नवीन लेखन...

विमामहर्षी अण्णासाहेब चिरमुले

जन्म. ४ जून १८६४ रोजी सातारा येथे.
अण्णासाहेब चिरमुले हे युनायटेड वेस्टर्न बॅँकेचे संस्थापक म्हणून सर्वानाच परिचित आहेत. पण अत्यंत निरलस आणि नि:स्वार्थी वृत्तीने त्यांनी पाच संस्था नावारूपाला आणल्या. कालौघात दुर्दैवाने बॅँकेसह त्यांच्या सर्व संस्थांचे अस्तित्व संपुष्टात आले.
या द्रष़्ट्या विमामहर्षीच्या कल्पकतेने सातारा शहर देशाच्या आर्थिक नकाशावर आले.

अण्णासाहेब चिरमुले यांचे शालेय शिक्षण साताऱ्यात झाले. सुरवातीपासून हुशार स्वभाव. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे नादारी मागून शिक्षण कसबसं चाललं होतं. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश केला.त्याकाळी बैलगाडीने मुंबईला जाऊन परीक्षा दिली आणि आपल्या हुशारीने सर आल्फ्रेड शिष्यवृत्ती मिळवली.

पुढे मुंबईच्या सुप्रसिद्ध एलफिन्स्टन कॉलेजमधून इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन अण्णासाहेब बी ए केले. त्यांना पुढे एलएलबीच शिक्षण घ्यायचं होत पण घरची परिस्थिती आणि नुकतंच झालेलं लग्न यामुळे तात्पुरती शिक्षकाची नोकरी सुरु केली. याच काळात मुंबईत काही सहकाऱ्यांबरोबर ‘दि मराठा स्कूल’ या नावाची एक शाळाही काढली. काही काळ जमखंडी येथे देखील एका शाळेत शिकवलं. अण्णासाहेब जेव्हा एल एल बी झाले तेव्हा त्यांना मुधोळ संस्थानात न्यायाधीश मिळाली. तिथे न्यायदानाचे काम निस्पृहपणे केले. एका खटल्यात मात्र वरून दबाव येत असल्याचे लक्षात येताच अडथळ्यास न जुमानता कायदा पाळूनच निकाल दिला आणि त्या नोकरीचा राजीनामाही दिला. १८९४ साली अण्णासाहेब चिरमुले साताऱ्याला आले. येथे वकिलीस प्रारंभ केला, सोबत लॉ चे क्लास घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी नव्यानेच स्थापन झालेल्या सातारा नगरपालिकेच्या अनेक कमिट्यांवर काम केले.
सातारा शहरात अनेक सामाजिक उपक्रमात ते भाग घेत होते, वकिली उत्तम सुरु होती मात्र त्यांचा खरा पिंड उद्योजगतेचा होता. याच काळात स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीने जोर धरला होता. लोकमान्य टिळकांनी स्वदेशीचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यास सुरवात केली होती. तेव्हा अण्णासाहेब चिरमुले व त्यांचे काही सहकारी यांनी मिळून चार हजार रुपयांच्या भांडवलावर १९०६ साली स्वदेशी कापड विकणारे दुकान सुरु केले. पुढे मद्रास येथून साखर मागवून ती साताऱ्यात विकण्यास सुरवात केली. त्यांची प्रसिद्धी एवढी झाली कि हीच साखर ते पुण्या मुंबईला विकू लागले.
अण्णासाहेबांचं अर्थशास्त्राचा ज्ञान वाखाणण्याजोगं होतं. दुकानास भांडवलाची कमतरता पडू नये म्हणून त्या दुकानात ठेवी ठेवून घेण्यास सुरुवात प्रथमपासूनच केली होती. ठेवींवर व्याजही दिले जाई. ठेवलेले पैसे जरुरीप्रमाणे परत मिळत. त्याची सुरुवात तेथून झाली. विशेष म्हणजे, त्या दुकानांतून विधवा, विद्यार्थी आणि अनाथ यांपैकी लायक व्यक्तींना खरेदीवर सवलत दिली जात असे. यातूनच सातारा स्वदेशी कमर्शियल बँकेची स्थापना १९०७ साली करण्यात आली.
त्याकाळी साताऱ्यामध्ये काकाराव जोशी आणि वासुदेव जोशी हे दोन इन्शुरन्स एजंट होते. त्यांच्या इन्शुरन्स कंपन्या परदेशी होत्या. त्याकाळी भारतात बहुतांश इन्शुरन्स कंपन्या ब्रिटिश मालकीच्या होत्या. अशात आपली स्वदेशी इन्शुरन्स कंपनी अशी कल्पना या जोशींच्या मनात आली. हे करू शकणारा एकमेव हुशार व्यक्ती त्यांच्या माहितीत होता तो म्हणजे अण्णासाहेब चिरमुले.

अण्णासाहेब हि कंपनी सुरु करण्यासाठी तयार झाले मात्र त्यापूर्वी त्यांनी १९१० ते १९१२ पर्यंत या इन्शुरन्स व्यवसायांवरील पुस्तके अमेरिकेतून मागवून त्यांचा सांगोपांग अभ्यास केला. त्यांचे मित्र वामनराव गोवईकर यांनी त्या काळी पंचवीस हजार रुपयांचे रोखे कंपनीस दिले. त्या बळावर कंपनी मुंबईस रजिस्टर झाली आणि मगच १९१३ सातारा शहरात ‘वेस्टर्न इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनी’ची (विलिको) अस्तित्वात आली.

असं म्हणतात कि याच कंपनीचे पहिले नाव वेस्टर्न इंडिया म्युच्युअल अश्युरन्स असं होतं ज्याच्या इनिशियल्स एकत्र केले तर उच्चार WIMA म्हणजेच विमा असा होतो. कित्येक जणांचे म्हणणे आहे की लाईफ इन्श्युरन्सला आयुर्विमा हे नाव चिरमुले यांच्या विमा कंपनीमुळे मिळाले आणि याच विमाला हिंदीत बिमा असं म्हटलं जाऊ लागलं. ही गोष्ट खरी आहे का हे नक्की माहित नाही पण विमा महाराष्ट्रात रुजवली ती अण्णासाहेब चिरमुले या दूरदृष्टीच्या उद्योजकानेच.

पुण्या मुंबईच्या बाहेर सातारा सारख्या तेव्हाच्या छोट्याशा शहरात एक मराठी माणूस विमा कंपनी सुरु करून ती यशस्वी पणे चालऊन दाखवतो हे अनेकांसाठी सुखद आश्चर्याचा धक्का होता. अंगभूत सचोटी, चिकाटी आणि चातुर्य हे भांडवल तर होतंच शिवाय अण्णासाहेब चिरमुले नवीन शिकण्यासाठी कायम उत्सुक असायचे. या विलीको कंपनीमार्फत विमा एजंटांना कमिशनखेरीज प्रॉव्हिडंट फंड व विम्याची व्यवस्था करण्यात आली होती. फक्त महाराष्ट्रातच नाही तर सिंध पासून मद्रासपर्यंत या कंपनीच्या शाखा उघडण्यात आल्या.

त्यांचा विमा क्षेत्रातील अभ्यास संपूर्ण भारतात एक आदर्श म्हणून मानला जाऊ लागला. १९३६ साली त्यांनी पुण्यात पुण्यास भरलेल्या विमा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. अण्णासाहेबांची विमाक्षेत्रातील भरीव कामगिरी व तपश्चर्या यामुळे त्यांना विमामहर्षी हि पदवी देण्यात आली.

विलिकोकडे विमाहप्त्यांच्या रूपाने जसा अधिकाधिक पैसा येऊ लागला तसतशा गुंतवणूक संधी अण्णासाहेबांना अपुऱ्या वाटू लागल्या. कंपनीच्या विमेदारांनी ठिकठिकाणी भरलेल्या हप्त्यांच्या रकमांची वसुली विविध बँका करत होत्या. तसेच, गुंतवलेल्या रकमांचे रोखे अगर शेअर सर्टिफिकिटे सुरक्षित ठेवून त्यांच्या व्याजाची वसुली दरसाल करण्याचे कामही काही बँका करत होत्या. त्या कामांसाठी कंपनीला बरेच कमिशन बँकांना द्यावे लागे.

त्यामुळे स्वत:चीच एखादी बँक असल्यास तो पैसा त्याच बँकेस मिळेल असा विचार करून अण्णासाहेबांनी १९३६ साली सातारा येथे ‘दि युनायटेड वेस्टर्न बँक लि.’ची स्थापना केली.

युनायटेड वेस्टर्न बँक, विलिको, सातारा स्वदेशी अर्बन बँक, विमा छापखाना आणि पुढे १९४६ साली स्थापन केलेली ‘वेस्टर्न इंडिया ट्रस्टी ॲ‍ण्ड एक्झिक्युटर कंपनी’ या पाचही संस्थांना अण्णासाहेब आपुलकीने स्वत:च्या ‘पंचकन्या’ म्हणून संबोधत असत.

चिरमुले यांनी आपल्या संस्थांना पाश्चिमात्य (वेस्टर्न इंडिया लाइफ इन्श्युरन्स, युनायटेड वेस्टर्न बँक, वेस्टर्न इंडिया ट्रस्टी ॲ‍ण्ड एक्झिक्युटर कंपनी) नावे दिली होती. या पाचही कंपन्या त्यांनी सचोटीने आणि काटकसरीने चालवल्या, त्यांची प्रसिद्धी देशभरात झाली.

आजसुद्धा युनायटेड वेस्टर्न बँकेचे नाव निघाल्यावर लोकांचा ऊर भरून येतो. महाराष्ट्रालाच नव्हे, तर चेन्नई, मध्य प्रदेश, दिल्ली येथील ग्राहकसुद्धा आपुलकीची बँक म्हणून सातारा शहराने दिलेल्या आíथक क्षेत्रातील या ब्रँडचा आवर्जून उल्लेख करतात. साताऱ्यातील ही छोटी, पण गुणी बँक तिच्या विशिष्ट सेवावृत्तीमुळे ग्राहकांना हुरहुर लावून गेली. अनंत काळापर्यंत त्या ब्रँडची आठवण तळपत राहील.

१९५१ साली त्यांच्या मृत्यूनंतर संचालकांनी या कंपन्या तितक्याच तत्परतेने चालवल्या.

कालौघात या कंपन्या आता उरल्या नाहीत, स्वातंत्र्यानंतर विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि विलिको एल आय सी मध्ये विलीन करण्यात आली. मात्र तरीही त्यांनी घालून दिलेला वारसा आज महाराष्ट्रात कायम आहे.

१०० वर्षांपूर्वी विमा कंपनी स्थापन करून साताऱ्याला देशभरात नवी ओळख मिळवून देणाऱ्या अण्णासाहेब चिरमुले यांच्या आठवणी सातारा सांगली जिल्ह्यांमध्ये जपलेल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर अर्थक्षेत्रात भरावी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विमामहर्षी अण्णासाहेब चिरमुले स्मृती पुरस्काराने सन्मानित केले जाते. यात डॉ.मनमोहन सिंग, नारायण मूर्ती अशा अनेक दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

अण्णासाहेब चिरमुले यांचे २९ऑगस्ट १९५१ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..