विजयदुर्ग किल्ला
विजयदुर्ग किल्ल्यातील मराठय़ांच्या पराक्रमात अनेक गोष्टींबरोबर येथील दुर्गरचना, आरमारी गोदी आदींबरोबरच समुद्रांतर्गत तटबंदीचाही समावेश करता येईल. येथील बलाढय़ आरमार मुंबईस्थित इंग्रजांच्या डोळ्यांत खुपत असे. त्यासाठी काळोख्या रात्री अतिशय गुप्तपणे ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ ही मोहीम त्यांनी आखली. तीन युद्धनौका त्यासाठी पाठविण्यात आल्या. पण त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. कारण विजयदुर्गपासून साधारण दीडशे सागरी मैल अंतरावर या युद्धनौका बुडाल्या. या भागात ओहोटीच्या वेळीही पाण्याखालीच राहील अशी जाडजूड भिंत समुद्राखाली उभारलेली आहे. याच अदृश्य तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकल्या आणि बुडाल्या. प्रकाशचित्र तज्ज्ञांनी यासंदर्भात काही वर्षापूर्वी अभ्यास केला असता हे बांधकाम १७व्या शतकातील असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्या काळात शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्याची चिलखती तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली होती.
मराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा पूर्वीचा ‘घेरिया’ आणि आताचा ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला म्हणजे कोकण किनारपट्टीवरील शान! इंग्रजांनाही या किल्ल्याची एवढी आस होती की, केवळ फितुरीमुळे पेशव्यांच्या मदतीने आंग्रेंचा पाडाव करून हा किल्ला जिंकल्यावर पेशव्यांबरोबर झालेल्या तहानुसार विजयदुर्ग किल्ल्याच्या बदली बाणकोट जवळची दहा गावे द्यायला इंग्रज तयार झाले होते. असा हा नावाप्रमाणेच विजयी झेंडा फडकवणारा विजयदुर्ग म्हणजे जलदुर्गाचा बादशहाच जणू! इंग्रज, पोतुगीज, डच इ. परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या वास्तूचा एकही दगड ज्या किल्ल्याने जागचा हालू दिला नाही, असा मिश्रदुर्ग म्हणजेच विजयी विजयदुर्ग!…
११९५ ते १२०५ या कालावधीत शिलाहार घराण्यातील राजा भोज याने कोकण प्रांताचा मुख्य असलेल्या मिर्झा वली बेग याच्या देखरेखीखाली घेरिया किल्ल्याचे बांधकाम केले. किल्ल्यावर कालांतराने देवगिरीची यादवसत्ता आली. पुढे विजयनगरचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाकडे हा किल्ला आला. इ.स. १६५३मध्ये विजय संवत्सर चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि पूर्वीच्या घेरियाचा ‘विजयदुर्ग’ झाला.
छत्रपतींनी हा किल्ला जिंकण्याअगोदर तो ५ एकरात वसलेला होता. पण महाराजांनी किल्ल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे झाले. या चिलखती तटबंदीवर महाराजांनी २७ भक्कम बुरूज बांधले. यामध्ये तीन बुरूज तिमजली आहेत. उत्तरेकडून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या स्फूर्तिदायक विजयदुर्ग किल्ल्याची सुरुवात होते ती गोमुख दरवाजापासून! छत्रपती शिवाजी महाराजांनीच या गोमुख दरवाजाची बांधणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला बांधला किंवा तो जिंकून घेतला हे दोन गोष्टीतून आपल्या लक्षात येतं. एक म्हणजे किल्ल्याच्या परिसरात असलेलं बलभीम मारुतीचं मंदिर आणि गोमुख बांधणीचा दरवाजा! या दोन्हीही गोष्टी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये आहेत. या किल्ल्यात प्रवेश करायचा मुख्य मार्ग हा खुष्कीचा मार्ग असल्याने त्याला ‘पडकोट खुष्क’ असं नाव आहे. हा मार्ग जांभ्या दगडातील आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा दरवाजा वळणावळणाचा आहे.
दरवाजाच्या बाहेर पूर्वी मोठा खंदक होता. इथून कुणी प्रवेश करू नये म्हणून या दरवाजासमोर डावीकडे समुद्रकिना-यापर्यंत हा खंदक खणलेला होता. खंदकाने जमिनीच्या बाजूने किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित संरक्षित केलेली होती. या खंदकामुळे तटाला भिडणे शत्रूला कठीण जात होते. आज या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने किल्ल्यात जायला जमिनीवरचा रस्ता असला तरी पूर्वी किल्ल्याच्या चारही बाजूने पाणी होते. या खंदकात समुद्राचे पाणी सोडले जात असे. खंदकावर लाकडी पूल होता. सायंकाळी हा पूल काढला की गावाचा संपर्क तुटत असे. मातीचा भराव टाकून हा रस्ता नंतर करण्यात आला. खुष्कीच्या मार्गातून आत गेल्यावर मारुतीचे मंदिर लागते. त्यानंतर किल्ल्यात प्रवेश करताना सुरुवातीला जिभीचा दरवाजा लागतो.
१७व्या शतकात या परिसरास जिभी म्हणत. राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी १७०७ मधील पत्रात याला जिभी असे म्हटले आहे. जिभी म्हणजे किल्ल्याच्या मुख्य दरवाजापुढे बांधलेला चौबुरुजी! तुळाजी आंग्रे यांनी इंग्रज आणि पेशव्यांविरुद्ध विजयदुर्गच्या संरक्षणासाठी बोलावलेल्या पोर्तुगीज सैनिकांनी आपल्या ४ पौंडी १६ तोफा या जिभीत रचून ठेवल्या होत्या. जिभीच्या दरवाजातून पुढे गेल्यावर यशवंत महाद्वाराच्या पाय-या लागतात. हाच दिंडी दरवाजा!
दिंडी दरवाजाची रचनाच अशी आहे की, किल्ल्यावर हल्ला करणा-या शत्रूच्या नजरेत हा दरवाजा येत नाही. त्यामुळे शत्रूंच्या महाभयंकर तोफांचा मारा इथपर्यंत पोहोचत नव्हता. शत्रूने केलेल्या तोफांच्या मा-याच्या निशाण्या आजही या दरवाजाच्या बाहेर असलेल्या तटबंदीवर दिसून येतात. त्या काळी सायंकाळी सहानंतर हे मुख्य प्रवेशद्वार बंद केलं जात असे. त्यानंतर आत येणा-या सैनिकांना मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या दिंडी दरवाजातून प्रवेश दिला जाई. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरचं बांधकाम हे पेशवेकालीन असल्याच्या खुणा आहेत. या दरवाजावर मोठमोठे खिळे आहेत.
या दिंडी दरवाजावरील भाग म्हणजे नगारा! शत्रूचा हल्ला होण्यापूर्वी सैनिकांना सावध करण्यासाठी नगारे वाजविले जात असत. वर जाण्यासाठी नगारखोलीच्या खाली डावीकडे जिना आहे. दरम्यान, ध्वजस्तंभाजवळ जाणा-या घाटीच्या पायथ्याशी एक वास्तू आहे. हा खलबतखाना!…
शत्रूच्या हल्ल्याची चाहूल लागली किंवा महत्त्वाची बोलणी करायची असल्यास ती इथल्या खलबतखान्यात व्हायची. वास्तुशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करून या खलबतखान्याची रचना करण्यात आली आहे. या वास्तूला पूर्वी दरवाजा होता. आता तो अस्तित्वात नाही. आत चाललेली गुप्त बोलणी बाहेरच्या व्यक्तीला अजिबात ऐकायला येत नसत. अचंबित करणा-या अशा अनेक वास्तू या किल्ल्यात पाहायला मिळतात.
