नवीन लेखन...

नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता

अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमी यांचे अचूक भान असणा-या प्रतिभाशाली नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला.

विजया मेहता उर्फ बाई हे नाव म्हणजे मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड आहे. फक्त मराठी रंगभूमीच नव्हे, तर हिंदी इंग्रजी नाटकं, दूरदर्शन, चित्रपट याही क्षेत्रांत मा.विजया मेहता वावरलेल्या आहेत. पण त्या खऱ्या रमल्या त्या नाटकातच. विजया मेहता या पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत होत. जवळच्याच नात्यांतील नलिनी जयवंत, शोभना समर्थ व त्यांच्या कन्या नूतन, तनुजा यांच्यामुळे मोहमयी हिंदी चित्रसृष्टीशी जवळचा संबंध येऊन देखील त्यांची भावनिक जवळीक मात्र सतत मराठी रंगसृष्टीशी राहिली.

दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी विवाह झाल्यावर देखील हिंदी चित्रपटांच्या मायाजालामध्ये न गुरफटण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवला हे पहाता ‘आपल्या मराठी रंगभूमीचे नशीब बलवत्तर‘ असेच म्हणावयास हवे. साठ सत्तरच्या दशकांत तेंडुलकर, खानोलकर, एलकुंचवार व इतर समकालीन संवेदनक्षम नाटककारांची, नाट्यक्षेत्रातील तत्कालीन प्रचलित रुढींना सुरुंग लावून आणि प्रमाण मानल्या गेलेल्या प्रस्थापित संकेतांची चौकट नाकारुन वा प्रसंगी धुडकावून देऊन प्रयोगशीलतेला प्राधान्य देणारी, नवनवीन नाटकेएकांकिका ‘रंगायन‘ वा अन्य माध्यमांतून मंचावर आणण्यात बाईंचा आणि त्यांच्या जोडीने अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, माधव वाटवे, कमलाकर सारंग, श्रीराम लागू या त्यांच्या सहकाऱ्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. ‘रंगायन‘ संस्था व त्या अनुषंगाने एक चोखंदळ प्रेक्षकवर्ग सुध्दा उभारुन प्रायोगिक एकांकिकानाटकांची चळवळ त्या काळात त्यांनी दहाबारा वर्षे जोमाने चालवली.

सतत काहीतरी नवीन करण्याचा देण्याचा ध्यास घेतलेल्या विजया मेहता प्रायोगिक समांतर रंगभूमीने त्या काळात अक्षरशः झपाटल्या गेल्या. मात्र पुढे दुर्दैवाने जेव्हा ‘रंगायन‘ अंतर्गत बेबनाव मतभेदांमुळे फुटली तेव्हा प्रायोगिकतेच्या चौकटीतच कायम रहाण्याच्या विचारांचे गाठोडे ओझे ऊराशी न बाळगता व्यावसायिक रंगभूमीवर सुध्दा तितक्याच ताकदीने व उत्साहाने त्या परत कार्यरत झाल्या व स्थिरावल्या. वैयक्तिक जीवनात सुध्दा, लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांतच पदरात दोन लहान मुलं असताना पतिनिधनाचा प्रचंड आघात सोसून व त्यामुळे आयुष्याला मिळालेली विलक्षण कलाटणी पचवून, बाई न खचता परत कंबर कसून उभ्या राहिल्या. पुढे कालौघात फरोख मेहता यांच्याशी पुनर्विवाह करुन त्या पुनश्च स्थिरस्थावर झाल्या.

‘पाश्चांत्य रंगमंचावरील जे भावले ते मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे‘ या भावनेने बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या ‘कॉकेशियन चॉक सर्कल‘चे रुपांतर ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, आयनेस्को यांच्या ‘चेअर्स‘ या एकांकिकेचे अनुवादित रुप ‘खुर्च्या‘ या व अशा इतर काही विदेशी नाट्यकृती त्यांनी मराठी रंगमंचावर आणल्या. याच धर्तीवर ‘मराठी नाटकांतील काही उत्तम कृती सुध्दा पाश्चाकत्य प्रेक्षकांसमोर सादर झाल्या पाहिजेत‘ असा विचार करुन जर्मन दिग्दर्शक फ्रिट्‌झ बेनेव्हिट्‌झ व ब्रिटिश दिग्दर्शक पीटर ब्रुक यांच्या मदतीने ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘मुद्राराक्षस‘, ‘शाकुंतल‘, ‘हयवदन‘, ‘नागमंडल‘ या नाटकांचे प्रयोग मूळ व/वा रुपांतरित वेषात परदेशी मंचांवर सादर केले. भाषिक सांस्कृतिक भौगोलिक मर्यादा ओलांडून त्यांनी मराठी नाटक सीमेपार नेले.

‘श्रीमंत‘, ‘मादी‘, ‘एक शून्य बाजीराव‘, ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘पुरुष‘, ‘बॅरिस्टर‘, ‘महासागर‘, ‘हमीदाबाईची कोठी‘, ‘वाडा चिरेबंदी‘, ‘हयवदन‘, ‘सावित्री‘ अशी अनेक लक्षणीय नाटकेएकांकिका तसेच ‘पेस्तनजी‘, ‘रावसाहेब‘, ‘स्मृतिचित्रे‘ अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती बाईंच्या रेखीव बांधीव दिग्दर्शनाने फुलल्या फुलवल्या. केवळ अर्थकारणाच्या म्हणजेच ‘गल्ल्याच्या गणिता‘च्या दृष्टीने पाहिल्यास यातील बरीचशी चांगलीच तरली तरारली फोफावली असली तरी क्वचित काही बुडाली फसली देखील. मात्र यातील प्रत्येक कृतीवर आपला असा एक वैशिष्ठ्यपूर्ण कलात्म ठसा उमटवून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व बाईंनी निश्चितच प्रस्थापित केले. बाईंनी स्वतःची अशी एक स्वतंत्र पठडी वा घराणं निर्माण केलं.

