जगलो जगती खुप छान
सारे काही मिळाले आहे
आतातरी थांबले पाहिजे
हे मात्र कळून चुकले आहे
देणारा तो एकच मुक्तदाता
झोळीच आपुली छोटी आहे
किती घ्यावे, किती असावे
हेच जगण्याचे खरे मर्म आहे
अनंत हस्ते तोच उधळतो
आपली ओंजळ अपुरी आहे
जे आहे ते सदा देत रहावे
मनामनांत रहाणे ब्रह्मानंद आहे
ऋणानुबंधी सारा मायाजाल
विरक्त जगणे, मन:शांती आहे
सुखदुःख खेळ मनभावनांचे
केवळ, प्रारब्ध भोगणे आहे
हसत जगावे, हसत मरावे
सत्ताधीशा नित्य स्मरणे आहे
मोक्षमुक्ती याही मनकल्पना
अंतर्मुख होवुनी जगणे आहे
— वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १३६.
१९ – ५ – २०२२.
Leave a Reply