नवीन लेखन...

आद्य कापड-कारखानदार विष्णु रामचंद्र वेलणकर म्हणजेच धनी वेलणकर

आद्य कापड-कारखानदार व दानशूर उद्योगपती विष्णु रामचंद्र वेलणकर म्हणजेच धनी वेलणकर यांचा जन्म ६ जानेवारी १८८७ रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला.

धनी वेलणकर यांना महाराष्ट्रातील आद्य कापड-कारखानदार व दानशूर उद्योगपती. यंत्रमागांचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जात असत. त्यांचे वडील रामचंद्रपंत मामलेदार कचेरीत नोकरीस होते. विष्णुपंतांचे प्राथमिक शिक्षण लिंब-गोवे (जि. सातारा) येथे, तर इंग्रजी सहावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, सातारा येथे झाले.

लोकमान्य टिळकांच्या स्वदेशीच्या चळवळीमुळे वेलणकरांना स्वतंत्र उद्योगधंदा काढण्याची स्फूर्ती लाभली. वयाच्या अठराव्या वर्षी कापड विणकामाचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना वडिलांनी बडोद्याच्या `कला-भुवन’ या संस्थेत घातले. पुढे कोलकात्याच्या `नॅशनल वीव्हिंग स्कूल’ मधून त्यांनी विणकामाचे प्रशिक्षण पूर्ण केले. निलजकर व खटाव या उद्योगप्रवर्तकांच्या बेळगाव येथील जपानी धर्तीचे हातमाग तयार करण्याच्या कारखान्यातून एक माग आणि रामबाग (बेळगाव) येथील दोडेकर या उद्योजकाने बनविलेला एक माग असे दोन माग खरेदी करून 1908 मध्ये लिंब येथे विष्णुपंतांनी विणकामाचा कारखाना काढला. लुगडी, धोतरे, सदऱ्याचे व कोटाचे कापड ते तयार करीत. पुढे धंद्यातील नुकसानीमुळे हातमाग बंद पडले. परिणामी विष्णुपंतांनी यंत्रमागात कौशल्य संपादन करण्यासाठी सोलापूर येथील नरसिंगगिरजी गिरणीत काही काळ नोकरी केली. सूत रंगविण्याची कला तसेच तेलावर चालणाऱ्या एंजिनांचे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले.

वेलणकरांनी विविधरंगी व लांब-रुंद पक्क्या रंगांच्या लुगड्यांचे उत्पादन सुरू केले. या लुगड्यांसाठी त्यांनी `पातळ’ हा शब्द रूढ केला. या उत्पादनाकरिता आवश्यक असलेली भांडवली रक्कम उभी करणे वेलणकरांच्या आवाक्यात नव्हते. त्यांनी ताणा तयार करण्यासाठी एक नवा मोठा लाकडी रूळ (बीम) शोधून काढला व त्यावर साध्या चात्यांच्या चौकटीवरून विशिष्ट प्रकारे ताणाभराई केली. यामुळे ताणाभराई (वॉर्पिंग) यंत्राची आवश्यकता उरली नाही. कांजी देण्याच्या साइझिंग यंत्राची गरज टाळण्यासाठी वेलणकरांनी दुहेरी सुताचा वापर केला. त्यामुळेच वेलणकरांना १९१२ मध्ये पुणे येथे तीन यंत्रमाग वापरून लहान कारखाना स्थापण्यात यश आले. परंतु १९१३ मधील बॅंकबुडीमुळे वेलणकरांकडे कर्जवसुलीचा तगादा सतत सुरु झाला. अशा प्रसंगी सांगलीच्या राजेसाहेबांनी वेलणकरांना सांगलीमध्ये उद्योग उभारण्याच्या अटीवर कर्जमुक्त केले. वेलणकरांनी महाराष्ट्रात यंत्रमाग उद्योग यशस्वी करून दाखविला. त्यामुळेच वेलणकरांना यंत्रमाग कारखान्यांचे आद्य जनक मानले जाते. १९१४ ते ४० या कालावधीत वेलणकरांनी यंत्रमागांची संख्या तीनशेपर्यंत वाढविली, तसेच त्यांनी १९४० मध्ये कापसापासून सूत काढण्याचा कारखानाही उभारला. गजानन मिल्समध्ये लुगडी, पातळे, धोतरजोड्या, पंचेजोडी इ. उत्पादने सातत्याने चाळीस वर्षे निघत होती. तथापि रंगीत कपड्यांऐवजी पांढऱ्या कपड्यांचे उत्पादन करण्याच्या शासकीय आदेशामुळे वेलणकरांना शेतकऱ्यांकरिता धोतरे, मांजरपाट कापड यांसारखे उत्पादन करणे भाग पडले.

वेलणकरांनी १९३५ साली जपानचा दौरा केला. त्यांनी तेथून रेयॉन कापड-उत्पादनाचे ८० माग आणले. नवीन यंत्रतंत्रे वापरून त्यांनी यशस्वी रीत्या रेयॉन कापडाचे उत्पादन सुरू केले, परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे १९४२ नंतर रेयॉन मिळणे कठीण झाल्याने वेलणकरानं सूत कातण्याच्या २,५०० चात्या एकदम फिरविणारे यंत्र बसवून भरपूर नफा मिळविला.
वेलणकरांनी आपल्या संपत्तीचा विनियोग समाजहितार्थ केला. वयाच्या एकसष्टाव्या वर्षी स्वतःची सुवर्णतुला करून सु. ६० किलो सोन्याच्या रकमेतून त्यांनी सहा प्रकारचे आर्थिक न्यास स्थापून विविध प्रकारचे मदतकार्य चालू केले. विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांना त्यांनी भरघोस अर्थसाहाय्य केले. म्हणूनच त्यांना `धनी वेलणकर’ या नावाने ओळखत असत.
महात्मा गांधींच्या हत्येनंतर वेलणकरांचा कारखाना जाळून टाकण्यात आला (१ फेब्रुवारी १९४८) तथापि त्या प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने वेलणकरांनी आपल्या सहकाऱ्यांचया कारखान्याची पुनर्उभारणी केली.

वेलणकरांनी स्वानुभवांच्या शिदोरीतून धार्मिक, सामाजिक व औद्योगिक विषयांवर एकूण चौदा पुस्तके लिहिली. जपानच्या प्रवासाची शिदोरी (१९३८), जगात वागावे कसे? (१९४७), यांत्रिक मागवाला (१९४५) ही त्यांपैकी काही उल्लेखनीय आहेत. कारखानदार कसा झालो (१९५०) हे त्यांचे विस्तृत आत्मचरित्र. सांगलीचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी त्यांना `उद्योगरत्न’ या पदवीने गौरविले. १९५३ पासून वेलणकरांचे पुत्र रामराव यांनी हा कारखाना सांभाळला. त्यांचा `जनता स्पिनिंग मिल्स’ सूत-उत्पादनाचा अद्ययावत कारखानाही आहे.

धनी वेलणकर यांचे सांगली येथे २१ एप्रिल १९७८ रोजी निधन झाले.

— देशपांडे, सु. चिं.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..