मोबाईलमध्ये कॅमेरा आल्यापासून सेल्फी घेण्याचं फॅड सुरु झालं. पूर्वी आपला फोटो काढण्यासाठी दुसऱ्याला विनंती करावी लागायची. आता कॅमेराचा मोड बदलला की, आपण स्वतःचा फोटो काढू शकतो….
आज तर वर्षांचा अखेरचा दिवस, एकतीस डिसेंबर!! मी सहजच मोबाईलचा कॅमेरा सुरु केला आणि सेल्फी मोडवर स्वतःला पाहू लागलो. पाहतो तो काय.. जानेवारी पासूनचे डिसेंबरपर्यंतचे एकेक प्रसंग माझ्या चेहऱ्यामागील पार्श्र्वभूमीवर दिसू लागले….
जानेवारीचा पहिलाच दिवस होता. सकाळीच कोलते सर आॅफिसमध्ये आले. त्यांचं एक नवीन काम करायला घेतलं होतं. त्यांनी एक रक्कम हातावर ठेऊन वर्षातील ‘लक्ष्मीची’ पहिली आवक म्हणून ‘श्रीगणेशा’ केला.
कामांची सुरुवात तर झाली, मात्र कामांचं प्रमाण तसं कमीच होतं. फेब्रुवारी महिना सुरु झाला. बरेचदा मित्र मंडळी भेटायला यायची. गप्पा व्हायच्या. चहापाणी व्हायचं. बाहेरुन पहाणाऱ्याला वाटायचं, नावडकरांकडे कामं मोठ्या प्रमाणात चालली आहेत.
कधी माझा काॅलेजमधील मित्र, राजीव सायगांवकर यायचा. तास दोन तास गप्पा मारायचा. त्याच्या बॅंकेच्या नोकरीतील किस्से ऐकवायचा. मनात यायचं, हा मधल्या चाळीस वर्षांत संपर्कात का आला नाही?
कधी सदानंद साने, नष्टे आले की, चित्रपटसृष्टीतील घडामोडी कळायच्या. कधी रानडे सर काकूंसह आॅफिसमध्ये यायचे, गप्पा मारुन जायचे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच कामांचं प्रमाण कमी होतं. नाटक, चित्रपटांची कामं नव्हतीच. किरकोळ कामातून आॅफिसचं भाडं देखील निघत नव्हतं.
मार्च उजाडला. आर्थिक वर्षाची अखेर असणारा महिना. वर्तमानपत्रामधून कोरोना संसर्गाच्या बातम्या वाचनात येत होत्या. आतापर्यंत येऊन गेलेल्या साधारण रोगांप्रमाणेच हा कोरोना असेल, असं वाटलं होतं. मात्र परदेशात या कोरोनाने मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांचा आकडा बातम्यांमधून वाढू लागल्यावर सर्वांच्याच पाचावर धारण बसली.
२२ मार्च या माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच पंतप्रधानांनी संपूर्ण भारतात कर्फ्यू जाहीर केला. त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता भारतातील तमाम जनतेने थाळी वाजवून कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी एकजूट दाखवली.
पहिले लाॅकडाऊन सुरु झाले. घरातून कामाशिवाय बाहेर पडण्यावर बंदी आली. फक्त सकाळीच मास्क लावून एकदा बाहेर पडून जीवनावश्यक वस्तू घेऊन मी घरी परतू लागलो. आॅफिस तर बंदच होते.
सुरुवातीला साधारण आजार म्हणून कोरोनाविषयी भीती न वाटता महिन्याभरात तो जाईल असं वाटलं. मात्र परदेशातील मृतांची संख्या हजारावर गेल्यानंतर भारतातील संख्याही शेकड्याने वाढू लागली. व्हाॅटसअपवर, फेसबुकवर कोरोनाग्रस्तांची मनोगतं येऊ लागली. साधी सर्दी झाली तरी भीती वाटू लागली.
एप्रिल महिना लाॅकडाऊनमधेच गेला. मित्रांचे, नातेवाईकांशी फोनवरच बोलणे होऊ लागले. प्रत्येकजण काळजी घ्यायला सांगत होता. बसेस, एसटी बंद झाल्याने प्रवास ठप्प झाला होता. काहीजण लाॅकडाऊनमुळे परगावी अडकून पडले.
जे परराज्यातील कामगार होते, ते चालत, मिळेल त्या वहानाने गावी निघाले. त्यातील काही दुर्दैवाने अपघातात मृत्युमुखी पडले. जे गावी पोहोचले, त्यांना कोरोनाच्या भीतीने घरच्यांनी घरात घेण्यास स्पष्ट नकार दिला. याबाबतीत सोनू सूद या हिंदीतील अभिनेत्याने देवदूतासारखी अनेकांना घरी पोहोचविण्यासाठी मदत केली.
कित्येक दानशूरांनी आपल्या नावाची प्रसिद्धी न करता संकटातील जनतेची पोटापाण्याची व्यवस्था केली. शहरातील हाॅस्पिटलं कोरोना रुग्णांनी भरुन गेली. पोलीस, डाॅक्टर व नर्सेसना रात्रंदिवस काम करावे लागले.
सर्व प्रकारची काळजी घेऊनही रत्नाकर मतकरी, ऋषी कपूर, इरफान खान, बासु चटर्जी यांच्या सारख्या अनेक नामवंत व्यक्ती कोरोनाने गेल्या. परिचितांमधील मनोहर कुलकर्णी, सायगावकर, रवी पटवर्धन, कांचन नायक, दिनेश गोसावी, वसंत पंडित असे अनेकजण गेले, त्यांचे अंत्यदर्शनही घेता आले नाही.
मे, जून, जुलै, आॅगस्ट लाॅकडाऊन म्हणून घरातच बसून काढले. पावसाळा ऋतूही संपून गेला तरी कोरोना जाण्याचं नाव घेत नव्हता. गणपती आले. साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला गेला. नवरात्र, दसराही होऊन गेला.
दिवाळीसाठी माणसं घरातून बाहेर पडू लागली. तोंडावर जरी मास्क असला तरी मनात भीती होतीच. पीएमपीएल सुरु झाल्या. मी आॅफिसला जाण्यास सुरुवात केली. आॅफिसमध्ये येऊन बसत होतो, विशेष कुणी येत नव्हतं. संस्कृतीच्या दिवाळी अंकाचं काम मिळालं. ते केलं. मार्चनंतर केलेलं पहिलंच काम छान झालं. अंकाचं मुखपृष्ठ सर्वांना आवडलं.
मला मराठी भाषा अतिशय प्रिय आहे. मला लिहिण्याची आवड होतीच, कोरोनाच्या काळात मला सवड मिळाली. मार्चपासून आजपर्यंत मी मिळालेल्या वेळेत आठवणी लिहून काढल्या व फेसबुकवर लोड केल्या. कित्येक रसिकांना त्या अतिशय आवडल्या, अनेकांनी त्या आठवणींचं पुस्तक करा असा सल्ला दिला. लवकरच त्यातील काही निवडक आठवणींचं पुस्तक करण्याचा मानस आहे.
डिसेंबर सुरु झाला. माणसांची कोरोनाविषयीची भीती कमी होऊ लागली. डिसेंबर संपताना कोरोनाची नवी आवृत्ती ब्रिटनमधून आल्याच्या बातम्या वाचनात येऊ लागल्या. मात्र आता भारतीय जनता डगमगणारी राहिली नाही, कोणताही आजार आला तरी त्यावर मात करण्यासाठी त्यांच्याकडे जबरदस्त आत्मविश्वास निर्माण झालेला आहे.
आज तर हा ट्वेंटी ट्वेंटीच्या सामन्याचा शेवटचा दिवस आहे. या सामन्यातून आपण खूप काही शिकलो. पूर्वी ‘मास्क’ हा फक्त आॅपरेशन करताना डाॅक्टरच वापरायचे. गेले नऊ महिने व येणारे काही महिने आपण ‘मास्क’ वापरणारच आहोत. हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापरणे, इ. सारख्या काही चांगल्या सवयी या कोरोनाने आपल्यावर बिंबवल्या.
मी मोबाईलवर हा वर्षभराचा आढावा पहाताना मोबाईलची बॅटरी संपत आली. मी मोबाईल बंद केला आणि उद्यापासून सुरु होणाऱ्या २०२१च्या चार्जरला तो जोडला….
– सुरेश नावडकर ३१-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply