संवादासाठी किमान दोन अथवा अधिक व्यक्तींची जरुरी असते. एकट्या व्यक्तीचा संवाद घडत नसतो, तर ते स्वगत असतं. स्वगतामध्ये मनांत आलेले विचार हे स्वतः पुरतेच मर्यादित राहतात. त्या विचारांचं प्रकटीकरण इतरांपर्यंत पोहोचत नाही. प्रत्येक संवादांत क्रिया व प्रतिक्रिया महत्वाच्या असतात. एकप्रकारे घडलेल्या संवादाला मिळालेला तो प्रतिसाद असतो. संवाद म्हणजे व्यक्त होणं, आपल्या अंतर्मनांत आलेले विचार तोंडानं अथवा देहबोलीतून प्रदर्शित करणं.
मनांत येणाऱ्या अनेक विचारांना वाट करून देण्याची गरज असते, त्यांना मोकळं करण्याची जरुरी असते. बोलून दाखवलेल्या मनांतील विचारांमुळे मनावरचा ताण हलका होतो. आपल्या मेंदूत साठवलेले, आठवलेले अनेक विचार, विषय ड्रेन करण्याची आवश्यकता असते. जसं, सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजचा वापर करावा लागतो, अगदी तद्वतच मनांत आलेल्या विचारांना देखील अधूनमधून ड्रेन करणं जरुरीचं असतं. संवाद हा माणसाच्या जीवनात निरंतर असावा लागतो.
सुयोग्य पध्दतीनं, नेमकेपणानं केलेल्या संवादामुळे त्या व्यक्तीला समाजात सन्मानाचं स्थान मिळतं. केवळ बोलणं म्हणजे संवाद होत नाही. निरुद्देश, निरर्थक केलेली वायफळ बडबड ऐकायची कोणाचीही इच्छा नसते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. काही जणांना एकतर्फी बोलत राहण्याची सवय असते; आपलं बोलणं समोरच्याला कळतंय का? पटतंय का? त्यात रस वाटतोय का? त्यासंदर्भात काही बोलायचं आहे का? हे पाहण्याचं भान काहीजणांमध्ये नसल्याचं दिसून येतं. संवाद कौशल्यासाठी आपली भाषा समृध्द होणं गरजेचं असतं, व्याकरणाचं सखोल ज्ञान आपल्याला असायला हवं.
– विद्यावाचस्पती विद्यानंद
Leave a Reply