एका अज्ञाात लेखकाने विराट कोहलीला लिहिलेले हे खरमरीत पत्र. मराठीत असल्यामुळे कोहलीपर्यंत पोहोचणार नाही.. पण भाषांतर करुन कुणीतरी त्याच्यापर्यंत पाठवायलाच हवे. कळून दया त्याला त्याची लायकी…
विराट कोहली यास,
1991 ते 1999 या दरम्यान 2 क्रिकेटर असे होते की त्या त्यांच्याशिवाय भारतीय क्रिकेटची कोण कल्पनाच करत नव्हते. ते दोन खेळाडू म्हणजे एक सचिन तेंडुलकर आणि दुसरा अनिल कुंबळे. सचिनच्या खांद्यावर पूर्ण टीम इंडियाच्या फलंदाजीची धुरा असायची तर कुंबळेवर गोलंदाजीची.
अत्यंत खडतर काळात या दोघांनी टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले. बऱ्याच वेळा एकहाती विजयही मिळवून दिले. भारतातीलच नाही तर पूर्ण जगातल्या क्रिकेट चाहत्यांनी त्यांना डोक्यावर घेतले.
सचिनची विकेट मिळाली की स्वर्गातील अप्सरे बरोबर जणू काय लग्न ठरले असे गोलंदाज नाचायचे. पण सचिनचे चाहते सचिन बाद झाला कि आपला टेलिव्हिजन बंद करायचे. कारण सचिन बाद झाला की संपलं सगळं असं वाटायाचे. सचिन फलंदाजी करताना आजारी माणसेही ताजीतवानी असल्यासारखी टेलिव्हिजन समोर बसायची. आग ओकणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाजीच्या चिंधड्या उडवण्याची ताकद सचिनच्या मनगटात होती. एकदिवसीय सामन्यात डबल सेंच्युरी फलंदाज करू शकतो हे जगाला प्रथम सचिनने दाखवून दिले.
आणि एका डावात 10 बळी घेणारी जादुई किमया करणारा गोलंदाज म्हणजे कुंबळे. मोठमोठे फलंदाज कुंबळेची गोलंदाजी फक्त खेळून काढली तरी स्वतःला धन्य समजायचे. कारण कोणत्या चेंडूवर दांडी गुल होईल याचा काही नेम नसायचा. कसोटी क्रिकेटमध्ये 619 बळी कुंबळेच्या नावावर आहेत.
जगातल्या अगदी मोजक्या गोलंदाजांमध्ये कुंबळेचे नाव घेतले जाते. तर तेंडुलकरच्या विश्वविक्रमांबद्दल दुनिया ज्ञात आहे. क्रिकेटविश्वात एवढा मोठा दबदबा असून पण सचिन आणि कुंबळे या दोघांचेही पाय जमिनीवर होते. दोघेही नेहमी नम्र राहिलेत. आणि आजही माणुसकीचे पुजारी आहेत. क्रिकेट रसिकांच्या हृदयात त्यांना स्थान होते. ते अजूनही कायम आहे.
विराट… एक गोष्ट तुला मुद्दाम सांगावीशी वाटते ती म्हणजे 4 वर्ष प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर 1996 साली अजित वाडेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सचिन आणि कुंबळे हे अजित वाडेकरांच्या स्नेह आणि आदरापोटी रडले होते. असे संबध होते खेळाडू आणि प्रशिक्षकाचे.
पण काल सकाळी भारतीय चमूत दाखल झालेला तू अजून शेमडाचं आहेस रे. तुला सचिन किंवा कुंबळेच्या नकाची पण सर नाही. 4 सेंच्युरी काय मारले तर तुला वाटते तू तेंडुलकर झालास आणि तुझ्यासारखा जगात कोण अजून फलंदाजच नाही. अरे असे सेंच्युरी मारून तेंडुलकर नाही बनता येत बाबा. तेंडुलकर बनण्यासाठी यश डोक्यात नाही गेले पाहिजे आणि पाय पण जमिनीवर पण असले पाहिजेत. पण विराट… तुला यातले एकही जमत नाही. आणि ते जमणारही नाही. कारण तेंडुलकर बनणे एवढे सोपे नाही.
तू ज्याप्रमाणे मैदानात आणि मैदानाबाहेर वागतोस तसाच एक खेळाडू वागायचा. खूप मोठे नाव होते त्याचे. असामान्य प्रतिभा असलेल्या त्या खेळाडूला आता साधा कोण ओळखत पण नाही. विनोद कांबळी त्याचे नाव. तुझ्यासारखाच वागायचा तो. स्वतःच्या स्वभावनेच त्याने स्वतःचा नंतर घात करून घेतला. कारण ही दुनिया अरेरावी करणाऱ्या माणसांना सलाम नाही करत.
आता तूच बघ ना…तू कॅप्टन झाल्यावर ग्रेग चॅपल सारखे नाही तर कुंबळे सारखे मेहनतीवर विश्वास असणारे शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व हे टीमला प्रशिक्षक म्हणून मिळाले. आणि टीम इंडिया भराभर कसोटी सामने आणि मालिका जिंकत गेली. पण तुला वाटले सर्व तुझ्या कॅप्टन्सीची किमया. तुझा भ्रम आहे हा. अजूनही तुला मैदानात कठीण प्रसंगी धोनीची मदत घ्यावी लागते. यातच सर्व चित्र स्पष्ट होते.
तुझे नशीब चांगले समज कारण तुझा सामना फक्त लल्लू पल्लू गोलंदाजांशी झाला. सचिनच्या काळात इम्राईन, वकार, अक्रम, कादिर, शोएब, हेडली, डोनाल्ड, अँब्रोज, ऑल्श, वार्न, मॅकग्राथ, गेलेस्पी, मुथय्या, सारखे गोलंदाज होते. सचिन अशा गोलंदाजांचा सामना केला. तसा एकही गोलंदाज आता दिसत नाही. शिवाय तू फलंदाजी ज्या संघाविरुद्ध करतोय ना त्या संघाचे कॅप्टन स्टीव्ह वा, हॅन्सी क्रोनए, रणतुंगा, सलिम मलिक हे नाहीत. ते सचिनच्या वाट्याला आलेत. उगाच सचिनला क्रिकेटचा भगवान नाही बोलत.
तुला एक सांगतो, ते कायमचे लक्ष्यात ठेव. गावस्कर, कपिलदेव, तेंडुलकर, कुंबळे, गांगुली, द्रविड आणि धोनी यांचे भारतीय क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण योगदान आहे. यांनी भारतीय क्रिकेटला जगात नव्या उंचीवर नेवून ठेवलंय. तू आता आला आहेस.. आयत्या घरावर रेगोट्या ओढायला.. तू कुंबळेसारख्या क्रिकेटरचा अपमान केलास. आणि माझ्यासारख्या असंख्य क्रिकेट चाहत्यांच्या मनातून उतरलास. काहीही झाले तरी अशा वीरांचा अपमान क्रिकेट रसिक सहन करणार नाही. आता तुझा विनोद कांबळी होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Leave a Reply