माघ शुद्ध त्रयोदशीला विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. विश्वकर्मा यांची ओळख देवांचे आर्किटेक्ट म्हणजे वास्तूकला तज्ज्ञ म्हणून केली जाते. या दिनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. निर्मिती, बांधकाम, शिल्पकला, सोनेकाम करणाऱ्या व्यक्तींसाठी विश्वकर्मा जयंती महत्त्वाची मानली जाते. या दिवशी विश्वकर्मांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे विश्वकर्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
ब्रह्मदेवाच्या दक्षिण वक्ष भागातून विश्वकर्मा उत्पन्न झाला असे महाभारतात म्हटले आहे. सृष्टीच्या प्रारंभी केवळ हाच अस्तित्वात होता. प्रारंभी विश्वकर्मा हा सौरदेवतेची उपाधी म्हणून मानला जात होता, पण नंतरच्या काळात तो समस्त प्राणीसृष्टीचा जनक मानला गेला. एक वैदिक देवता असाही उल्लेख आढळतो. ऋग्वेदाच्या एका सुक्तात त्याला पृथ्वी, जल व सर्व प्राणी यांचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ देव म्हटले आहे. सर्व देवांचे नामकरणही यानेच केले. हा सर्वद्रष्टा असून, याला असंख्य मुखे, नेत्र, भुजा, पाय इत्यादी अवयव आणि पंखही होते, असे रूपवर्णन पौराणिक साहित्यात केले आहे. याला सर्वद्रष्टा प्रजापती / विधाता प्रजापती म्हटले आहे.
पुराणे व महाभारत यात विश्वकम्र्याला देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे. याने इंद्रासाठी इंद्रलोक निर्माण केला. सुतलनामक पाताळलोक यानेच निर्माण केला. श्रीकृष्णासाठी द्वारका नगरी, वृंदावन, राक्षसांसाठी लंका तसेच पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ ही नगरे यानेच निर्माण केली. एक विख्यात शिल्पशास्त्रकार या नात्याने गरूड भवनाची निर्मितीदेखील विश्वकर्मा यानेच केली. विश्वकर्मा वास्तुशास्त्र हा ग्रंथ विश्वकर्मा यांच्या नावावर आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply