![vijaydurga-fort02](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2024/12/vijaydurga-fort02.jpg)
विजयदुर्ग हा भारताच्या राज्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास ‘चिलखती तटबंदी’ असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे, तरं दुसरा पश्चिमेकडे. विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोज याने बांधला. पुढे तो बहामनी. व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हेरनिअर याने इ.स. १६५० मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याने त्याचे वर्णन ‘विजापूरकरांचा अभेद्य किल्ला’ असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इ.स. १७५६ पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने १३ फेब्रुवारी १७५६ रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज-पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते; परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाहीत.
अखेर बाणकोट किल्ला व त्या जवळील सात गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग आठ महिन्यानंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. १६६४ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत. कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाड़ी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात; पण ती समुद्रावरून दिसत नसत.
Leave a Reply