नवीन लेखन...

विकृती

दुसऱ्यावर हल्ला करत त्याला जखमी करताना एखाद्या गुन्हेगाराने क्रौर्याची परिसीमा ओलांडण्याचे प्रकार पोलिस अनेक वेळा पाहतात.विशेषतः जातीय दंगलीमध्ये त्याचे जास्त अनुभव येतात.
मात्र समोरच्या व्यक्तीच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन तिचा सातत्याने छळ करत राहणे ही विकृतीच. त्यातूनही एका स्त्री स्वभावात तिचे दर्शन होणे हे आणखी क्लेशदायक.
१९९८ मधे दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे येथे नेमणुकीस असतानाची ही कथा.
संध्याकाळी वेळ होती. ड्युटी ऑफिसर सुहास खटके यांनी येऊन मला कळवले की एका NGO मधुन फोन आला आहे. एका लहान मुलीला मारहाण होत असल्याबद्दल ते कळवत आहेत. NGO मधून फोन करणाया व्यक्तीशी बोलण्यासाठी त्याने फोन माझ्याकडे दिला. वंचित बालकांच्या कल्याणाकरीता काम करणाया ” Child Rights and You ” या अशासकीय सेवाभावी संस्थेतील एक महिला फोनवर होती. तिच्या बोलण्यातील तातडी जाणवत होती
“फणसवाडीतील अमूक एका इमारतीतील अमुक मजल्यावरील, अशा अशा खोलीत एका लहान मुलीला नेहमी मारहाण होत असते आणि आजही खूप झाली आहे. एका शेजायाला तिची दया आली आणि तिने आमच्या संस्थेला कळवले. कळवणाऱ्या व्यक्तीचे नांव आम्ही उघड करू शकत नाही.” तिने एका दमात सांगितले.
त्या संस्थेला फोन करणाऱ्या व्यक्तीच्या नावात आम्हाला स्वारस्य नव्हतेच.
फोन खाली ठेवला आणि तातडीने महिला पोलिस अंमलदारासोबत ड्युटी ऑफिसर सुहास खटकेना फणसवाडीतील त्या पत्यावर साध्या कपड्यात रवाना केले. तेथे पोचल्यावर त्या संस्थेला शेजायांकडून गेलेल्या फोनबाबत अजिबात वाच्यता किंवा चौकशी न करण्याच्या सूचनाही दिल्या.
जीप निघाली आणि दुर्मिळात दुर्मिळ अशा या तक्रारी मागील पार्श्वभूमी काय असेल याचा मी विचार करू लागलो. वेगवेगळ्या शक्यता डोक्यात येऊ लागल्या. मुलगी सावत्र असेल का? लहान वयात लग्न होउन आलेली आणि आता नकोशी झालेली मुलगी असेल का? मुंबई सारख्या शहरात आपण बरे आणि आपले काम बरे अशा वृत्तीने बहुसंख्य जनता जगत असताना, मुलीचा शेजायाला कळवळा येण्या ईतपत तिला मारहाण होते म्हणजे हा प्रकार गंभीर नक्कीच असला पाहिजे अशी खुणगाठ मनाशी पक्की करत जीप परतण्याची वाट पाहत होतो.
तेवढ्यात सुहासचा फोन आला.
” सर, खुप मारले आहे हो. दहा, अकरा वर्षाची मुलगी आहे. खूप अशक्त आहे.
” तिला पोलिस स्टेशनला न आणता परस्पर जी. टी. हॉस्पिटलला न्या. मी तेथे पोहोचतोच “असे सांगून पोलिस स्टेशन डायरीत नोंद करून मी तातडीने निघालो.
थोड्याच वेळात पिडीत मुलीला घेउन खटके आणि स्टाफ इस्पितळात पोहोचले. महिला पोलिसच्या आधाराने ती मुलगी जीपमधून उतरली.
