रविवार १२ फेब्रुवारी २०१२.
दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग येतात किंवा घटना घडतात पण त्या आपल्याला इतक्या सामान्य वाटतात की त्यांचे असामान्यत्व आपल्याला कळतच नाही. आता हेच पहा ना जेवणाच्या टेबलावर काही केळी राहिली होती. ताबडतोब त्यांच्यावर दहाबारा बारीकबारीक चिलटे आली. मी हाताने ती उडविली पण ती केळ्यानवर पुन्हा बसली आणि जेवू लागली. हो, त्यांची ती मेजवानीच.
किती साधी घटना !!! पण जेव्हा मी त्याबद्दल विचार करू लागलो तेव्हा लक्षात आले की ही एक असामान्य नैसर्गिक घटना आहे.
या चिलटांचा आकार, जेमतेम १ मिलीमीटर पेक्षाही कमी होता. इतक्या लहान आकारात, निसर्गाने किती कौशल्याने आणि किती पूर्णत्वाने त्यांचे अवयव बसविले होते आणि किती परिपूर्णावस्थेत विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केला होता की त्याबद्दल विचार केल्यास आपली बुद्धी कुंठीत व्हावी.
१. त्यांच्या अन्नाची जागा, म्हणजे केळी, त्यांनी कशी शोधली? त्यांच्या डोळ्यांना प्रथम ती केळी दिसली, नंतर वास आणि चव या इंद्रियांनी ते पडताळून नक्की निदान केले? आता जेमतेम १ मिलीमीटर आकाराच्या त्या चिलटाचा मेंदू तरी केव्हढा असावा? डोळा, डोळ्याचे भिंग, नेत्रपटल, मेंदूतील दृष्टी केंद्र वगैरे अवयव अगदी लहान असले तरी किती कार्यक्षम होते.
२. सजीवांना उर्जेची गरज आहे हे निसर्गाने बरोबर ओळखले. अन्न, म्हणजे वनस्पती किवा दुसर्या प्रजातीच्या सजीवांचे मांस, हा जीवरासायनिक उर्जेचा स्त्रोत होऊ शकेल हे निसर्गाने कसे ओळखले? ते अन्न खाण्यासाठी तोंड आणि पचन संस्था कशी निर्माण केली? समोर दिसलेले पदार्थ हा आपला आहार आहे, हे दृष्टी, वास, चव आणि स्पर्श या इंद्रियांनी, आणि पूर्वीच्या अनुभवावरून पडताळून मगच भक्षण करण्याची बुद्धी किंवा विवेक कसा प्राप्त झाला?
३. आहार मिळविण्यासाठी पृथ्वीवर हालचाल करावी लागेल, काही वेळा हल्ला करावा लागेल किंवा काही वेळा प्रतिकारही करावा लागेल याची सोयही निसर्गाने केली आहे. पाय आणि पंख या साधनांची आवश्यकता हेरली आणि त्याप्रमाणे योजनाही केली.कीटकांच्या पंखांना पिसे नसतात आणि उडतांना त्यांची, वरखाली होण्याची क्रिया, एखाद्या यंत्रासारखी जलदरित्या होते. डासांच्या उडण्यामुळे ऐकू येणारी गुणगुण, ही, त्यांच्या पंखांच्या जलद हालचालीमुळेच निर्माण होते.
४. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाविरुद्ध क्रिया केली म्हणजे हवेच्या प्रतिक्रियेमुळे, शरीर हवेत उचलता येईल हे विज्ञानीय तत्व निसर्गाला कसे समजले? आणि त्यानुसार, कीटकांच्या किंवा पक्ष्यांच्या शरीरात उपाययोजनाही कशी केली गेली?
५. कीटकांच्या पायात मांसाचा लवशेषही नसतो पण मेंदूपर्यंत संवेदना पोचविण्याची यंत्रणा असावी. कारण त्यांना तापमानातील बदल आणि पायाखालचे हादरे याची जाणीव होते. उष्णता लागली किंवा जमिनीला हादरे बसले की मुंग्या आणि कीटक सैरावैरा पळू लागतात.
६. प्रत्येक सजीवाला आपापली प्रजाती कशी वाढवावी याची उपजत जाण असते. जननक्षम झालेल्या प्रत्येक सजीवाला आपला जोडीदार हुडकून काढण्याची यंत्रणाही आनुवांशिकतेनुसार पुढच्या पिढीत संक्रमित झालेली असते. संभोग यशस्वी होऊन गर्भधारणा होऊन, गर्भाचा जन्म होईल अशीही यंत्रणा निसर्गाने सिद्ध केली आहे. केळ्यानवर बसलेल्या चिलटात, नरमाद्या असतीलच, त्यांची जननेंद्रिये केव्हढी असणार? निपजणारी अंडी केव्हढी असणार? त्यातून बाहेर आलेली पिल्ले मोठी होतातच. त्यांनी आपल्या प्रजातीची वाढ, गेली लाखो वर्षे चालू ठेवली आहे हे केव्हढे आश्चर्य?
७. प्रत्येक सजीवाच्या शारीरिक क्रिया, त्याच्या शरीरात असलेल्या आनुवंशिक तत्वामुळेच होतात हे निर्विवाद सत्य आहे. त्यामागे एक आनुवंशिक आज्ञावलीही असते हेही निर्विवाद सत्य आहे. या व्यतिरिक्त आणखीही जबरदस्त आज्ञावलीही कार्यरत असावी की त्यामुळे, आनुवंशिक तत्व, आनुवंशिक आज्ञावल्या पुढच्या पिढीत संक्रमित होतात.
८. सजीवांच्या शरीरात असलेल्या आनुवंशिक तत्वाचा शोध, ३.५ अब्ज वर्षांपूर्वी त्याचे या पृथ्वीतलावर अवतरण आणि एव्हढ्या प्रदीर्घ काळपर्यंत त्याचे टिकून राहणे, इतकेच नव्हे तर कोट्यवधी प्रजाती निर्माण होऊन मानवाच्या निर्मितीपर्यंत झालेली वाटचाल हे एक फार मोठे, मानवाच्या मेंदूच्या मर्यादे पलीकडले गूढ आहे.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply