आज ३० ऑक्टोबर.. आज अभ्यासू, समर्पित आणि शिस्तीचा कलावंत विक्रम गोखले यांचा वाढदिवस.
विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४५ रोजी झाला.
सध्या नव्या नाटकाच्या तालमीलाही सगळे नट एकाच वेळी उपलब्ध असत नाहीत. त्यामुळे दिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक (कसेबसे) उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वागीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी एक : विक्रम गोखले!
विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार. नाटकाचा सर्वस्पर्शी विचार कसा करावा, याचे बाळकडू त्यांना बाईंकडून मिळाले. ‘बॅरिस्टर’ ही त्याची उत्तम फलश्रुती.
मा.विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती.
विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. मा.विक्रम गोखले यांनी घराणेशाहीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात हडेलहप्पी करण्याचा मार्ग न पत्करता अभ्यासपूर्वक त्यातले सूक्ष्म कंगोरे आत्मसात केले. जाणीवपूर्वक भूमिका निवडून त्यांना आपल्या निरीक्षणशक्तीची, आकलन आणि विश्लेषणाची जोड देऊन त्यांवर आपला असा ठसा उमटवला. मग ती भूमिका ‘माहेरची साडी’सारख्या सिनेमातली का असेना. रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी या प्रत्येक माध्यमाची निकड त्यांनी सहजगत्या आत्मसात केली. त्यांच्या या चोखंदळपणामुळेच ते कला क्षेत्रातले संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे धनी होऊ शकले. ते कलेचा साकल्याने विचार करणारे, नव्या पिढीला प्रशिक्षण देणारे, त्या संदर्भात बांधीलकी जपणारे एक कर्ते रंगधर्मी आहेत. म्हणूनच रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या त्यांच्या ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचे प्रयोग डोळ्याला इजा झालेली असतानाही त्यांनी थांबवले नाहीत. दुसरीकडे सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला आहे. कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करतात. सध्या त्यांनी नाटकाचे प्रयोग करणे बंद केले आहे.
मा.विक्रम गोखले यांना आधुनिक मराठी रंगभूमीचे प्रणेते विष्णुदास भावे यांच्या नावे दिल्या जाणारा पुरस्कार मिळाला आहे.अभिनेते मा.चंद्रकांत गोखले यांनाही भावे पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply