ज्या साहित्यिकांनी आपल्या लेखनाद्वारे पूर्व-पश्चिम जोडण्याचे म्हणजेच विश्वबंधुत्व जपण्याचे कार्य केले. त्यामध्ये अमेरिकेची प्रसिद्ध लेखिका पर्ल बक (Pearl Buck) हिचे नाव अग्रभागी आहे.
पर्ल बक अमेरिकेत जन्मली, चीनमध्ये वाढली व आयुष्याच्या अखेरीस ती पुन्हा अमेरिकेत येऊन राहिली.
पर्ल बकचा जन्म २६ जून १८९२ रोजी अमेरिकेतील हिल्स बार येथे झाला. बालपणी तिचे नाव होते पर्ल सिंडेस्ट्रायकर. तिचे आई-वडील दोघेही चीनमध्ये अमेरिकी मिशनरींचे काम करीत होते. त्यामुळे पाच महिन्यांची असतानाच पर्ल त्यांच्याबरोबर चीनमध्ये गेली. यांगत्सी नदीवरील चिकियांग शहरात तिचे बालपण गेले. लहानपणापासूनच तिला साहित्याची फार आवड होती. वयाच्या सातव्या वर्षी तिने चार्ल्स डिकिन्सच्या रचना वाचायला सुरुवात केली. तिला सांभाळण्यासाठी ठेवलेल्या चिनी महिलेने तिला अनेक चिनी कथा सांगितल्या, त्यामुळे चिनी संस्कृतीबद्दल तिला साहजिकच ओढ निर्माण झाली होती. शांघाय येथील एका दैनिकात तिने लिहायला सुरुवात केली व वाचकांना तिचे लेखन आवडू लागले.
वयाच्या सतराव्या वर्षी पर्ल बक पुन्हा अमेरिकेत गेली, मात्र अमेरिकेतील अति मोकळे वातावरण तिला आवडले नाही. चीनची ओढ होतीच, त्यामुळे ती पुन्हा चीनमध्ये गेली. आपल्या आजारी आईची सेवा करीत असताना तिने उत्तर चीनमधील मका जनजीवनाचा अभ्यास केला व ‘ इन चायना टू ‘ हा लेख प्रसिद्ध केला. तो अतिशय गाजला. १९२६ साली पर्ल बकने ‘ ईस्ट विन्ड, वेस्ट विन्ड’ ही आपली पहिली कादंबरी लिहिली. ती १९३० मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर लिहिलेल्या ‘द गुड अर्थ’ कादंबरीला ‘पुलित्झर ‘ पुरस्कार मिळाल्यामुळे तिला आंतराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. पर्ल बकने एकूण १८ कादंबऱ्या व लहान मुलांसाठी २३ कथांची पुस्तके लिहिली.
१९३८ मध्ये तिला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. आयुष्याच्या अखेरीस आपल्या अमेरिकेतील वास्तव्यात तिने निराधार मुला-मुलींसाठी आश्रम सुरू केला व तेथे आलेल्या मुला-मुलींच्या आयुष्याला वेगळे वळण दिले.
Leave a Reply