डोळे उघडून आजूबाजूला पाहू शकत होती केवळ म्हणून ती बेशुद्ध नव्हती असे म्हणायचे.. मळलेल्या हिरवट रंगाचा जुना फ्राॅक घातलेली ती अत्यंत कृश मुलगी आधाराशिवाय उभं राहण्याच्या अवस्थेत सुद्धा नव्हती. कॅज्युअलटी विभागाच्या डाॅक्टरांसमोर धरून धरून नेऊन स्टुलावर बसवले तेव्हाही तिचा तोल जात होता. डाॅक्टरांनी नाव विचारून वयाचा रकाना भरताना तिला दोन दोनदा वय विचारले. ‘अकरा’ ती क्षीणपणे म्हणाली. डॉक्टरांनी तिला वजन काट्यावर उभं रहायला सांगितले. आणि वजन कमालीचे कमी असल्याचे पाहून उद्गारले “She is undernourished as well.” वैद्यकीय तपासणी अहवालात त्यांच्या या महत्वपूर्ण निरीक्षणाचीही नोंद घ्यावी अशी मी त्यांना विनंती केली.
अं
गाच्या उघड्या भागावरील माराचे वळ स्पष्ट दिसत होते. आणखी किती वळ झाकले गेले होते ते पद्धतशीरपणे करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासणीतच कळून येणार होते. डाॅक्टरांनी तिला आपल्या कक्षात तपासणीसाठी नेले आणि महिला डाॅक्टरसह तिची बारकाईने तपासणी करून अहवाल दिला.
अंगावर माराच्या एकुण २७ दृष्य खुणा होत्या. त्या व्यतिरीक्त दोन्ही हात दोरीने घट्ट बांधल्याचे वळ मनगटावर ठळकपणे दिसत होते.अंगावरच्या मारहाणीचे हत्यार ‘ Hard and Blunt object ‘ असं नमूद होते. मुलीला उपचारांसाठी इस्पितळात दाखल करून घेण्यात आले.
ज्यांच्याकडे ही मुलगी राहत होती त्यांच्या पाच वर्षाच्या मुलालाही ती सांभाळत असे. त्या घरातील स्त्री गिरगाव जवळील एका सरकारी दवाखान्यात परिचारिका म्हणून नोकरीस होती. तिचा पति सीप्झ, अंधेरी येथे एका आय टी. कंपनीत नोकरीस होता.
वैद्यकिय उपचार चालू केल्यावर मुलगी जरा हुशारीत आली.मुलीवर लक्ष ठेउन तिच्या परिस्थितीबद्दल वेळोवेळी कळविण्यासाठी दोन महिला पोलिसांची इस्पितळात नेमणूक केली आणि आम्ही पोलिस ठाण्यात परतलो.
थोड्याच वेळात मुलीची परिस्थिती जबाब नोंदवण्या इतपत बरी असल्याचे महिला पोलिसांनी कळवले आणि आम्ही परत इस्पितळात निघालो. दरम्यान, ज्यांच्याकडे ही मुलगी रहायची त्या जोडप्यातील सौ., शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यामुळे असेल, पोलिस ठाण्यात आल्याचा निरोप आम्हाला मिळाला. त्यांना तिथेच थांबवून ठेवा आणि त्यांच्या यजमानानाही बोलावून घ्यायला त्यांना फोन करण्याची मुभा द्या अशा सूचना मी दिल्या.
इकडे मुलीला दिलेल्या औषधांमुळे आराम पडू लागला होता.डॉक्टरांना भेटून तिची परिस्थीती जबाब नोंदविण्याइतपत चांगली असल्याचे लेखी प्रमाणपत्र घेउन, आम्ही साध्या कपड्यातील पोलिसांनी तिची आस्थेने चौकशी करण्यास प्रारंभ केला. तिच्या मुखातून जे काही आलं त्याने आम्ही हादरून गेलो.
या मुलीचे गाव, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज जवळील एक खेडेगाव. घरची अत्यंत गरीबीची परिस्थीती. तीन बहीणींपैकी ही सर्वात मोठी. एक वर्षापूर्वी आईचे निधन झाले. वडील शेतमजुर. स्वतःची थोडी शेतजमीन होती परंतु कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला पुरेल इतके उत्पन्न त्यातून येत नसे.
