विजय तेंडुलकर यांचे वडील हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. विजय तेंडुलकर यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी झाला. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्याभारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. पुण्यात आणिमुंबईत त्यांचे वास्तव्य होते. १९६६ नंतर मात्र ते मुंबईतच राहिले व तेथे त्यांनी आपली व्यावसायिक कारकीर्द घडवली. १९५५ पासूनच त्यांनी लेखन सुरू केले. चरितार्थासाठी प्रारंभी त्यांनी पत्रकारितेचा पेशा स्वीकारला. नवभारत, मराठा, लोकसत्ता, नवयुग, वसुधा आदी वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून त्यांनी सदरलेखनाचे आणि संपादनाचे काम केले. १९४८ मध्ये ‘आमच्यावर प्रेम कोण करणार’ ही त्यांची कथा पहिल्यांदा प्रकाशित झाली. १९५१-५२च्या सुमारास भारतीय विद्याभवनाने नव्याने सुरू केलेल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने तेंडुलकरांचे नाट्यलेखन सुरू झाले. आकाशवाणीसाठीही त्यांनी नाटके लिहिली. त्यांनी आरंभीच्या काळात निवडलेले नाट्यविषय कौटुंबिक स्वरूपाचे आणि मध्यमवर्गीय जीवनाशी निगडित होते. मा.’विजय तेंडुलकरांनी आपल्या लेखणीने मराठी नाटक रंगभूमीचा चेहरामोहरा बदलून टाकला. नाट्यपरंपरेला छेद देताना विषय, आशय, अविष्कार या संदर्भात त्यांनी अनेक प्रयोग केले.
लेखनदृष्ट्या ‘गृहस्थ’ हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच “कावळ्यांची शाळा’ या नावाने त्यांनी १९६४ साली पुनर्लेखन केले) मात्र ‘श्रीमंत’ हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. ‘सखाराम बाईंडर’ मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि ‘घाशीराम कोतवाल’ मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. ‘श्रीमंत’ या नाटकापासून विजय तेंडुलकर या वादळाची झंझावाती वाटचाल सुरू झाली आणि ‘गिधाडे’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘सखाराम बाईंडर’, ‘घाशिराम कोतवाल’, ‘कमला’ या नाटकांनी मराठी नाट्यसृष्टी अक्षरशः ढवळून निघाली. ‘निशांत’, ‘आक्रोश’, ‘अर्धसत्य’ या चित्रपटांच्या पटकथा तेंडुलकरांच्या लेखणीतूनच साकारल्या. मराठीतही ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘आक्रित’, ‘उंबरठा’ हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. ‘माणूस नावाचे बेट’, ‘मधल्या भिंती’, ‘सरी गं सरी’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘अशी पाखरे येती’, ‘गिधाडे’, ‘छिन्न’ आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्रता यांचे भेदक, पण वास्तववादी उग्रकठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन सघर्षही झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले.
राष्ट्रीय पातळीवर समकालीन नाटककारांच्या पंक्तीत तेंडुलकरांनी अव्वल स्थान पटकावलं होतं. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते. १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, १९७७ मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९८१ मध्ये आक्रोश चित्रपटासाठी फिल्म फेरचा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार; तर १९८३ मध्ये अर्धसत्यसाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्म फेर पुरस्कार त्यांना मिळाला. पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, सरस्वती सन्मान, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, विष्णुदास भावे गौरवपदक, कथा चूडामणी पुरस्कार, पु.ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना मिळाले. १९९८ मध्ये संगीत नाटक अकादमीची अभ्यासवृत्तीही त्यांना मिळाली होती. १९ मे २००८ रोजी मा.विजय तेंडुलकर यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply