जन्म.२७ ऑगस्ट १९२७
भाऊ जोशी आणि मुकुंद गोखले यांनी मंगलकार्य व्यवस्थापनाच्या या व्यवसायाला १९६३ मध्ये सुरुवात केली. त्रिविक्रम उद्योगाची स्थापना विष्णू केशव जोशी उर्फ भाऊ जोशी व मुकुंद भास्कर गोखले उर्फ गोखले काका यांनी केली, हे दोघेही मुळचे या व्यवसायातले नव्हते. भाऊ जोशी यांचा श्रीखंड वडी बनवायचा कारखाना तसेच सुगंधी द्रव्य याचा व्यवसाय तर गोखले काका महानगर पालिकेत नोकरी करत होते. ती चालू असतानाच ते दोघे उद्यान मंगल कार्यालयाचे मामा थत्ते यांच्याकडे पाणी वाढायचे काम करीत असत, हे काम करत असताना कोणत्याही शुभसमारंभाचे दोन महत्वाचे भाग : भोजन हे रुचकर व संयोजन हे नीटनेटके झाले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात सतत बळावत होता. भाऊ जोशी व गोखले काका यांनी एकत्र येऊन त्यावेळी ५०\५० रुपये भांडवलावर “शुभसमारंभाचे संयोजक” या व्यवसायास सुरुवात केली. त्या काळाच्या प्रचलित पद्धती नुसार Catering Contractor हा शब्द न वापरता त्यांनी “शुभसमारंभाचे संयोजक” (Organizer) हा शब्द वापरला, याचे कारण एखाद्या कार्यक्रमाचे संयोजन करताना आपण ग्राहकाच्या जास्त जवळ येतो, त्यात आपुलकीचा भाग अधिक असतो, ग्राहकाचे काम आपुलकीने व निष्ठेने करण्याच्या या भावनेतून जोशी- गोखले “शुभसमारंभाचे संयोजक” या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. १९६५ सालापासून अप्पा बळवंत चौकातील ‘नूतन मराठी विद्यालय’, हे कार्यालय म्हणून मे महिन्याच्या लग्नसराईच्या काळात घेण्यास सुरुवात झाली. १९६५ ते १९९० या काळामध्ये नूतन मराठी बरोबरच पुण्यातल्या इतर कार्यालयात सुद्धा व्यवसायाचा योग आला. या सर्वच्या प्रयत्नाने १९९२ साली प्रथम “मित्रमंडळ सभागृह ” दीर्घ मुदतीसाठी कार्यालयाचे व्यवस्थापन जोशी- गोखले यांच्या कडे आले ते जून २०१७ पर्यत (२५ वर्षे) हे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने चालू होते.
मित्रमंडळ बरोबरच ज्ञानल मंगल कार्यालय, सोनल हॉल, सुवर्णस्मृती, ह्या सारख्या कार्यालयांमध्ये तसेच पुण्यात व पुण्याबाहेर बऱ्याच ठिकाणी कित्येक कुटुंबीयांचे आनंदाचे क्षण साजरे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या जोडगोळीने केला. श्री चे आशीर्वाद घरातील सर्वांचे संपूर्ण सहकार्य तसेच चांगला कर्मचारी वर्ग तसेच १९६३ ते २००९ या काळातील अथक परिश्रम या सर्वाच्या प्रयत्नातून” स्वत:ची वास्तू व्हावी ” हे जोशी -गोखले यांचे स्वप्न “सुपर्ण “च्या रूपाने २०१० मध्ये साकार झाले. तसेच अल्पावधीत लोकप्रिय ही झाले.
अधिक मासानिमित्ता” भागवत सप्ताह” रामचरित मानस, दरवर्षी महालक्ष्मी पूजन व गेले ३ वर्षे” दीपावली आनंदोत्सव” आरोग्य भारती सारखे समारंभ संपन्न होतात. भाऊ जोशी आणि मुकुंद गोखले यांचे मार्गदर्शन घेऊन आता जोशी – गोखले यांची युवा पिढी व्यवसायात उत्साहात कार्यरत आहे.
जोशी – गोखले यांची वाटचाल गेली ५७ वर्षे एकत्र सुरू होती.
भाऊ जोशी यांचे ०२ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply