नवीन लेखन...

९/९ विश्वास निवास

9/9 Vishwas Niwas

९/९, विश्वास निवास, परळ, मुंबई – १२ हा आमचा परळच्या घराचा पत्ता. आयुष्यातील पंचवीस वर्षे मी परळला काढली. जन्मल्यापासून म्हणजेच १९४९ सालापासून ते १९७४ पर्यंत. थोडक्यात माझं सर्व बालपण परळला गेलं. बालपण आणि तरुणपणातील काही सुरुवातीची वर्ष. आज साठीच्या दाराशी घुटमळत असतानाही मनात बालपणीच्या आठवणी टवटवीत

आहेत. परळ ओलांडून पुढे जाताना या सर्व आठवणी जागृत होतात. परळचा रस्तान् रस्ता, तिथल्या इमारती, तिथली गजबज सारं काही पुन्हा आठवतं. क्षणार्धात काळ तीसएक वर्ष मागे झेपावतो. मी पुन्हा परळचा होऊन जातो आणि परळ माझं.

विश्वास-निवास ही परळमधल्या अनेक चाळींपैकी एक चाळ. खरंतर या दोन चाळ. खरंतर या दोन चाळी होत्या आणि मध्ये एक चौक. आमची खोली पहिल्या मजल्यावरची. आमच्या खोलीला लागून दोन चाळींना जोडणारी मोठी गच्ची होती. गच्ची आठवली की लगेचच वडील आठवतात. गच्चीच्या कठड्यावर बसणारे. कठड्यावर बसलं की रस्त्यावरुन जाणारी माणसं दिसत. मग एखादा ओळखीचा माणूस दिसला की त्याला हाका मारुन वर बोलावणं आणि चहाचे घोट घेत गप्पा छाटणं हा वडिलांचा आवडता छंद. गच्चीचा आनंद माझ्या वडिलांनी पुरेपूर लुटला!

आमच्या चाळीत वेगवेगळ्या प्रांतातील कुटुंबे राहात असत. मुख्य वस्ती मराठी आणि गुजराथी कुटुंबांची. परंतु काही कोकणी, मद्रासी मंडळीही होती. समोरच्या चाळीतील पहिल्या मजल्यावर गोव्यातील ख्रिश्चन कुटुंब राहात असे. चाळीतील बहुतेक सर्वजण मराठीच बोलत. गुजराथी मंडळीदेखील स्पष्ट मराळी बोलत. भांडण होत ती देखील मराठीतूनच. नाही म्हणायला समोरच्या चाळीत एक गुजराथी मिस्त्री राहात असे. तो सकाळी उठून “जयोजयो मा जगदंबे” ही गुजराथी आरती मोठमोठ्याने म्हणत असे.

गांधी जयंती हा आमच्या चाळीत साजरा होणारा सर्वात मोठा सण! तब्बल तीन दिवस गांधी जयंतीचे कार्यक्रम चालत! मला वाटतं संपूर्ण भारतात हा एक रेकॉर्डच असावा! मुलांच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स, नाच, मोठ्यांनी बसवेललं नाटक, सारं काही सज्ज असे. तीनही दिवस गाणी ओकणारा लाऊडस्पिकर, झगमगीत दिवे, सजबलेलं स्टेज सारं काही थाटात होत असे. आमच्या चाळीत राहणार्‍या महिला मंडळाच्या एक कार्यकर्त्या आणि काही गुजराथी मंडळींचा या गांधी जयंतीत पुढाकार असे. आम्ही मुलं गांधी जयंतीच्या निमित्ताने मस्तपैकी हुदडून घेत असू. माझं स्टेजवरचं पदार्पण या गांधी जयंतीमधलंच. कुठलतरी गाणं मी सादर केलं होतं. आणि ते विसरल्यानंतर रडारडही झाली होती. नंतर मात्र चाळीतल्या वक्तृत्व स्पर्धे मधून मी अनेक बक्षिसं पटकावली. एकदा फॅन्सीड़्रेस मध्ये राजस्थानी वैदूबुवांची भूमिका मी साकारली होती. वैदूबुवांचे डायलॉग माझ्या वडिलांनीच लिहून दिले होते. “सुका कोकरु, ओला कोकरु, कमरमें कैच, वायूला औखाद, “असले काहीतरी भरमसाट डायलॉग मला वडिलांनी लिहून दिले होते आणि मीही ते अस्सल राजस्थानी ठेक्यात म्हणून दाखविले होते. या वैदूला चक्क पाहिलं पारितोषिक मिलालं होतं. धोतर नेसून मुडासे बांधलेला आणि काठीला औषधांची गोठडी घेऊन आरोळी ठोकणार्‍या त्या वैदूचा वडिलांनी खास स्टुडिओत नेऊन फोटोही काढून घेतला होता. तो फोटो मात्र पुढे कुठेतरी हरवला. वैदूचे डायलॉग मात्र स्मरणात अजूनही पक्के बसले आहेत.

चाळ आठवली की तिथली माणसंही आठवतात. आमच्या शेजारी राहणारा एक गिरणी कामगार रोज दारु पिऊन घरी येत असे आणि घरी आल्यावर घरातल्यांशी भांडण उरकून धिंगाणा घालीत असे. तसा या महाशयांचा शेजार्‍यांना कधीही त्रास होत नसे. कारण घरच्यांशी अरेरावी करणारा हा इसम शेजार्‍यांशी मात्र अगदी अदबीने वागत असे.

आम्हा मुलांची मात्र त्याच्याविषयी एक वेगळीच तक्रार होती. त्याकाळी बिनाका गीतमाला हा रेडिओवरला सर्वात लोकप्रिय कार्यक्रम, आणि संपूर्ण चाळीत रेडिओ फक्त नेमका त्या इसमाच्याच घरात ! दर बुधवारी आठ वाजता सुरु होणारी गीतमाला नऊ वाजता आठवड्याचं सर्वात लोकप्रिय गीत सादर करुन संपत असे. ते गीत कोणतं असेल याची आम्हाला अगदी उत्सुकता लागलेली असे आणि त्यावर आमच्या पैजाही लागलेल्या असत, आणि नेमकी पावणेनऊ वाजता त्या इसमाची आरोळी ठोकत एन्ट्री होत असे ! रेडिओभोवती घोळका करुन बसलेल्या आम्हा सर्व मुलांची तेव्हा पांगापांग होत असे. मनातल्या मनात चडफडत आम्ही त्या शेजार्‍यांच्या घरातून मग पळ काढत असू, पुढे आमच्याही घरी रेडिओ आला. केवळ आमच्याच नव्हे तर चाळीतील प्रत्येकाच्या घरी रेडिओ आला. परंतु स्वत:च्या घरी शांतपणे बिनाका गीतमाला ऐकण्यात कधी फारसं स्वारस्य वाटलंच नाही !

दारु पिऊन धिंगाणा घालणार्‍या शेजार्‍याप्रमाणेच चाळीत इतरही अनेक नग होते. आणखी एका शेजार्‍यांचा मोठा मुलगा चक्क देवळअतल्या चपला चोरीत असे. एकदा माझीच नवी कोरी चप्पल कोपर्‍यावरच्या दत्ताच्या देवळातून चोरीला गेली होती. त्या देवळात हा चप्पलचोर तळ ठोकून बसलेला असे. परंतु तिथे तो चपला चोरण्यासाठी बसतो हे मला बरंच उशिरा कळलं. सकाळी उठून कोपर्‍यावरल्या नळावर घसा खाकरुन खाकरुन दात साफ करणारा एक इसम, लंगड्या पायांनीही गोट्या खेळणारा तळमजल्यावरचा मुलगा, सबंध दिवस पाण्याच्या कळशा भरणारा तसर्‍या मजल्यावरचा वेडसर मुलगा, पाठीवर रफूच्या कपड्यांच ओझं वाहणारा शिंपी, अंगापिंडानं भरलेली ख्रिश्चन मुलगी ….. परळवरुन जाताना सारं काही स्पष्ट आठवतं …. सारी माणसं डोळ्यासमोर फेर धरु लागतात…… मी पुन्हा त्या गच्चीशेजारच्या खोलीत मुक्कामाला जाऊन पोहोचतो.

मुंबईत स्वत:चा ब्लॉक घेण्याची टूम निघाली, तेव्हा आम्हीही परळची खोली सोडून चेंबूरला ब्लॉकमध्ये राहायला आलो. या ब्लॉकमध्ये सर्व काही सोयी होत्या. स्वयंपाकाला वेगळीच खोली होती. निजायला बेडरुम होती, पाहुण्यांची उठबस करायला हॉल होता, मुख्य म्हणजे स्वतंत्र संडास बाथरुमची सोय होती आणि चोवीस तास धोधो वाहणारा नळही ! परळच्या खोलीच्या तुलनेत इथं बरंच काही होतं. अगदी स्वप्नवत वाटणारं ! परंतु खोलीच्या तुलनेत इथं बरंचकाही होतं. अगदी स्वप्नवत वाटणारं ! परंतु तरीही परळच्या चाळीतील छोट्याश्या खोलीत असणारं काहीतरी इथे कधीच सापडलं नाही. ते काहीतरी नक्की काय होतं याचा शोध अजूनही सुरुच आहे …..

— सुनिल रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..