नवीन लेखन...

विद्वान सर्वत्र पूज्यते

‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ अशी ओळ एका संस्कृत श्लोकात आहे. विद्वानांना सर्व ठिकाणी सन्मान मिळतो असा त्याचा अर्थ. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास असलेला त्या विषयात विद्वान समजला जातो. विद्वत्ता आणि बुध्दिमत्ता वेगळ्या गोष्टी आहेत. बुध्दिमत्तेला अनेक पैलू असल्याचे लक्षात आले आहे. नुसत्या IQ वरून बुध्दिमत्तेचे मोजमाप होऊ शकत नाही हेही समजले आहे. तसे विद्वत्तेला पैलू आहेत का? विद्वत्ता कशी मोजायची? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. जन्म, शारिरिक व मानसिक वाढ, बालपण, शिक्षण सामान्यपणे झालेली एखादी व्यक्ती एखाद्या विषयात नैपुण्य मिळविते, विद्वान बनते व समाजात प्रसिध्द पावते. पण काही कारणाने मेंदूची नीट वाढ न झालेले व त्यामुळे बालपण, शिक्षण अशा रूढ चाकोरीपासून दूर राहिलेले बालकसुध्दा पुढे एखाद्या क्षेत्रात असामान्यत्व दाखविते. ‘विद्वान’ या शब्दाला Savant असा इंग्रजी शब्द आहे. मानसिक व्यंग असलेले, 70 पेक्षा कमी IQ असलेले पण कुठल्यातरी क्षेत्रात अद्वितीय कौशल्य जे दाखवितात अशा विद्वानांना Savant Syndrome या दुर्मिळ गटातील मानले जाते.

डॉ. डॅरॉल्ड ट्रेफर्ट हे मानसोपचार तज्ञ या विषयातील संशोधक आहेत. त्यांचे Islands of Genius हे पुस्तक प्रसिध्द आहे.

Daniel Tammet

या पुस्तकासाठी उपोद्घात (Foreword) डॅनियल टॅमेट याने लिहिला आहे. टॅमेटची पुढे ओळख होईल. दैनंदिन जीवनात न वापरली जाणारी कौशल्ये (Splinter Skills) या गटातील लोकांमध्ये दिसतात. या प्रकारातील जवळपास निम्मे Autism Spectrum Disorder चे असतात. अशा माणसांमध्ये कुठलेतरी एक वैशिष्ठ्य असते, कोणतीतरी शलाका असते पण ती शोधणे सर्वांच्या बाबतीत शक्य नसते. स्वमग्नतेची (Autism) व्याधी जडलेल्यांपैकी 10 टक्के रुग्ण Savant Syndrome गटात असल्याचे दिसून येते. या लोकांनी ही कला शिकून आत्मसात केलेली नाही हे आपल्याला माहित आहे. मग याचा उगम कसा झाला? हे अजून समजलेले नाही.

 

कलाकाराच्या मेंदूतील जोडण्या जन्मजात नसतात, त्या जुळाव्या लागतात. संगीत शिकताना रियाज, चित्र काढताना सराव याशिवाय सर्वसामान्य बुध्दिमत्तेचा माणूस कलाकार होत नाही. रियाज आणि सराव हे मेंदूतील मज्जापेशींच्या जोडण्या घट्ट करण्यास आवश्यक असतात. मग कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय वा रियाजाशिवाय, कोणत्याही अभ्यासाशिवाय वा सरावाशिवाय, Savant Syndrome या गटातील माणसांना ही कला कशी प्राप्त होते? मेंदूविज्ञानापुढील हे प्रश्न आहेत. अशा रुग्णांच्या डाव्या मेंदूला इजा झालेली असते वा त्याची वाढ झालेली नसते. या माणसांची बहुतेक कौशल्ये ही उजव्या मेंदूशी निगडित असतात. संगीत, चित्रकला, बहुभाषिकत्व, कॅलेंडरशी संबंधित तारीख-वाराचे गणित, कालमापन यामध्ये ते पारंगत असतात, पण त्यांना साधे गणित सोडवणे जमत नाही. शास्त्रज्ञ व डॉक्टर संशोधनाद्वारे हे कोडे नक्कीच उकलतील.

जगप्रसिध्द विद्वान
आपल्या पाहण्यात मानसिक व्यंग असलेली माणसे असू शकतात. काहींना जन्मजात व्यंग असते तर काहींना नंतरच्या काळात एखाद्या प्रसंगी व्यंग येते. अशांपैकी या काही व्यक्ती जगप्रसिध्द आहेत.

1) किम पीक (Kim Peek)
किम पीकच्या मेंदूचा डावा व उजवा हे भाग जोडणारा Corpus Callosum अस्तित्वात नव्हता. त्याला बायबलसह 12,000 ग्रंथ पाठ होते. संगीत, साहित्य, खेळ अशा जवळपास 15 विषयांमधे तो तज्ञ होता. तो डाव्या डोळ्याने पुस्तकाचे डावीकडील पान व उजव्या डोळ्याने उजवीकडील पान वाचून लक्षात ठेऊ शकत असे. (Rain Man या सिनेमातील पात्र ‘ऑटिस्टिक’ दाखविले आहे, पण किम तसा नव्हता)

2) लेस्ली लेम्के (Leslie Lemke)
पूर्ण वाढ होण्याआधी जन्म झालेल्या लेस्लीच्या मेंदूला इजा झाली होती. त्याचे डोळे काढावे लागले होते. एकदा सोळा वर्षाच्या लेस्लीने टी.व्ही वर लागलेली पियानोवरील एक धून ऐकली. रात्री झोपेतून उठून त्याने ती वाजवली. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय एकदा ऐकलेले गाणे तो वाजवीत असे. संगीताविषयी रुची असल्याचे तोपर्यंत कोणतेही लक्षण त्याच्यात दिसले नव्हते. पुढे तो जाहीरपणे व टी. व्ही. वर कार्यक्रम करू लागला.