मराठी नाट्यक्षेत्रातील आजचे अनेक आघाडीचे व प्रथितयश कलाकार त्या काळात बाईंच्या हाताखाली हळूहळू जडतघडत गेले. विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, नाना पाटेकर, रिमा लागू, भक्ती बर्वे, प्रदीप वेलणकर, सुकन्या कुलकर्णी, उदय म्हैसकर, नीना कुलकर्णी अशा अनेक अभिनय निपुण कलाकारांची एक अख्खी नवीकोरी फळी त्यांच्या कुशल दिग्दर्शकीय हातातून तयार झाली. ‘संध्याछाया‘ मधील परदेशस्थ पुत्राच्या विरहाने झुरणारी प्रेमळ कुटुंबवत्सल नानी असो वा ‘बॅरिस्टर‘ मधील केशवपन केलेली आलवण नेसलेली भावनेच्या कोंड माऱ्याने घुसमटणारी मावशी असो किंवा ‘हमीदाबाईची कोठी‘ मधील कोठी संस्कृतीतील गायकी परंपरेचा ऱ्हास असहाय्यपणे पहाणारी हमीदाबाई असो अथवा ‘वाडा चिरेबंदी‘ मधील पति निधनानंतर कोसळणारी नाती व वाड्याचं ढासळणारं गतवैभव पचवणारी विधवा आई असो बाईंनी मात्र समोर हाती आलेल्या भूमिकेला केवळ न्याय आणि संपूर्ण न्यायच दिला.

गोळीबंद संवादफेक, हवा तो परिणाम नेमका साधण्यासाठी संवादांतील लयीवर आणि प्रसंगी शब्दविरामांवर देखील दिलेला भर, चेहऱ्यावर पसरलेले अस्सल हावभाव आणि अचूक देहबोली यातून व्यक्तिरेखा नेमकी पकडून प्रत्ययकारक पणे जिवंत उभी करण्याकडे त्यांचा कटाक्ष दिसून येतो. भारत सरकारने विजया मेहता यांना ‘पद्मश्री‘ देऊन गौरव केला. याचबरोबर त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार‘, ‘कालिदास सन्मान‘, ‘तन्वीर सन्मान‘, ‘विष्णुदास भावे सुर्वणपदक‘, महाराष्ट्र शासनाचा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार‘, ‘नाट्यदर्पण पुरस्कार‘, चतुरंग प्रतिष्ठानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार‘, ‘रावसाहेब‘मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय फिल्म पारितोषिक, एस.एन.डी.टी विद्यापीठाची डॉक्टररेट, इचलकरंजी मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपद असे अनेक सन्मान किताब मानमरातब मिळाले आहेत.

विजया मेहता यांनी ‘एन.सी.पी.ए‘ च्या संचालकपदाची धुरा तब्बल सतरा वर्षे सांभाळली. नाटकांच्या प्रयोगांच्या कारणाने त्यांचे होत असलेले झंझावाती आंतरराष्ट्रीय दौरे विशेषतः युरोपमधील अथक भ्रमंती पहाता, मराठी साहित्य कलाजगतातील कोणालाही न सोडता आपल्या निखळनिर्विष विनोदाने कोपरखळ्या मारणाऱ्या ठणठणपाळाने त्यांचे ‘विजयोस्की मेहतोविच‘ असे नामकरण केले.

‘झिम्मा : आठवणींचा गोफ‘ हे मा.विजया मेहता यांचे आत्मचरित्रपर पुस्तक आहे. यात १९५१ सालापासून ते आजतागायत नाटकासाठी रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या बाईंच्या आणि रंगभूमीच्याही अनेक स्थित्यंतरांतून घडलेल्या रंगयात्रेचा हा सफरनामा या पुस्तकात आहे.
तसेच
बाई : एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास.

विजया मेहता यांच्या नाट्य कारकिर्दीचा आणि व्यक्तित्वाचा वेध घेणारं हे आणखी एक पुस्तक. विजयाबाईंच्या शिष्य मंडळींनी, सुहृदांनी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. बाईंची गॅंग या नावानं ओळखले जाणार्‍या महेश एलकुंचवार, नाना पाटेकर, दिलीप कोल्हटकर, विक्रम गोखले, सुहास जोशी, रिमा, विजय केंकरे, नीना कुलकर्णी, अमृता सुभाष अशा अनेकांनी विजया मेहता यांचं व्यक्तिचित्र तयार केलं आहे. वेगवेगळ्या कलाकृती तयार होतानाची प्रक्रिया, बाईंचं कौशल्य, त्या-त्या वेळचे अनुभव अशा गोष्टी त्यामुळे उलगडतात. विजया राजाध्यक्ष, महेश एलकुंचवार यांनी घेतलेल्या एका मुलाखतीचा पुस्तकात समावेश आहे. भास्कर चंदावरकर यांनी लिहिलेल्या एका लेखाचा अनुवादही या पुस्तकात समाविष्ट आहे. याशिवाय पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत, दामू केंकरे, डॉ. श्रीराम लागू, भक्ती बर्वे अशा दिग्गजांनी बाईंबद्दल यापूर्वी लिहिलेल्या लेखांचं संकलनही पुस्तकात आहे. अंबरीश मिश्र यांनी संपादन केलं आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..