासाठी विचार मदत करतात.

त्यासाठी तीन मार्ग आहेत- १) दुःखाकडे, वेदनेकडे विकासाचे हत्यार म्हणून पाहणे. २) टोकाच्या भावनांचा सहज स्वीकार करणे. ३) सामोपचाराचे/समेटाचे सर्व दरवाजे उघडे ठेवणे. आजकाल आपण आजारपणाचे प्रारूप (मॉडेल) ही संकल्पना मागे टाकली आहे, त्याऐवजी रुग्णांना बळ देणारी, उभं करणारी विचारसरणी समोर आली आहे. आता मनोविकार तज्ञ या संबोधनाऐवजी मनोविकास तज्ञ हे पद पुढे आले आहे. मानसिक अनारोग्य शब्दाऐवजी आपण मानसिक आरोग्याकडे अधिक बारकाईने लक्ष देत आहोत. या बदलाचा फायदा रुग्णांसाठी महत्वपूर्ण आहे. किमान औषधोपचार आणि त्याहीपेक्षा अधिक वागणं/बोलणं या वर इलाज असं तंत्र आता विकसित झालं आहे. सकारात्मक मानसिकता, अनुभव, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, गुणविशेष असं सगळं काही नवं आपल्या आसपास वेगाने पसरतं आहे. प्रतिबंध हा उपचारांपेक्षा अधिक प्रभावी असतो यावर आता एकमत झालं आहे. ह्या सगळ्या अभ्यासाचा केंद्रबिंदू असतो माणसांना अधिक चांगले जीवन जगण्यास मदत करणे! त्यासाठी त्यांचे विचार, भावना, कृती आणि वर्तन यांच्यात समन्वय साधणे आवश्यक असते! नाठाळ विचारांना लगाम घालणे जरुरीचे असते अन्यथा ते इतःस्ततः बेफाम उधळतात. व्यक्ती तितक्या प्रकृती हे जरी सत्य असलं तरी प्रत्येकामधील विचार सदिश करणे शक्य आहे, त्यांना प्रबळ करणे शक्य आहे. त्यांचा व्यवस्थित अंतर्वेध घेता आला की बरंचसं काम उरकतं. मनाचे श्लोक आता विचारांचेही श्लोक व्हायला हवेत.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..