आईचे निधन झाले तेव्हा शेजारच्या गावात मुंबईहून आलेला आईचा दूरचा भाऊ हिच्या वडिलांना भेटायला आला. मुलीला चांगल्या शाळेत का घालत नाही? वगैरे विचारपूस केली. वडिलांनी बिकट परिस्थीतीचे राग आळवले. या दूरच्या मामाने आणि त्याच्या बरोबर आलेल्या मामीने मोठ्या मुलीला आम्ही तिच्या शिक्षणासाठी मुंबईला नेलं तर चालेल का? अशी विचारणा केली. वडील प्रथम नाही म्हणाले. मामीने सांगितले की तिचा पाच वर्षाचा मुलगासुद्धा असतो घरी. दोघे चांगले रमतील एकमेकांच्य सहवासात.
मुलीला शिक्षणासाठी मुंबईला जाण्याची संधी मिळते आणि मुख्य म्हणजे घरातील एक खातं तोंड कमी होतय या विचाराने वडिलांनी सहमती दर्शीविली आणि या दूरच्या मामा मामी बरोबर, शाळेची स्वप्न रंगवत, कोल्हापूरच्या पलीकडचे जग कधीही न पाहिलेली मुलगी मुंबईच्या फणसवाडीत दाखल झाली. ती आली तेव्हा शाळेच्या सुट्टया सुरू होत्या. शाळा सुरू व्हायला थोडा कालावधी होता.
आल्यावर शाळेबद्दल विचारणा केल्याचे तिने धाडस केले आणि तिला मामीच्या हातचा पहिला प्रसाद मिळाला.
हे सर्व सांगत असताना ती मुलगी इतकी भेदरलेली होती की मधूनच गप्प व्हायची. मधेच मोठयाने रडायची. महिला पोलिसाचा हात घट्ट पकडून ” मला तिकडं न्हाई जायाचं पुन्हा. माझ्या बाबांना बोलवा.” अस रडत रडत विनवायची.
तिला व्यवस्थित धीर दिला. “तुला मार देणाऱ्यांना आता आम्ही बेड्या ठोकणार आहोत. आता ते तुला कधीही हात लावू शकणार नाहीत” असं वारंवार समजावून सांगतिले तेव्हा कुठे तिला धीर आला.
मुलीचा जबाब चालू असताना सर्व वेळ एका डॉक्टरांना तेथे उपस्थित ठेवून त्यांनी ते संपेपर्यंत तेथून न हलण्याविषयी विनंती केली.
मुंबईत मुलीचे दुष्टचक्र चालू झाले. शाळेत चालू वर्षासाठी ॲडमिशन आधीच्या वर्षात घ्यायला लागते असा नियम असल्याचे खोटेच सांगून तिला मामा मामीनी, तू पुढच्या वर्षी शाळेत जाणार असे खोटेच सांगितले. तिला घरात इतकी वाईट वागणूक मिळत होती की त्या वागणुकीला ‘ दुय्यम ‘ म्हणणे म्हणजे गांभीर्य कमी केल्या सारखे व्हावे. तिला दिवसातून एकच वेळ जेवण मिळत असे. ते ही उरलेलं शिळं. स्वतःचे कपडे धुवायचेच परंतु घरातल्या सर्वांचे कपडे व्यवस्थित धुवून त्यांना इस्त्री करायची. झाडलोट करायची. मामाच्या पाच वर्षांच्या मुलाला दिवसभर सांभाळायचे. खेळताना चुकूनही त्याला काही दुखलं खुपलं तर हिची खैर नसे. सडकून मार ठरलेला.
छळण्याचे तरी किती प्रकार या दाम्पत्याने अवलंबवावेत! गावावरून येताना फक्त दोन फ्रॉक घेऊन आलेली ही मुलगी अजूनही तेच फ्रॉक आलटून पालटून वापरत असे. थंडीच्या दिवसातही, कपडे भांडी धुताना फ्रॉक भिजला तरी तो बदलायची परवानगी नसे. तिच्या अंथरूणाचा तर पत्ताच नव्हता. तिला सक्तीने लादीवरच झोपावे लागे.
