छुप गए वह साज़-ए-हस्ती छेड़कर अब तो बस आवाज़ ही आवाज़ है आपल्या १३१ कोटी लोकसंख्येच्या खंडप्राय देशात दोन व्यक्तींमधे नामसाधर्म्य आढळणे हा काही खचितच योगायोग मानला जाऊ नये.
माझा एक मामेमामा (आईच्या मामेभावाला तेच म्हणतात ना ?) मला मध्यंतरी सांगत होता की ‘उदय मधुकर प्रधान’ हे त्याचेच पूर्ण नाव धारण करणारे अजून दोन सद्गृहस्थ त्याच्या ओळखीचे आहेत. आणि मला वाटतं नुसतं ‘उदय प्रधान’ हे नाव मिरवणारे अजून किती पापभिरु कायस्थ या पृथ्वीतलावर असतील ते केवळ ताम्हणी घाटातील देवी विंजाईच जाणे. मात्र “पंकज गुप्ते” या नावाच्या दोन व्यक्ती माहीमच्या टायकलवाडीत एकाच इमारतीत रहात असाव्यात आणि त्या काही काळ बालमोहन विद्यामंदिर शाळेत एकाच वर्गात असाव्यात हा के.सी.बोकाडीया अथवा गेला बाजार अर्जुन हिंगोरानींच्या बटबटीत मसालापटात शोभणारा योगायोग मात्र एकदा जुळून आला होता. वर्गात ऑलरेडी एक ‘पंकज (मोहन) गुप्ते’ असताना,गल्लाभरु चित्रपटात मध्यांतरानंतर “पाहुणा कलाकार” यावा तसा पंकज (हेमंतकुमार) गुप्ते आमच्या वर्गात प्रगटला.
अभ्यासासारख्या क्षुद्र गोष्टींचा त्याला मनस्वी तिटकारा होता. त्याच्याबरोबर मर्यादित काळ शेवटच्या बाकावर बसण्याचे सौभाग्य मला व नारायणला लाभले होते. आमची बौद्धिक क्षमता एकाच पातळीवरची (की बाकावरची ?) होती याची आमच्या वर्गशिक्षकांना खात्री असावी. तो दोन तासांच्या मधे (व बऱ्याचदा तर तास सुरु असतानादेखील) दोन्ही हातांनी सारखा बाक बडवत असे. ‘हे काय आहे ?’….मी एकदा न राहून विचारले.
“काँगो वाजवतोय”
‘काँगो ?’…काँगो ही एक आफ्रिका खंडातील अमेझॉनसारखीच ( त्यावेळी लोकांना घरोघरी सत्यनारायणाचा प्रसाद वाटावा तशी पुठ्ठ्यांची खोकी वाटणारी “अमेझॉन” जन्माला आली नव्हती.) नदी असून तिच्या खोऱ्यात काँगो नावाचीच डेंजरस आदिवासी जमात रहाते असा तोपर्यंत आमचा बालबुद्धी समज होता.
“होय… ते बॉंगोसारखंच एक वाद्य असतं.” ‘असं होय’….आम्ही काँगोच्या तालावर नंदीबैलासारख्या माना डोलविल्या. पण आमच्या इतक्या निरुपद्रवी चौकशीनेदेखील तो उत्तेजित झाला आणि बाक बडविता बडविता त्याने अचानक गायला सुरुवात केली….
“कितना हसीं है मौसम, कितना हसीं सफर है” ( चित्रपट-आझाद, संगीत-सी.रामचंद्र). त्याच्या आवाजाची जातकुळी ही मूळ गाण्यातील सी. रामचंद्रंच्या बसक्या आवाजापेक्षा तलत महमूदच्या मखमली आवाजाशी जास्त जवळीक साधणारी होती हे आजही मला स्पष्ट आठवतंय. एखाद्या वारकऱ्यासारखे त्याच्या चेहऱ्यावरचे तल्लीन भाव पुन्हा मला त्याच्या चेहऱ्यावर कधी दिसले नाहीत. गाणे अर्ध्यावर आले असताना त्याने अचानक काँगो वाजविणाऱ्या उजव्या हाताची मूठ वळली आणि ती नाकाजवळ नेत तो गाऊ लागला.
‘हे काय आहे ?’…..गाणं संपल्यासंपल्या मी व नारायणने एकाच बावळट सुरात विचारले. “तो माईक आहे!”…. पंकजच्या चेहेऱ्यावर आम्हाला ज्ञानामृत पाजणाऱ्या ओशो रजनिशांचे भाव होते. तो आईस्क्रीमचा कोन किंवा गांजाची चिलीम असावी असा आमचा समज झाल्याचा त्याला संशय आला असावा. एकदा मराठीच्या पहिल्याच तासाला तो आम्हाला (जे काही सांगायचं ते तो आम्हा दोघांना एकदमच सांगत असे.) म्हणाला …”मी जरा तासभर झोपतो. तुम्ही दोघे मला कव्हर करा.” इतके सांगून आणि त्या ‘काँगो’ची उशी करुन तो खुशाल निद्रिस्त झाला. पुढील दोन तास कव्हरला अप्रतिम क्षेत्ररक्षण करणाऱ्या इंग्लंडच्या डेरेक रँडॉलप्रमाणे मी व नारायण त्याला ‘कव्हर’ करीत होतो.
शत्रूपक्षावर फायरींग करणाऱ्या नायकाला “कव्हर” देणारे सहकारी मी हॉलीवूडच्या सिनेमात पाहिले होते. पण मित्राच्या झोपेवर पुस्तकाला घालतात तसे ‘कव्हर’ घालता येते हे मी पहिल्यांदाच अनुभवले. दोन तासांच्या गाढ निद्रेने ताजातवाना व आमच्यावर प्रसन्न झालेला पंकजदेव मग आम्ही न विचारताच सांगू लागला…”अरे अण्णांच्या (पक्षी:अण्णा चितळकर तथा सी.रामचंद्र) ‘भुलाये न बने’ वाद्यवृंदात काँगो वाजवतो मी.
काल रात्री ‘शिवाजी’ला कार्यक्रम होता. कार्यक्रम हाऊसफुल्ल होता. अण्णांना ‘अलबेला’तील गाण्यांचे बरेच वन्समोअर मिळाले त्यामुळे कार्यक्रम बराच लांबला. त्यानंतर अण्णांना त्यांच्या घरी सोडून मग झोपायला खूप उशीर झाला.”… त्याने अडीच मार्कांचे स्पष्टीकरण दिले. त्याच्या “कितना हसीं है मौसम” चा उगम हा होता तर. वर्गात मधेच तो शून्यात नजर लावून “चलते चलते मेरे ये गीत याद रखना,कभी अलविदा ना कहना” गुणगुणत असे. खूप खूप वर्षांपूर्वी, म्हणजे जेव्हा मुंबईत मराठी टक्का (तब्बल) ३६% होता,आणि जेव्हा शिवसेनेच्या शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्यातील बाळासाहेबांच्या शब्दस्फुल्लिंगांनी,दव पडलेल्या गवताच्या ओल्या पात्यांतूनसुद्धा ठिणग्या उडायच्या त्या काळात, राज ठाकरेंनी मराठी माणसाने नोकरी एके नोकरी न करता उद्योगाभिमुख व्हावे म्हणून त्याला मार्गदर्शन करण्यासाठी “शिवउद्योग सेने”ची स्थापना केली होती. (सहज आठवलं म्हणून…. या “शिवउद्योग सेने”मुळे फक्त उद्धव व राज या दोनच मराठी तरुणांना ‘उद्योग’ मिळाला अशी बोचरी टीका तेव्हा ‘जाणता राजा’ने केली होती.
गळ्यात फुलपुडीचा दोरा बांधलेला नट राजकुमार आज असता तर म्हणाला असता….जानी, ये वक्त वक्त की बात है और वक्त का ही तो दुसरा नाम इतिहास है !) या ‘शिवउद्योग सेने’च्या निधीसंकलनासाठी राज ठाकरेंनी अंधेरीच्या शहाजीराजे संकुलात साक्षात लताताईंच्या संगीतसंध्येचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. तब्बल बारा वर्षांनंतर लताताई स्टेजवर गाणार होत्या. त्याकाळी थेट प्रक्षेपणासाठी अतिशय बाळबोध पद्धत अवलंबली जात असे. लग्नाच्या स्वागतसमारंभाच्या व्हिडीओ शूटिंगसाठी जसे कॅमेरामन स्टेजवर,दोन्ही लग्नाळू करवल्या व्यवस्थित फ्रेममध्ये येतील असा कोन लावून खुशाल सिगारेट प्यायला हॉलबाहेर जात असत,त्याचप्रमाणे वाद्यवृंदाच्या कार्यक्रमातदेखील मुख्य गायक व अर्धेअधिक स्टेज दृष्टीपथ्यात येणारा कोन साधला जात असे. त्या कार्यक्रमात भान हरपून काँगो वाजविणारा पंकज नेमका मुख्य गायक/गायिकेच्या मागेच बसला होता. त्यामुळे जितका काळ लताताई छोट्या पडद्यावर दिसल्या नाहीत त्यापेक्षा जास्त वेळ (खरं म्हणजे संपूर्ण साडेतीन तास) तोच पडद्यावर दिसला होता. शाळेत एकदा एका वर्गशिक्षिकेच्या सुपीक डोक्यातून (उवा निघाव्यात तशी) राखीपौर्णिमेला वर्गातील मुलींनी (वर्गातीलच) मुलांना राखी बांधावी अशी भन्नाट कल्पना निघाली होती. नशिब,’अ’ वर्गातील मुलींनी ‘ब’ वर्गातील मुलांना आणि ‘ब’ वर्गातील मुलींनी ‘क’ वर्गातील मुलांना राखी बांधावी अशी उतरती भाजणी कोणाला सुचली नव्हती.
नाहीतर आमच्या वर्गातील किमान अर्ध्या मुलांनी तरी त्यादिवशी शाळेला बुट्टीच मारली असती. प्रविण मार्तंड रेगेचा उजवा हात त्यादिवशी कोपरापर्यंत राख्यांनी भरुन गेल्याचे मला लख्ख स्मरते. हा राख्या बांधायचा घाऊक हृदयस्पर्शी सोहळा सुरु असताना ‘पंकज कुठे आहे ? मला त्याला राखी बांधायची आहे.’…..अशी विचारणा नयना माणगावकरने (मला राखी बांधून झाल्यावर) माझ्याकडे केली (See the range). पण ही राखी बांधायची भानगड बघून पंकजने केव्हाच शाळेतून सुंबाल्या केला होता. त्यानंतर जवळपास दोनेक वर्षांनी तो मला भेटला.
माहीमच्या राजा बढे चौकात,बँक ऑफ बडोदासमोर त्याने मला मोठ्याने साद घातली.
“काय म्हणतोस संदीप ? कसा आहेस ? काय चाललंय ?”
“बाकीचे आपले मित्र कसे आहेत ?”
“नारायण ? आनंद ? अनिल ? अभय ?”
“तुम्ही भेटता की नाही अजून ?”
त्याने प्रश्नांची सरबत्ती केली आणि मी तोंड उघडायच्या आधीच तो उत्साहात म्हणाला …..”मीदेखील यंदा मॅट्रिक झालो. दिल्ली बोर्डाची बाहेरुन परीक्षा दिली. मला ६२% मार्क्स मिळाले. त्यांचे बाकी सगळे विषय आपल्यासारखेच असतात फक्त राज्यशास्त्र हा वेगळा विषय असतो.”
माझ्या चेहेऱ्यावर अचंबा, आश्चर्य आणि अविश्वास असे असंख्य ‘अ’कार वस्तीला आले असावेत. “चल निघतो…. जरा घाईत आहे”……माझ्या चेहेऱ्याच्या बदललेल्या ‘आ’काराकडे लक्ष न देता कपाळावरचे केस झटक्यात मागे सारत (तो त्याच्या ट्रेडमार्क होता) पंकज वदला. तो भूतकाळातून आला होता पण वर्तमानातल्या एकाही उत्तरासाठी थांबला नाही आणि घाईघाईने भविष्यकाळाकडे शिवसेनाभवनच्या दिशेने निघून गेला. त्याचा ठाकरे कुटुंबियांशी काही नातेसंबंध आहे म्हणतात. मला त्याच्या त्या नातेसंबधात काडीचाही रस नाही.
मात्र चाळीस वर्षांनंतर तो अजूनही तितक्याच असोशीने,तडफेने आणि श्रद्धेने “कितना हसीं है मौसम, कितना हसीं सफर है” वाजवितो आणि गातो का, आणि “चलते चलते मेरे ये गीत” स्वतःशीच गुणगुणतो का हे मात्र शक्य असल्यास जाणून घ्यायला मला आजही आवडेल. सारी महफिल जिस पे झूम उठ्ठी मजा वह तो आवाज़-ए-शिक़स्त-ए-साज़ है
(पूर्ण मैफील वाहवा वाहवा करु लागली; पण ते संगीत नव्हतं नि गाणंही नव्हतं. तुटलेल्या वाद्याचा आवाज होता तो.)
संदीप सामंत
९८२०५२४५१०
१०/१२/२०२०.
Leave a Reply