ज्या ठिकाणी दरबार भरला जात असे, त्याला ‘सदर’ असं नाव आहे. आयताकृती असणा-या या हॉलमध्ये अगदी शेवटच्या सैनिकालाही स्पष्ट आवाज ऐकू यायचा. याबरोबरच भुयारातून जाणारा ‘खूब लढा तोफा बारा’ बुरूज, पेशवेकालीन वाडय़ाकडे जाणारे भुयार, भवानी मातेचं मंदिर, सैनिकांची निवासस्थाने आदी अनेक वास्तूंमुळे विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या ऐतिहासिक आठवणी सांगत उभा आहे.
या किल्ल्याच्या दुर्गरचनेमुळे केवळ गनिमी काव्याने मराठय़ांनी जेरीस आणले. पण फितुरीमुळे हा किल्ला इंग्रजांच्या आणि नंतर पेशव्यांच्या ताब्यात गेला. १७१८पासून झालेल्या पहिल्या परकीय शक्तीच्या हल्ल्यापासून ते किल्ला इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत म्हणजे १७५६पर्यंतचा इतिहास जाणून घेतला तर आजही मराठय़ांच्या पराक्रमाने, किल्ल्याच्या रचनेमुळे आणि भक्कम बांधकामामुळे आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती शंभूंच्या काही कालावधीतील धामधुमीची कारकीर्द संपल्यावर कान्होजी आंग्रे यांनी कोकणात आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. इंग्रज आणि पोर्तुगीज यांचे आंग्रेंशी कधीच जुळले नाही. आंग्रेंच्या मराठा आरमारामध्ये रामेश्वर भागात असलेल्या गोदीवाडी येथील आरमारी गोदी कधीही दुर्लक्षित करता येणार नाही.
साधारण ६० वर्षापूर्वी म्हणजेच १९५२ सालात आरमारी गोदीमध्ये चिखलात रुतलेला नांगर सापडला होता. साडेतेरा फूट लांब आणि ८ फूट रुंद असलेल्या या नांगरावरून त्या वेळच्या जहाजांची कल्पना येते. याच आरमारी गोदीमध्ये शत्रूंच्या जहाजांच्या दुरुस्तीबरोबरच नवीन जहाजेही बनवली जात. गिर्ये गावाजवळ वाघोटन खाडीच्या काठावर खडक खोदून या गोदीची निर्मिती आंग्रेंनी केली. या गोदीची लांबी ३५५ फूट व रुंदी २२७ फूट इतकी होती. या गोदीमध्ये ५०० टनी जहाज सहज ये-जा करत.
भरतीच्या वेळेमध्ये जहाजे गोदीत नेण्यात येत असत. ओहोटीला गोदीतील पाणी बाहेर गेल्यावर पूर्वेकडील ३७ फूट रुंदीचा दरवाजा बंद करून भरतीच्या पाण्यास अडविले जाई. त्या वेळी तीनशेहून अधिक कामगारांनी प्रचंड परिश्रम करून ही गोदी निर्माण केली. प्रसिद्ध फत्तेजंग पाल आणि समशेरजंग पाल या लढाऊ जहाजांची बांधणी याच गोदीमध्ये करण्यात आली. गोदीचं महत्त्व एवढं मोठं होतं की, या गोदीमध्ये बांधलेल्या किंवा दुरुस्त केलेल्या जहाजांनी मराठय़ांच्या वीरश्री गाजवलेल्या आरमारात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे शत्रूपासून गोदीच्या संरक्षणासाठी मटाटिया बुरुजाची खास बांधणी करण्यात आली होती. त्यावर तोफाही ठेवण्यात आल्या होत्या.
