नवीन लेखन...

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवतगीता : अध्याय २ : श्लोक १६.

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः |

उभयोरपि दृष्टः अन्तः तु अनयोः तत्त्वदर्शिभिः ||गीता २ : १६ ||

न..कधीच नाही, असत..जे खरे नाही ते किंवा जे अशास्वत आहे ते, विद्यते..आहे, भाव:..चिरस्थायित्व, अभाव:..बदलण्याचा गुणधर्म, सत:..जे शास्वत आहे त्याचा, उभयो:..दोहोंचा, अपि..खरोखरच, दृष्ट:-पाहिलेला, अंत:..निर्णय निष्कर्ष, तु..निस्संदेह, अनयो:…या दोन्हींचा, तत्त्वदर्शिभि:.. साक्षात्कारी पुरुषाद्वारा.

जे असत आहे, अशाश्वत आहे, जे खरे नाही ते (भौतिक शरीर) चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत आहे, शाश्वत आहे, खरे आहे (जीवात्मा) ते कधीच बदलत नाही.. या दोन्हींच्या स्वरूपाचा अभ्यास करून तत्त्वदर्शी विचारवंतांनी असा निष्कर्ष काढला आहे.

या श्लोकाचा असाही अर्थ निघतो….जे अशाश्वत आहे त्याला अस्तित्व नाही आणि जे शाश्वत आहे त्याचे अस्तित्व कधीच संपत नाही. सत्यशोधक विचारवंतांना हे सत्य पूर्णतया समजले आहे.

गीता लिहून ५ हजार वर्षे झाली आहेत. या काळात हजारो विचारवंतांनी, गीतेतील श्लोकांचा, त्यांच्या बुध्दीला भावेल असा अर्थ लावला आहे. आणि तो अधिकारवाणीने जनतेला सांगितला आहे याची कृपया नोंद घ्यावी. यातला नेमका कोणता आशय, महर्षि व्यासांना अभिप्रेत होता हे समजणे कठीण आहे. आता, गीतेत विज्ञान शोधण्याचा मी प्रयत्न करतो आहे. बरेच शास्त्रज्ञ असाच प्रयत्न करीत आहेत. तरीपण त्यांच्या दृष्टीकोनात फरक असणारच.

अध्यात्मिक दृष्टीकोनातून अन्वयार्थ :: सजीवांची शरीरे, जन्मल्यापासून वाढत असतात, तारुण्यात ती स्थिर भासत असली तरी ती सतत बदलत असतात. व्यक्तीचे शरीर, मन आणि बुध्दी सतत बदलत असली तरी जीवात्मा नित्य स्थायी असतो, बदलत नाही. जीवात्मा हे शाश्वत आहे तर शरीर हे अशाश्वत आहे. शाश्वत कधीच नाश पावत नाही तर अशाश्वताला अस्तित्वच नसते.

विष्णूपुराणात असे सांगितले आहे की, विष्णू व त्याचे धाम यांना स्वयंभू असे अस्तित्व आहे. पूजक व पूजनीय, नियंत्रित व नियंत्रक, अंश व अंशी, अंश आणि पूर्ण यांच्यातील संबंधाप्रमाणे जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध असतो. जीव हे नेहमी भगवंताच्या आधीनच असतात.

विज्ञानीय दृष्टकोनातून अन्वयार्थ :: सजीवांचे शरीर नाशवंत आहे यात वादच नाही. शरीराच्या नाशाबरोबरच त्यात असलेले आनुवंशिक तत्वही नाश पावते आणि ही दोन्हीही पर्यावरणात मिसळून जातात. परंतू त्या प्रजातीचे आनुवंशिक तत्व मात्र नाश पावत नाही. कसे ते जाणून घ्या.

नरमादीच्या मीलनाशिवाय गर्भधारणा होत नाही हे सत्य आपल्या पूर्वजांना माहित होतं. आईवडिलांचे काही गुणावगूण अपत्यात येतात हेही त्यांनी केलेल्या निरीक्षणांवरून त्यांना समजलं होतं. विज्ञानाने आता या निरीक्षणांचा कार्यकारणभाव खात्रीपूर्वक उलगडला आहे.

वडिलांकडून (मानवी नराकडून) येणार्‍या शुक्राणूत, २३ गुणसूत्रे सामावलेलं आनुवंशिक तत्व असतं तसेच आईकडून (मानवी मादी्कडून) येणार्‍या बीजांडात देखील २३ गुणसूत्रे सामावलेलं आनुवंशिक तत्व असतं. शुक्राणू आणि बीजांड यांचा संयोग झाला म्हणजे गर्भधारणा होते आणि अपत्याचा गर्भपिंड निर्माण होतो. या गर्भपिंडात ४६ गुणसूत्रांच्या स्वरूपात, अपत्याचे सर्व आनुवंशिक गुणावगुण सामावलेले असतात. या ४६ गुणसूत्रांचा संच, अपत्याच्या जन्मापासून ते मरेपर्यंत, प्रत्येक पेशीत कायम असतो.