मामा, मामी आपल्या मुलाला घेऊन बाहेर जात असत तेव्हा ते येई पर्यंत या मुलीला बाहेरून कुलूप लावून, कोंडून ठेवण्यात येत असे. बरं असेही नाही की, तिचा छळ करण्यात मामा मागे असे. त्याचाही अगदी ठळक सहभाग असे. पाच वर्षांचा मामे भाऊ खेळताना रुसला रडला तरी हिला मामाचा मार बसत असे. शुल्लक कारणाने तिला देण्यात येणाऱ्या शिक्षांचे प्रकार तिच्या तोंडून ऐकले आणि मन सुन्न झाले. उघड्या अंगाने लादीवर झोपायला लावणे, दिवसभर उपाशी ठेवणे, ह्या शिक्षा नेहमीच्याच होत्या. परंतु मामाच्या मुला साठी हिने बाथरूम लवकर रिकामे न केल्याने त्याने घरात लादीवर सू सू केली म्हणून या मुलीला तिच्या अंगावरच्या फ्रॉकने लादी पुसायला लावून तोच फ्रॉक तिला अंगात घालायला लावणे ही छळाची परिसीमा झाली.
मनस्वी संताप आणि कणव ह्याने मन भरून गेले.
भाचीचा अगदी ठरविल्या सारखा छळ सुरू असताना मामा मात्र तिच्या वडीलांना नियमितपणे पत्रे पाठवून ती अगदी मजेत असल्याचे खोटेच कळवीत असे.
मुलीचा रीतसर तपशीलवार जबाब नोंदवून घेण्यात आला.
तिच्या अंगावरील माराच्या खुणांचे वर्णन बारीकसारीक तपशीलासकट वैद्यकीय अभिलेखावर घेण्यासाठी डॉक्टरांना विनंती केली. फोटोग्राफरला बोलावून मुलीच्या मनगटावरील करकचून बांधलेल्या दोरीच्या वळांचे जवळून फोटो काढून घेतले.
मुलीच्या जबाबाच्या तपशीलवरून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून हे निश्चित झाले होते की मुलीच्या जीवाला अशा छळामुळे धोका निर्माण झाला होता.
त्या मुलीच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आम्ही मामा मामी विरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच उभयतांना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल केल्यावर त्यावेळचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी प्रदीप खुडे यांना मी मामाच्या घरझडती पंचानाम्या साठी रवाना केले.
खुडे यांनी घरझडती दरम्यान मुलीचे हात बांधण्यासाठी वापरलेली दोरी आणि ज्या सळईने मुलीला मारहाण होत असे तीसुध्दा मिळाल्याचे आणि त्या दोन्ही वस्तू पंचनाम्याखली ताब्यात घेतल्याचे फोन करून कळवले.
औषधं आणि मुख्यतः त्या नरकपुरीतून बाहेर आल्यामुळे लाभलेल्या सुरक्षिततेच्या भावनेमुळे मुलीची तब्येत सुधारत होती.
भोगलेल्या यातनांच्या आठवणींनेही चळचळ कपणारी ती मुलगी आता हसू लागली होती. तिच्या गावी स्थानिक पोलिसांमार्फत तिच्या वडीलांच्या येण्याबाबत चौकशी केली तेव्हा ते दुसऱ्या दिवशीही निघू शकले नसल्याचे कळले. आर्थिक अडचणी बरोबरच दोन लहान मुलींची सोय लावणे त्यांना क्रमप्राप्त होते.
मला मात्र दुसरीच चिंता भेडसावत होती. वडील यायला जास्त उशिर झाला आणि दरम्यान या मुलीला इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला तर तिला ” बाल सुधार गृहात ” पाठवण्याची नामुष्की आमच्यावर येणार होती. तिला तिकडे पाठवायला लागू नये अशी आमची मनोमन इच्छा होती. म्हणून मग तिचे वडिल येईपर्यंत तिचे उपचार चालूच ठेवावेत अशी मी मोठ्या डॉक्टरांना विनंती केली. सुदैवाने तशी वेळ आली नाही. तिसऱ्याच दिवशी तिचे वडिल मुंबईत पोचले.