अर्थात, या बुरुजावर आणि गोदीजवळ सैनिकांचा जागता पहारा असे. या गोदीची पाहणी करत असताना १९५२ सालात कॅप्टन डेव्हिस यांना चिखलात रुतलेला नांगर सापडला. साडेतेरा फूट लांब आणि ८ फूट रुंद असलेला हा नांगर १८व्या शतकातील पालवी गुराबाचा होता. मुंबईच्या नॉटिकल म्युझियममध्ये तो नांगर आजही जतन केलेला आहे. विजयदुर्गच्या शामराव परुळेकर यांनी हा नांगर संग्रहालयाकडे पाठविला अशी नोंद आढळते.
विजयदुर्गचे बलाढय़ आरमार मुंबईस्थित इंग्रजांच्या डोळय़ात सतत खुपत असे. त्यासाठी काळोखी रात्र धरून अतिशय गुप्तपणे ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ ही मोहीम त्यांनी आखली. तीन मजबूत युद्धनौका त्यासाठी पाठविण्यात आल्या. पण त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. कारण विजयदुर्गपासून साधारण दीडशे सागरी मैल अंतरावर असताना त्या युद्धनौका बुडाल्या. याचा शोध घेताना त्या भागात समुद्राच्या ओहोटीच्या वेळीही पाण्याखालीच राहील अशी जाडजूड भिंत समुद्राखाली बांधलेली आढळली. प्रकाशचित्र तज्ज्ञांनी या संदर्भात काही वर्षापूर्वी अभ्यास केला असता हे बांधकाम १७ व्या शतकात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्याची चिलखती तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली. याच अदृश्य तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकल्या आणि त्या बुडाल्या असा निष्कर्ष काढता येतो. या संदर्भात काही तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. विजयदुर्गजवळच्या या भिंतीबाबत नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेच्या डॉ. त्रिपाठी यांनी या बांधकामाचा अभ्यास केला होता. त्या वेळी त्या भागात जहाजांचे अवशेष व तोफगोळे मिळाले. याबाबत १९९८ मध्ये डॉ. त्रिपाठी यांनी ‘जर्नल ऑफ नॉटिकल आर्किऑलॉजी’ मध्ये शोधप्रबंध सादर केला होता.
त्यानंतर या संस्थेतील या प्रबंधाला समोर ठेवून मुंबईमध्ये भरलेल्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये डेक्कन कॉलेजमध्ये संशोधक सहायक असलेल्या इतिहास अभ्यासक सचिन जोशी यांनी ‘मिथ्स अँड रिअॅयलिटी-दी सबमज्र्ड स्टोन स्ट्रक्चर अॅ ट फोर्ट विजयदुर्ग’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. त्यामध्ये ते म्हणतात की, विजयदुर्ग किल्ल्याजवळची प्रसिद्ध असलेली समुद्राखालील भिंत ही मानवनिर्मित नसून नैसर्गिक रचना आहे.
कोकण किनारपट्टीवर आणखी काही ठिकाणे आढळणा-या ‘डाइक’ या प्रकारच्या रचनेचाच हा एक भाग असल्याचे ते म्हणतात. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणतात की, हे बांधकाम प्लॅटफॉर्मसारखे असल्याचे दिसते. यामध्ये वापरण्यात आलेल्या दगडांपैकी सर्वात मोठा दगड ३.५ बाय २.५ बाय २.५ मीटर इतक्या मोठय़ा आकाराचा आहे. एवढा मोठा दगड त्या जागी नेणे हे त्या काळी शक्य नव्हते. या भिंतीवर चार मीटरहून अधिक उंचीपर्यंत पाणी आहे. त्यामुळे तेव्हा आरमारासाठी वापरात असलेल्या बोटींना या भिंतीवरून ये-जा करणे शक्य होते.
साधारण ८० ते ९० वर्षाच्या या इतिहासात किरकोळ घटना वगळता या भिंतीवर बोटी आदळून फुटल्याच्या नोंदी ब्रिटिश, पोर्तुगीज किंवा डचांच्या लिखाणात आढळत नाहीत. काही असलं तरी मराठय़ांच्या आरमारात पाण्याखालील ही भिंत आरमाराच्या विजयी गाथेची भागीदार आहे. कारण पूर्ण तयारीनिशी आणि गुप्तपणे उतरलेल्या इंग्रजांच्या ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ वेळी ही भिंत कामी आली नसती तर कदाचित विजयदुर्गला एका पराभवाचा ठपका बसला असता. पाण्याखालील भिंतीसोबत ‘आंग्रे बँक’ ही समुद्रातील जागाही मराठय़ांच्या पराक्रमात कामी आली आहे. हा भाग नैसर्गिक आहे. पण ही जागा आंग्रेंच्या नौदलाने शोधून काढली आणि त्याचा उपयोग शत्रूंचे हल्ले यशस्वीपणे परतविण्यासाठी अनेक वेळा केला.
जमिनीवर जशा द-या-खो-या, उंचवटे, टेकडय़ा असतात, त्याचप्रमाणे समुद्रतळाशीही असा भाग असतो. समुद्रातील टेकडी म्हणजेच ‘आंग्रे बँक’! किनारपट्टीपासून आपण आत आत गेल्यावर पाण्याची खोली वाढत जाते. विजयदुर्ग समुद्रामध्ये मात्र निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो.
विजयदुर्गपासून साधारण १०० किलोमीटरच्या अंतरात पाण्याची खोली ८० ते ९० मीटर वाढत जाते. पुढच्या ३ ते ४ किमीच्या अंतरात ही खोली तब्बल पावणेदोनशे मीटर एवढी जाते. पण त्यानंतरच्या काही अंतरामध्ये ही खोली अचानक कमी होऊन २० ते २५ मीटर एवढी होते. हीच ती आंग्रे बँक म्हणून ओळखली जाणारी समुद्रातील टेकडी! ही टेकडी तब्बल ३५ ते ४० किमी लांब व १५ ते २० किलोमीटर रुंद आहे. विजयदुर्गवर हल्ला करणा-या शत्रूंच्या जहाजांवरील तोफांची तोंडं विजयदुर्गकडेच असत. या तोफांना पश्चिमेकडून हल्ला झाला तर त्वरित पश्चिमेकडे वळणे अवघड होत असत. या गोष्टीचा फायदा मराठा आरमार घेत असे.
आंग्रे बँक या ठिकाणी मराठा आरमार नांगर टाकून आरामात असे. शत्रू विजयदुर्गच्या दिशेने येताना दिसला की, मराठय़ांची जहाजं पश्चिमेकडून येऊन त्यांना अटकाव करत. बेसावध असलेल्या शत्रूचा फायदा घेऊन मराठा आरमार त्या जहाजांवरील माल ताब्यात घेत. पराक्रमी मराठा सरदार, त्यांचे मावळे यांच्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याला बांधलेली तिहेरी तटबंदी मराठय़ांच्या पराक्रमात महत्त्वपूर्ण ठरली. आणि याचबरोबर आरमारी गोदी, समुद्रातील छुपी तटबंदी, आंग्रे बँक या गोष्टीही विजयदुर्गवरील मराठय़ांच्या विजयगाथेत अतिशय मौल्यवान कामगिरी करणा-या ठरल्या.
गाव: विजयदुर्ग
ग्रामपंचायत: विजयदुर्ग
अंतर. ८ किमी
जवळचे बस स्थानक: विजयदुर्ग
जवळचे रेल्वे स्टेशन: कणकवली
जवळचे विमानतळ: गोवा
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट / बाळा कदम.
Utkrushta paryatan mahiti par lekh. Sarvasamanyana ashi anabhidnya sthale dnyat karun dili tar paryatakansathi ani sthayi lokansathi phaydeshir tharel. 2017 nantar kahi events zale nahit ka. Tasech ha wada yaghadila vapartat ahe ka.
Ratnagiri chya Thiba palace shi yacha kahi sambandh ahe ka.