आता जरा विचार करा. वडिलांच्या शुक्राणूतील आनुवंशिक तत्व कसं आलं? तर ते त्यांच्या आईवडिलांकडून आलं. म्हणजे ते त्यांच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यातून आलेलं असतं. तसंच आईच्या बीजांडातील आनुवंशिक तत्व तिच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांकडून आलेलं असतं. अशारितीने मागे मागे जात गेले तर, आनुवंशिक तत्वाचे अस्तित्व, पृथ्वीवर सजीव निर्माण झाले तोपर्यंत पोचते. आणि ते, भविष्यकाळात, जोपर्यंत या पृथ्वीवर सजीव जगू शकतील तो पर्यंत ते पुढील लाखो पिढ्यात संक्रमित होईल. म्हणजेच आनुवंशिक तत्व अविनाशी असून, ते एका जिवंत शरीरातून दुसर्‍या जिवंत शरीरात संक्रमित होते. तोच जीवात्मा.

आनुवंशिक तत्वात, गुणसूत्रे (क्रोमोसोम्स), जनुके (जीन्स) आणि डीएनए/आरएनए (DNA/RNA) यांचा समावेश असतो. आणि ते जनक पिढ्यांतून अपत्य पिढ्यांत संक्रमित होते.

शुक्राणू आणि बीजांड यांच्या संयोगाशिवाय सजीवाचे शरीर निर्माण होत नाही. म्हणजेच आईवडिलांकडून आलेल्या आनुवंशिक तत्वाशिवाय गर्भाचे शरीर निर्माण होत नाही. या सत्यघटनेच्या आधारेच जीवात्मा आणि सजीवांचे शरीर यांचा अन्योन्य संबंध समजणे सोपे होते.

सजीव प्रजोत्पादनक्षम झाला म्हणजे तो अपत्यांना जन्म देऊन आपल्या जिवंत शरीरातील आनुवंशिक तत्व दुसर्‍या जिवंत शरीरात संक्रमित करतो. अशा रीतीने आनुवंशिक तत्वाचा प्रवास पुढच्या पिढ्यात चालू राहतो. म्हणूनच मातापित्यांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व मरणोत्तर नाहीसे झाले तरी आनुवंशिक तत्व पुढील पिढीत आधीच गेलेले असते. नदीच्या प्रवाहातून एक बादली पाणी घेतले तरी नदीचा प्रवाह थांबत नाही. किंवा झाडाची एक फांदी तोडली तर तिला येणार्‍या फळांची निर्मिती होणार नाही. परंतू इतर फांद्यांना येणार्‍या फळांमुळे त्या झाडाच्या बिया निर्माण होतील आणि त्या झाडाच्या प्रजातीचे आनुवंशिक तत्व पुढच्या पिढीत जाऊन प्रजातीची वाढ होईल.

पृथ्वी सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली असावी असे शास्त्रज्ञ सांगतात. त्यावेळी ती तापलेल्या वायूंचा गोळाच होती. या वायूत, पृथ्वीवरील सर्व मूलद्रव्यांच्या वाफा होत्या. नंतर तिचे तापमान उतरू लागले. कोट्यवधी वर्षानंतर, धातूंच्या खाणी, खडक आणि वातावरण निर्माण झाले. शेवटी द्रवरूप पाणी आणि महासागर निर्माण झाले. तेव्हा कुठे पृथ्वीवर सजीव जगू शकतील अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली. सजीव निर्मितीस आवश्यक असलेले घटक म्हणजे कार्बनी संयुगे, अमायनो आम्ले वगैरे, पृथ्वीबाहेरील अवकाशातून आली आणि पुनरुत्पादनक्षम असे रेणू तयार होऊ लागले. हेच ते आनुवंशिक तत्व किंवा सजीवांच्या शरीराचा आत्मा. आनुवंशिक तत्वच सजीवाचे शरीर धारण करते. आनुवंशिक तत्व म्हणजे पुरूष आणि शरीर म्हणजे प्रकृती. आनुवंशिक तत्व म्हणजे नियंत्रक आणि शरीर म्हणजे नियंत्रित.

(सजीवांच्या निर्मितीपूर्वीची पृथ्वी)

गीतेच्या या श्लोकाच्या अध्यात्मिक अन्वयार्थात सांगितलेले प्रकाशमय विष्णूधाम म्हणजे पृथ्वीबाहेरील अवकाश.

आनुवंशिक तत्व मात्र उत्क्रांतीमुळे बदलते म्हणूनच या पृथ्वीवर कोट्यवधी प्रजाती निर्माण झाल्या. शेवटचे उत्क्रांत आनुवंशिक तत्व मानवाचे आहे याची पूर्ण कल्पना रुशीमुनींना होती.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..