मुलीला हॉस्पिटलमध्ये भेटून झाल्यावर ते पोलिस स्टेशनला आले आणि अक्षरशः हमसून हमसून रडू लागले. मोठ्या विश्वासाने मेहुण्याकडे शिक्षणासाठी सोपवलेल्या मुलीने तिच्या कर्मकहाणीचा पाढा त्यांना वाचून दाखवला होता. अटकेच्या दुसऱ्या दिवशी मामा मामीला रिमांड साठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी, या गुन्ह्याला “खुनाच्या प्रयत्नांचे ” कलम लावल्यावरून पुष्कळ वाद प्रतिवाद झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मामीला जामीन व्हावा म्हणून एक महिला वकीलच तावातावाने प्रतिवाद करत होत्या. त्या मुलीला शिस्त लागावी म्हणून काही वेळा तिच्याशी तशी वागणूक मामी कडून दिली जात होती असे त्या वकीलबाई कोर्टाला वारंवार सांगत होत्या. अर्थात जामिनासाठी चाललेला त्यांचा आटापिटा आम्ही समजू शकत होतो. मामी सरकारी नोकरीत होती. तिला पोलिस कोठडीची हवा लागली की तिच्या नोकरीवर परिणाम होणार हे नक्की होते. मात्र न्यायालयाने मुलीचा जबाब आणि मुख्यतः वैद्यकीय कागदपत्रे पाहून त्या खुनशी दाम्पत्याला पोलिस कोठडी फर्मावली.
या मुलीचा इतका छळ त्या जोडप्याने करण्याचे कारण काय असावे या बाबत जाणून घेण्यास मी नको तितका उत्सुक होतो. तिला दिलेल्या शारीरिक त्रासाचे काय दुष्परिणाम होतील याची मामीला,ती स्वतः वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असल्याने नक्कीच कल्पना होती. तरीसुद्धा मामी तिचा अनन्वित अखंड शारीरिक छळ करत होती. मामाचाही त्यात सक्रिय सहभाग होता. त्या दोघांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारे खोदून खोदून कारण विचारले. परंतु ते ढीम्म होते. बरं, केल्या प्रकाराचा त्यांना काडीचाही पश्र्चाताप नव्हता. त्या दोघांची मने निव्वळ भावनाशून्य होती.त्यांच्या घराच्या आसपास केलेल्या गुप्त चौकशीत असे कळले होते की, त्यांच्याकडे कधी पाहुणे किंवा नातेवाईक आल्याचेही कोणी पाहिले नव्हते. म्हणजे जगाशी वैर धरलेल्या या नवरा बायकोच्या विकृत मनोवृत्तीची ती अजाण मुलगी बळी ठरली होती.
तीन चार दिवसात मुलीची प्रकृति सुधारली आणि तिची इस्पितळातून मोकळीक झाली. ती वडिलांबरोबर गावी रवाना झाली. मामा मामीला काही दिवसांनी जामीन मिळाला. अपेक्षे प्रमाणे मामी सरकारी सेवेतून निलंबित झाली. यथावकाश मोठ्या न्यायालयात आरोप पत्र दाखल होऊन न्यायालयात केस सुनावणीस आली. दरम्यानच्या काळात मामीला कर्करोगाचे निदान होऊन त्या आजारपणातच तिचे निधन झाले.
केस न्यायालयात उभी राहिल्यावर, साक्षीसाठी मुलीचे वडील तिला घेऊन मुंबईला आले. त्यांची राहायची कुठेच सोय नसल्याने कोर्टानेही त्यांचे जबाब आणि उलट तपासणी तातडीने उरकले. मुलीची साक्ष उत्तम झाली. मुलीच्या उत्तम खुशाली बद्दल मामानी पाठवलेली खोट्या मजकुराची पत्रेही कोर्टाने पाहिली. कोर्ट कामकाज संपल्यावर बाप आणि लेक पोलिस ठाण्यातच मुक्काम करीत. त्यांचे खाणेपिणे चहापान वगैरेची व्यवस्था मी आणि माझे सहकारी अधिकारी करत होतो.
