जानकीला जाऊन महिना झाला होता. आलेली पाहुणे मंडळी पंधरा दिवस राहून नंतर आपापल्या गावी निघून गेली होती. लग्नानंतर हैदराबादला राहणारी जानकीची मुलगी दिपाली, निघताना बाबांना म्हणाली, ‘बाबा, हवापालटासाठी माझ्याबरोबर हैदराबादला चला. तेवढंच बरं वाटेल तुम्हाला.’
श्रीरामने दिपाली बरोबर जाण्यास नकार दिला. ती नाराजीने निघून गेली. घर सुनंसुनं दिसू लागलं.
पस्तीस वर्षांच्या जानकीच्या सहवासात त्याच्यावर अशी एकटेपणाची वेळ कधीही आलेली नव्हती. त्याला जानकी सोबत घालवलेले दिवस आठवत होते. त्यानं कितीही आदळआपट केली तरी जानकी नेहमी शांतच रहायची. त्यांना पहाणाऱ्यांच्या दृष्टीने ती एक आदर्श जोडी होती. जानकी स्वभावाने होतीच तशी, सर्वांमध्ये मिळून मिसळून रहाणारी. श्रीरामला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की, ती त्याला असं अर्ध्यावर सोडून जाईल.
उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर वळताना श्रीरामला जानकीच्या आठवणीने हुंदका अनावर झाला. त्याच्या डोळ्यांसमोर तिचा जीवनपट तरळू लागला….
जानकीचं श्रीरामशी लग्न झालं तेव्हा ती अवघी बावीस वर्षांची होती. लग्नानंतर ती प्राथमिक शाळेत शिक्षिकेच्या नोकरीला लागली. नोकरी व घर सांभाळून तिनं नेटाने संसार केला. दोन वर्षांनी दिपालीचा जन्म झाला. दिपाली अतिशय सुंदर, हुशार, अभ्यासू होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर दिपालीनेच पसंत केलेल्या अजय बरोबर तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर ती दोघं नोकरीच्या निमित्ताने हैदराबादला रवाना झाली.
चार महिन्यांपूर्वीच जानकी सेवानिवृत्त झाली. श्रीरामने ठरवलं होतं की, तिच्या निवृत्तीनंतर काशी, प्रयाग तीर्थयात्रा करायला जायचं. आयुष्यभर कष्ट केले, आता जीवनाचा आनंद घ्यायचा. सगळं काही आलबेल असताना ती अशी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्याला एकटं सोडून गेली. आधी लक्षातच आलं नाही तिच्या या गंभीर आजारपणाबद्दल. जेव्हा समजलं, तेव्हा फारच उशीर झालेला होता.
रात्री झोप न लागल्याने श्रीराम दुसरे दिवशी सकाळी उशीरा उठला. सर्व आवरल्यावर त्याने अंगात शर्ट घालण्यासाठी कपाट उघडले. वरच्या कप्यातून इस्त्री केलेला शर्ट काढताना एक डायरी खाली पडली. त्याने डायरी उचलली व खुर्चीत बसून डायरीतील एकेक पानावर नजर टाकू लागला…
दिनांक….
लग्न होऊन नुकताच महिना झालाय. या घरातलं वातावरण विचित्र वाटतंय. सासू सासरे सारखे भांडत असतात. हे नोकरीच्या निमित्ताने महिन्यातील निम्मे दिवस फिरतीवर असतात. जेव्हा घरात असतील तेव्हा स्वतःचंच म्हणणं खरं करतात. मी आता ठरवलंय, ते म्हणतील तसंच वागायचं….
जानकीनं अजूनही खूप काही लिहिलं होतं, तरी त्यानं पुढचं पान उलटलं.
दिनांक…..
आज लग्नाचा पहिला वाढदिवस. मी यांना म्हणाले, ‘आज आपण फिरायला जाऊ आणि येताना बाहेर हाॅटेलातच जेवण करून येऊ.’ त्यावर हे म्हणाले, ‘मला नाही बाहेर जेवायला आवडत, तुला हवं असेल तर मी तुला हाॅटेलात सोडतो.’
हे काय बोलणं झालं का? मला फार वाईट वाटलं. मैत्रिणी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल सांगायच्या… नवऱ्यानं गिफ्ट दिले, फिरायला गेलो…
यांना ते सांगायला गेलं तर चिडचिड आणि भांडण हे ठरलेलं.
त्यानंतर यांना मी ‘बाहेर चला’ असं म्हणणंच सोडून दिलं.
दिनांक…..
माझी मुलगी दिपाली पाच वर्षांची झाली. माझ्याकडे आई आली होती. आम्ही दोघी गप्पा मारत बसलो होतो. दिपालीनं खाऊ खाताना जमिनीवर थोडा सांडला होता. हे अचानक घरी आले. सांडलेला खाऊ व पसरलेली खेळणी पाहून माझ्यावर खवळले. मी त्यांना सर्व आवरते म्हणेपर्यंत त्यांनी रागाने माझ्यावर हात उगारला. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले. मलाही अपमानीत झाल्याचा राग आला, मात्र तो मी गिळला. कारण त्यांचा राग गेल्यावर ते आपण केलेली कृती विसरुन गेलेले असतात. मी मात्र असे प्रसंग विसरु शकत नाही.
दिनांक…..
आज मी पडद्यासाठी कापड खरेदी करुन आले. ते पाहून हे खूप ओरडले. कुठलीही गोष्ट स्वतःच्या म्हणण्याप्रमाणेच व्हावी, असा यांचा अट्टाहास. मला घर सजवायला फार आवडायचं. पण काही खरेदी करुन आलं की, यांची टीका ठरलेली. माझी अक्कल काढणार. तुला दुकानदारानं फसवलं म्हणणार. इतकं झाल्यावर, मी पुन्हा काहीही खरेदी केलं नाही.
श्रीराम सुन्न होऊन डायरीची पाने एकामागून एक उलटत होता. प्रत्येक पानावर त्याच्याबद्दलच्या तक्रारीच लिहिलेल्या होत्या. त्याला आश्र्चर्य वाटले की, आपल्या वर्तनामुळे एवढी दुःखी असूनही जानकीने ही व्यथा कधी दर्शवली नाही.
श्रीरामला अपराध्यासारखं वाटू लागलं…
त्यानं आणखी एक पान उलटलं.. बहुतेक शेवटचेच….
दिनांक……
आज डावा हात खूप दुखतोय, यांना सांगून उपयोग नाही. दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणार. त्यापेक्षा मीच जाऊन येते. नाहीतरी हे आज बाहेरगावी निघालेच आहेत.
दिनांक……
काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आले. डाॅक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या. इसीजी मध्ये प्राॅब्लेम निघाला. ॲन्जिओग्राफी करायला सांगितली आहे.
यांना फोन लावला तर म्हणाले, ‘डाॅक्टर जे काही उपचार सांगतील, ते करुन घे.’ ॲन्जिओग्राफी केल्यावर खूप ब्लाॅकेजेस निघाले. डाॅक्टरांनी तात्काळ ओपन हार्ट सर्जरीची आवश्यकता असल्याचे सांगितले.
यांना घरी आल्यावर सांगायचं ठरवलं. व्हाॅटसअपवरुन गोळ्यांची नावं पाठवून त्या आणायला यांना सांगितले. ते येताना गोळ्या आणायला विसरले.
मला थकवा जाणवत होता. त्यांना म्हणाले, ‘तेवढी औषधं आणून देता का?’ ते माझ्यावरच खवळले, ‘तुलाच येताना आणायला काय झालं होतं?’ खूप चिडचिड केली.
मी म्हणाले, ‘ठीक आहे, मी उद्या आणीन.’ त्यावर त्यांनी विचारले, ‘काय म्हणाले डाॅक्टर?’ मी काही सांगितले नाही. गोळ्या आणायला एवढी चिडचिड, तर ऑपरेशनचे सांगितल्यावर थयथयाटच करणार. नाहीतरी आता जगून तरी काय करायचंय. मुलगी जावई सुखात आहेत. रोजच्या लहान सहान बाबींवरुन हे कटकट करणार. आता या सर्व गोष्टींना मी कंटाळले आहे.
हार्ट प्राॅब्लेम म्हणजे मरतानाही त्रास होणार नाही. शांतपणे मरता येईल. आता मी औषधच घेणार नाही…
डायरीचे ते शेवटचं पान होते…
श्रीरामने डायरी बंद केली. जानकीचा हा हार्ट ॲटॅक नसून आत्महत्या आहे, हे त्याला कळून चुकलं…आणि जानकीच्या मृत्यूला आपणच कारणीभूत आहोत हे जाणवल्यावर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले…
जानकी, माझं वागणं तुला पटत नव्हतं, तेव्हाच मला तू विरोध करायला हवा होता. मला वाटायचं आपण एकरुप आहोत, परंतु तुझं फक्त शरीर माझ्याबरोबर होतं आणि मन? ते तर कधीच जुळलं नाही.
का अशी वागलीस तू जानकी? कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिलीस तू मला? मी तुला समजू शकलो नाही, तू मला समजूनच घेतले नाही. मला वाटायचं, मी तुला माझा निर्णय सांगतोय आणि तुला तो पटतोय… तुझ्यावर लादतोय असं कधी वाटलं नाही…जानकी, एकदा तरी याबद्दल तू बोलायचं होतं गं…व्यक्त व्हायचं होतं… भांडलो असतो कदाचित… मला तुझं म्हणणं पटलंही असतं… नसतं पटलं तर निदान अपराधीपणाची भावना घेऊन मला जगावं तरी लागलं नसतं…
श्रीरामला जानकीची डायरी वाचून एकाएकी अस्वस्थ वाटू लागलं… आणि छातीत तीव्र कळ आल्यामुळे त्याच्या हातातून डायरी खाली पडली….
(अर्चना अनंत धवड यांच्या मूळ पोस्टवर आधारित)
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१६-९-२०.
Leave a Reply