3) स्टीफन विल्टशायर (Stephen Wiltshire)
विल्टशायरला Autism Spectrum Disorder ने ग्रासले होते. स्वतःच्या विश्वात रमणारा, बोलू न शकणारा विल्टशायर चित्रांच्या माध्यमातून संवाद साधत असे. त्याला ‘मानवी कॅमेरा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. एकदा पाहिलेले दृश्य विलक्षण बारकाव्यांसह त्याच्या चित्रात उतरत असे. हेलिकॉप्टरमधून शहराचे दर्शन घेतले की नुसत्या स्मरणातून त्याच्या चित्रात इमारतीच्या मजल्यांसह खिडक्यांची संख्याही जशीच्या तशी दिसे. इ.स. 2005 मधे त्याने काही वेळ हेलिकॉप्टरमधून टोकियो शहर पाहिले व टोकियोचे 10 मीटरचे लँडस्केप अचूकपणे काढले. त्याने रोम, न्यूयॉर्क आणि सिंगापूर या शहरांची चित्रेही काढली आहेत.

4) डॅनियल टॅमेट (Daniel Tammet)
डॅनियलला 11 भाषा बोलता येत होत्या. एका आठवड्यात आइसलँडिक (ही खूप अवघड भाषा आहे) भाषा बोलायला शिकण्याची पैज त्याने जिंकली. आइसलँडिक टेलिव्हिजनवर त्याची मुलाखत झाली, अर्थात डॅनियल अस्खलित आइसलँडिकमधे बोलला. तो भाषेतील व आकड्यातील तज्ञ होता. डॅनियलने जेव्हा Pi () ची किंमत 5 तासात 22,514 स्थानांपर्यंत अचूक सांगितली तेव्हा त्याला प्रसिध्दी लाभली. तो संख्या व आकडेमोड ‘पाहू’ शकत असे. पहिले दहा हजार (10,000) अंक आकार, रंग, पोत व स्पर्श यासंकल्पनांद्वारे तो ओळखत असे. या दुर्मिळ क्षमतेला Synesthesia म्हणतात.

5) एलेन बोद्रो (Ellen Boudreaux)
एलेन डोळ्यांनी अधू आहे. तिच्या ठायी ‘रडार’ ची क्षमता आहे असे दिसते. ती चालताना पक्षांसारखे काही ध्वनी काढते, वाटेतील वस्तूंवर आदळून परतणार्‍या आवाजाचा अंदाज घेते व न अडखळता चालते. दिवसभरात कोणत्याही वेळी सेकंदापर्यंतची अचूक वेळ आठव्या वर्षापासून ती सांगू लागली. एकदा ऐकलेले गाणे ती जसेच्या तसे वाजवते.
वरीलपैकी काही जण आज हयात नाहीत.

पुढील व्यक्ती जगप्रसिध्द नाहीत, पण विद्वान आहेत.

  1. एक मुलगा सात-आठ आकडी संख्या काही क्षणात 24 वेळा दुप्पट करू शकतो.
  2. एक मुलगी 20 फुटापर्यंत अंतरावरील वस्तूच्या आकाराचे मोजमाप अचूकपणे सांगू शकते.
  3. एकाला अनेक भाषा बोलता येतात पण त्या वाक्यांचा अर्थ त्याला समजत नाही.

अशा कलाकारांना, कसबी व्यक्तींना समाजात इतर लोकांप्रमाणे मान-सन्मान मिळाला तर अनेक कुटुंबे मुख्य समाजाच्या प्रवाहात येतील व त्यांना स्थैर्य लाभेल. या मुलांची आपापल्या विषयातील क्षमता लक्षणीय आहे. पण यांचा IQ 50 हून अधीक नाही व यांना बुटाची नाडीही बांधता येत नाही. मानसिक वाढ नीट न झालेले हे रुग्ण आहेत. मी मात्र यांना ‘विशेष देणगी’ प्राप्त झालेले विद्वान समजतो.

 

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

4 Comments on विद्वान सर्वत्र पूज्यते

  1. वाचून एक वेगळीच माहिती मिळाली.
    माझे तर असे ठाम मत आहे की प्रत्येकालाच एक विशिष्ठ असे वरदान मिळाले आहे
    काहींना ते माहित असते काहींचे इतर जण ओळखून त्यांना पुढे आणतात.
    बऱ्याच जणांच्या आपण एकतरी क्षेत्रात निपुण आहोत हे ही शेवटपर्यंत कळत नाही

  2. Ravi,nice article.l wonder how you mastered the subject like neurology though your sphere of academic study is totally different.you are genious.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..