फोटो मधे दिसणारे मुलीच्या हातावरील दोरीचे वळ आणि ताब्यात घेतलेल्या दोरीचा पीळ जुळत असल्याचे डोळ्यांना स्पष्टपणे दिसत होतेच,परंतु तिला सर्वात प्रथम तपासणाऱ्या डॉक्टरांनीही, दोरी मनगटांभोवती इतक्या घट्ट आवळण्यामुळे तिच्या हाताची बोटं कायमची अधू होण्याची शक्यता होती, त्याचप्रमाणे अशी मारहाण आणि कुपोषण यामुळे तिच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता, हेही ठासून सांगितले.
साक्षीपुरावे आणि त्यावरील वाद प्रतिवाद संपले. न्यायालयाने एकूण गुन्ह्याच्या परिस्थितीचा साकल्याने विचार करून मामाला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
“सद् रक्षणाय खलनिग्रहणाय ” या ब्रीदाला जागून केलेली कार्यवाही तडीस गेल्याचे समाधान आम्हा अधिकाऱ्यांना लाभले.
अर्थात त्या मुलीचा असा छळ त्या दांपत्याने कशासाठी केला हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.
मध्यंतरी बरीच वर्षे निघून गेली. एका दिवशी दुपारीच माझ्या घराचे दार वाजले. पाहतो तर लेंगा, सदरा आणि टोपी घातलेली एक वयस्क व्यक्ती आणि बरोबर साडी नेसलेली तरुणी घरी आलेले. त्या इसमाचा चेहेरा किंचित ओळखीचा भासला.
” साहेब, आपल्यालाच भेटायला आलो होतो ” असे म्हणत त्याने टोपी काढली, आणि ओळखले. “त्या” मुलीचे वडील. मुलगी आता चांगली उपवर झाली होती. तिचे लग्न त्यांच्या शेजारील गावातील एका तरुण शेतकऱ्याशी ठरले होते. गडहिंग्लज जवळील त्यांच्या गावातून मुंबईत येऊन, पोलिस स्टेशनमधे जाऊन,माझा पत्ता मिळवून खास मला लग्नाची पत्रिका देण्यासाठी दोघांनी सायास घेतले होते.
पत्रिका दिल्यावर माझ्या वाकून पाया पडू लागताच मी त्यांना मना केले तेव्हा त्यांनी ” साहेब तुम्हीं लोक नसतात तर पोरीचं नख सुध्दा दावलं नसतं हो आमच्या मेव्हण्यानं ” असे उद्गार काढले.
चहापान झाल्यावर माझ्या पत्नीने मुलीला यथोचित आहेर केला.
” लग्नाला यायचं नक्की जमवा” असं आर्जव करून दोघेही गेले. मला लग्नाला जाणे शक्य होणार नव्हते.
काही महिन्यांनी मला मुलीचे खुशालीचे पत्र आले. सासरी ती सुखात होती. तिला त्या छळछावणीतून आमच्या अधिकाऱ्यांनी आणून इस्पितळात दाखल केली तेव्हाची तिची दशा आठवली.तिच्याशी इस्पितळात केलेला मुख्यतः प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातील संवाद आठवला. त्या संवादाला कायदेशीर बाबींचे कुंपण होते. त्यात कणव नक्की होती. पण आता मात्र पोलिसांनी बजावलेल्या चोख कर्तव्यामुळे जिव्हाळा निर्माण होऊन ते अधिकारी त्या मुलीला आपले पालक वाटू लागले होते. म्हणून तर मला पाठवलेल्या खुशालीच्या पत्राची सुरुवात तिने “तीर्थरूप बाबा ” अशी केली होती.
— अजित देशमुख.
(नि) अपर पोलिस उपायुक्त.
9892944007.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..