विरोध होता क्रोध वाढतो
जाळुनी टाकी सारे
लाकडातल्या अग्नी ने
लाकूडच बनती निखारे
वानर येति रचुनी लाकडे
अग्नी शमवूनी जाई
मनातला तो क्रोध घालावी
हनुमंत प्रसाद देई
अर्थ–
ज्यात जे आहे तेच त्याच्या विनाशाचं कारण ठरू लागलं तर आयुष्य क्षणात संपायला वेळ लागत नाही. लाकडात असलेला अग्नी शेवटी त्याच लाकडाला जाळून टाकतो आणि त्याची केवळ राख बनून रहाते. तसेच माणसाच्या शरीरातील क्रोध हाही अग्नीचाच प्रकार म्हणून समजला जातो. एखाद्या वेळी जर तो क्रोध वाढू लागला तर त्या अग्नीचे वणव्यात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही आणि एकदा का वणवा पेटला की मग त्या क्रोधाग्नीत शरीरातील इतर चांगले गुण जळून राख होतात आणि मग हातात काहीच रहात नाही.
आपल्या आजूबाजूचे आपल्याला कोणत्या गोष्टी साठी चिथवत तर नाहीत ना? आपण आपल्या क्रोधाचा बळी तर ठरत नाही ना? याचा विचार करायला पाहिजे. अशा वेळी श्री हनुमंत यांची आठवण होते. क्रोधास क्रोध न मानता त्यास ऊर्जा म्हणून जेव्हा पाहिले जाते तेव्हा त्याचा फायदा खुप जास्त होतो याचे उत्तम उदाहरण आहे श्री मारुती. ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली गेली की लंका दहन सारखे अशक्य पराक्रम ही शक्य होतात.
महाराजांच्या मावळ्यांनी त्यांची ऊर्जा स्वराज्य स्थापन करण्यात लावली त्यामुळे बाजीप्रभू, तानाजी, हिरोजी, बहिर्जी सारखे पराक्रमी घडले आणि हे स्वराज्य उभे राहिले.
आपल्यातल्या क्रोधास बांध घालून ती ऊर्जा योग्य ठिकणी वापरली तर त्यातून पराक्रमाची ज्योत पेटेल, मग वणवा खूप दूर राहिला.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply