नवीन लेखन...

मालाडची ग्रामदेवता – पाटलादेवी

प्रत्येक घराचे जसे कुदैवत – कुलस्वामिनी, तसंच शहराची, नगराची, गावाची सुद्धा एखादी जागृत देवता ही असतेच ज्याला ग्रामदेवता असंही म्हणतात. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाची एकतरी ग्रामदेवी ही असतेच. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जेव्हा अनेक प्रांत आणि जिल्हे संस्थारुपी असताना त्या-त्या गावाचे आराध्य दैवत असे आणि आजही आहेत. त्यातलीच एक प्रमुख ग्रामदेवता म्हणजे ‘मालाडची पाटलादेवी’.

मालाड पश्चिम स्थित सोमवार बाजारातील पाटलादेवीचे मंदिर स्थानिक लोकांचे ग्रामदैवत आहे. फार पूर्वी म्हणजे आजपासून दोन-तीनशे वर्षापूर्वी मार्वे, मनोरी, चिंचवलीची छोटी छोटी बेटं, खाडी मार्गाने व होडीच्या प्रवासाने जोडली गेलेली गावं ‘साष्टी गावं’ म्हणून ओळखली जात. अशा या गावातील, वस्तीतील माणसं व्यापाराच्या निमित्ताने दर सोमवारी येथे येत असत. आणि तेव्हापासूनच या विभागाचे नाव सोमवार बाजार पडले.

एका आख्यायिकेनुसार कुणा एका काळी माणसाला देवीची मुर्ती सापडली आणि त्याने तिची स्थापना केली. तर पाटलादेवीची दुसरी कथा फारच ह्रद्यस्पर्शी व तितकीच भक्तिपूर्ण आहे. एकदा म्हसाळनगरातील (आत्ताचे मालाड) पाटलांची सून घाराबाहेर आली असताना, तिच्या पाठीमागे इंग्रज व्यक्ती लागली होती. बरंच अंतर धावल्यानंतर शेवटी थकून ती स्त्री एका जागेवर येऊन थबकली आणि तिने देवीचा धावा सुरु केला. देवीने तिच्या हाकेला प्रतिसाद देत तिचं रक्षण केलं व तिची लाज राखली. तिला इंग्रज व्यक्ती पकडायला येणार तितक्यातच ती मूर्तीरुपी स्तब्ध झाली ते आजतागायत. याच त्या स्त्रिला पुढे पाटलादेवी म्हणून लोक ओळखू लागले, अशी आख्यायिका आहे. देवीचं हे स्थान जागृत मानलं गेलंय. म्हणूनच माहिमच्या शितलादेवीप्रमाणे हे एक महत्वाचं धर्मपीठ आहे.

पाटलादेवीची ही मूर्ती अडीच ते सव्वातीन फूट उंचीची दगडी मूर्ती असून तिच्यावर पितळी पत्रा चढवण्यात आला आहे. देवीच्या डाव्या बाजूस खोकलादेवी आणि त्याच्या बाजुलाच शितलादेवी अशा एकूण तीन देवींच्या पूर्वाभिमुख मूर्त्या आहेत. पाटलादेवीची मूर्ती चतुर्भुज असून देवीच्या वर आणि मंदिरावर दोन छत्र आहेत. प्रांगणात २ दगडी दिपमाळाही आहेत.

सदर मंदिरास ऊर्जितावस्था येण्यासाठी बरीचशी वर्ष निघून गेली. मूर्तिच्या देखभाल, दुरुस्तीकडेही फारसं कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. त्याकाळी साष्टी गावाच्या खोताकडे गावाची खोती(कर) वसूल करण्याची जबाबदारी होती. साष्टी गावातील खोताकडे गणपत जीवनजी महंत हे इसम खोती वसूल करत. त्यांच्या प्रयत्नातून देवीच्या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे कार्य यशस्वी झाले. प.पू हरिनंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या वडिलांनी १८०५ साली स्वत:च्या जागेवर पाटलादेवी मंदिराची स्थापना केली. त्यावेळेस लागोलाग हनुमान, शंकर आणि श्रीरामाची मंदिरंही बांधली. १९१० साली गणपत महंत यांनी पाटलादेवीचा गाभारा दुरुस्त केला. लाकडी छताऐवजी घुमट बांधून घेतला. गाभार्‍यासमोर दगडी मंडपाची उभारणी केली आणि घुमटावर सोन्याचा कळसही चढवला. पण मालकाने कळस चढवू नये, कळस चढवणार्‍याचा मृत्यु संभवतो असा प्रवाद होता. तरी महंतांनी तो मानला नाही आणि काही काळातच ते स्वर्गवासी झाले. त्याच दरम्यान त्यांनी देवीचा शतचंडी यज्ञ करण्याचा संकल्प जाहीर केला होता. पण त्यांच्या निधनामुळे ही इच्छा अपूर्णच राहिली. १९६४ साली गणपत महंत यांचे पुतणे द्वारकानाथ महंत यांनी हा संकल्प पूर्ण केला. तत्पूर्वी म्हणजेच १९४५ साली कै.गणपत जीवनजी महंत रिलिजिअस ट्रस्ट असा खाजगी ट्रस्ट स्थापन झाला होता आणि १९५० रोजी तो नोंदवण्यात आला. त्यानंतर १९७८ मध्ये हनुमान मंदिर, पाटलादेवी मंदिर आणि श्रीराम मंदिर यांचा एकच ट्रस्ट बनला. त्याचे मालाड देवस्थान ट्रस्ट असे नामकरण झाले.

आजही अनेक समाजोपयोगी कार्य आणि उपक्रम या ट्रस्टमार्फत राबवले जातात. पाटलादेवी मंदिरात आजही शारदीय, चैत्र नवरात्रौत्सव आणि मार्गशीष महिन्यात जत्रेचं स्वरुप प्राप्त झालेलं असतं. दूरदूरहून देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी उसळते. अनेक नवस बोलून ते फेडले जातात. यातच या जागृत देवीची आख्यायिका दडली आहे. पाटलादेवीचे अस्तित्व ग्रामदेवता-उपास्य देवता या संबंधाने अजूनही ऐतिहासिक परंपरा राखून आहे.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..