नवी मुंंबई! काही वर्षांपूर्वी उभी रहिलेली नगरी! हिच्या नावातच तिचं आर्थिक वैभव लपलेलं आहे. जसे मुंंबई समुद्रकिनार्यांसाठी, ठाणे शहर हे तलावांचे शहर, तशीच ही नगरी छोट्या-मोठ्या बगीच्यांसाठी प्रसिद्ध. ही नगरी अतिशय सुनियोजीत पद्धतीने बांधण्यात आलेली आहे आणि अशा या नगरीत जर नगरीची शोभा दुपटीने वाढवणारे नाट्यगृह जर नसेल तर नवलच! नगरीची शोभा वाढविणार्या त्या नाट्यगृहाचं नाव “विष्णुदास भावे नाट्यगृह”
संक्षिप्त इतिहास :
या नाट्यगृहाची स्थापना १३ मे १९९७ रोजी झाली. उद्घाटन सोहळा सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. उद्घाटनास तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी हजर होते व त्यांंच्याच शुभहस्ते वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. या नाट्यगृहात सर्वप्रथम राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्या “राशीचक्र” या कार्यक्रमाचा प्रयोग झाला होता.
ही वास्तू एकूण ५४७२.५० चौरस मीटर इतक्या भव्य जागेवर दिमाखाने उभी आहे. त्यातील ४२०० चौरस मीटर इतके क्षेत्र नाट्यगृहाच्या बांधकामासाठी वापरले गेले आहे. या वास्तूत एकावेळी साधारणत: १०० वाहनं उभी राहू शकतील इतकं भव्य वाहनतळ उपलब्ध आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करुन काही अंतर चालून आत आल्यावर प्रेक्षागृहाकडे जाताना उजव्या बाजूला एक तिकीट खिडकी आहे. नाट्यगृहाची आसन क्षमता १०३४ इतकी आहे. या नाट्यगृहाचा रंगमंच हा फिरता रंगमंच असून काही निवडकच नाट्यगृहात असा रंगमंच उपलब्ध आहे.
नाट्यगृहाच्या आवारात एक स्वच्छ उपहारगृह आहे. नाट्यगृहात ६ अद्ययावत ग्रीन रूम्स उपलब्ध आहेत. जर कलाकारांना नाट्यगृहात काही कारणास्तव निवास करावा लागला तर ६ कलाकार निवास नाट्यगृहात उपलब्ध आहेत.
आता गेल्या वर्षात या वास्तूचे नुतनीकरणाचे काम हाती घेतले होते व या वर्षात त्या वास्तूचे नुतनीकरण संपूर्णपणे झालेले असून आता नाट्यगृह अधिक सोयींनी अद्ययावत करण्यात आलेले आहे. या नुतनीकरणादरम्यान मराठी नाट्य निर्माता संघ व अ.भा.मराठी नाट्य परिषदेच्या पदाधिकर्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सुविधांची सोय करण्यात आलेली आहे. सध्या या नाट्यगृहात एक ७० मि.मी. चा पडदा उपलब्ध असून एक चित्रपट सहज दाखवू शकतो इतक्या क्षमतेचे एक चित्रपटप्रक्षेपणयंत्र (प्रोजेक्टर) उपलब्ध करण्यात आलेले आहे.
वास्तूत विशेष पहाण्यासारखे :
वास्तूत मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर विष्णुदास भावे यांचा अर्धाकृती पुतळा सगळ्यांचे लक्ष आकर्षून घेतल्याशिवाय रहात नाही. या पुतळ्याची विशेषता म्हणजे हा पुतळा त्यांच्या एका मूळ छायाचित्रावरून बनविण्यात आला. हे छायाचित्र सांंगलीवरुन म्हणजेच त्यांच्या मूळ गावावरुन मागविण्यात आले होते. या पुतळ्याचे शिल्पकार श्री. अजिंक्य चौलकर हे आहेत. त्यांंनी आपल्या कलाकौशल्याने त्या पुतळ्यालाही जिवंंत स्वरूप दिले आहे.
थोडेसे पुढे आल्यावर एक छोटा बगीच्याचे अस्तित्व आपल्याला खुणावू लागते. प्रेक्षागृहाकडे जाताना एका भिंतीवर नाटकातील नवरसांचे कोरलेले मुखवट्यांंचे शिल्प आपल्यासमोर ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार अभिनय करीत असल्याचे आपल्याला भासते. खाली लागूनच नटराजाची भव्य मुर्ती व त्या पाठीमागे असलेले काचेवरुन सरकणारे पाणी (जलपडदे) आपण प्रत्यक्षात शंभू महदेवाच्या जटांमधून गंगा वहात असताना पहात असल्याचा भास करुन देते. अखेरीस दुसर्या भिंतीवर असलेल्या निवडक ३५ नाट्यकर्मींच्या प्रतिमा आपल्या आवाज देत आहेत व त्या प्रतिमांच्या खाली लिहिलेली त्यांच्याबद्दलची संक्षिप्त माहिती ते स्वत:च सांंगत आहेत असं वाटतं.
अखेरीस फक्त एकच म्हणता येईल की, नवी मुंंबईमध्ये असलेल्या सांंस्कृतिक वैभवाचे दर्शन या नाट्यगृहात सर्वार्थाने होते व नवी मुंंबई म्हणजे “विष्णुदास भावे नाट्यगृह” व “विष्णुदास भावे नाट्यगृह” म्हणजेच “नवी मुंबई” असे उद्गार आपल्या तोंडून आल्याशिवाय रहाणार नाहीत.
पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी बस स्थानकासमोर,सेक्टर १६, वाशी – नवी मुंंबई – ४००७०३
संपर्क : ०२२ २७६६७८७९
— आदित्य दि. संभूस (कलाकार, दिग्दर्शक, लेखक)
Leave a Reply