धावपळीचे जीवन सारे,
मिळे न कुणा थोडी उसंत
विश्रांतीच्या मागे जाता,
दिसून येतो त्यातील अंत ।।१।।
चैतन्यमयी जीवन असूनी,
चक्रापरी ते गतीत राही
चक्र थांबता क्षणभर देखील,
मृत्यूची ते चाहूल पाही ।।२।।
थांबत नसते कधीही जीवन,
अंत ना होई केंव्हां त्याचा
निद्रा असो वा चीर निद्रा,
विश्रांती ही भास मनीचा ।।३।।
थकून जाई शरिर जेंव्हां,
प्रयत्न करि ते विश्रांतीचा
चैत्यन्य आत्मा देह सोडूनी,
घेई आसरा पुन्हा दुजाचा ।।४।।
आत्मा देखील थकून जाता,
परमात्म्याशी विलीन इच्छितो
चैतन्यातूनी विश्रांतीचा
‘मुक्ती’ मार्ग अखेरचा तो ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply