विश्व केवढे थोरले, मानव केवढासा बिंदू ,
तो तर केवळ एक थेंब
ब्रम्हांड सारे मोठा सिंधू ,–!!!
असे असता गर्व करी,
नको इतका अहंकार करी,
हातात नाही काही तरी,
उगीचच मिशीवर ताव मारी,–!!
मेंदू केवढा, बुद्धी केवढी,
आचार-विचार मात्र वेगळे, संस्कारांच्या नावाखाली,
पोकळ बढाया मारती सगळे,–!
हातात नाहीत पुढचे क्षण ,
काय घडेल त्याचा नेमच नाही, जन्मामुळे दुःखे भोगती,
म्हणत आता येऊ दे मरण,–!!!
जन्ममरणाचा फेरा चुकवत,
का कधी कोण आला – गेला,-?
प्रारब्धाच्या अगम्य चरकांत,
जो तो चिरडला गेला,
निघून जातो जीवनरस,
राहतात फक्त चिपाडे,
क्रूर केवढे नशीब म्हणावे,
त्याला पुन्हा चरकातूनच काढे,–!!
कसला अहम अन् कसली गुर्मी
साध्या जगण्याचीही नसे हमी, ज्याला त्याला अहंकार नासवी, माणसा जाण आपली कमी–!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply