अयोध्या नगरीचा अवघा आसमंत रंगीत दीप आणि दीपमालांनी प्रकाशमान झाला होता. आकाशातील द्वितीयेचा चंद्र आज जरा जास्तच तेजस्वी जाणवत होता. शरयूच्या तीरावरून येणाऱ्या सुखद गारव्यामुळं वातावरण प्रसन्न वाटत होतं.
सर्वत्र उभारलेल्या राहुट्यातून , मंदिरांच्या प्रांगणातून , शरयू नदीच्या किनाऱ्यावरून केवळ आणि केवळ राम धून ऐकू येत होती.
राम धून. रामकथा गायन. रामनामसंकीर्तन. टाळ , मृदंग , चिपळ्या , पखवाज , शंख , वीणा आणि अशाच स्वरूपाच्या वाद्यांचा स्वरमेळ सर्वत्र भरून राहिलेला होता. आल्हाददायक , मनमोहक आणि स्वर्गाहून रम्य वाटावं असं सगळं वातावरण.
सौधावरून ते विलक्षण वाटत होतं. अपूर्वाईचं. देवदुर्लभ. मोक्षदायक. दोन्ही हात छातीवर घेऊन प्रभुरामचंद्र सौधावर उभे होते. रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या नेत्रदीपक आसमंताकडे एकटक नजरेनं पाहत होते. अंगावरील उत्तरीय खाली गळून पडल्याचं भान त्यांना नव्हतं .
शेजारती झाली होती. शयनमंदिराकडे न येता सौधावर जाणाऱ्या श्रीरामांकडे जानकीदेवींचं लक्ष होतं. हे रोजचंच होतं .
गेली कित्येक संवत्सरं हे असंच चाललं होतं. शेजारती झाली की त्या लहानश्या झोपडीतून सूक्ष्मरूपानं बाहेर यायचं.
हनुमान गढीतील सौधावर यायचं आणि अवघ्या नगरजनांचं मंगल चिंतीत राहायचं. पुन्हा काकडआरतीला त्या लहान झोपडीत.गेली अनेक संवत्सरं.
परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरातून बाहेर आणून कुणीतरी प्रतिष्ठापना केली. जन्मस्थान मंदिराची मशीद झाली. पाचशे संवत्सरांचा संघर्ष झाला आणि भक्तांच्या संयमाचा बांध तुटल्यानंतर मशीदसुद्धा जमीनदोस्त झाली आणि मग नशिबी आले पुन्हा एकदा वनवासाचे भोग. असंख्य अडथळे. असंख्य सुरक्षारक्षक. सर्वत्र शस्त्रधारी. पुन्हा नव्याने लंकेतील विजनवास वाट्याला आला.तेव्हा आपण एकटीच होतो . आत्ता किमान , नाथ …
– जानकीदेवी भानावर आल्या.लगबगीनं प्रभुरामचंद्रांच्या जवळ गेल्या. सौधावर पडलेलं उत्तरीय , त्यांच्या अंगावर पांघरलं. त्यांच्या हातावर उष्ण अश्रू पडले. त्यांनी चमकून श्रीरामांकडे पाहिलं. ” नाथ , आपल्या डोळ्यात अश्रू ? आज खरं तर आनंदाचा दिवस . भव्य मंदिराच्या शुभारंभाचा दिवस . केवढा भव्यदिव्य आणि श्रद्धापूर्वक सोहळा झाला . आपण वनवास संपवून अयोध्येत आलो , तेव्हाची आठवण झाली मला . नगरजन किती आनंदले होते . सर्वत्र उत्साह होता . आजच्यासारखा दीपोत्सव त्यावेळी साजरा झाला होता . तसंच होमहवन , तसंच गायन , तसंच नर्तन , तसाच पुष्पवर्षाव . नगरजनांच्या उत्साहाला पारावार राहिला नव्हता . एकमेकांना मिष्टान्न देण्यात कुणीही मागं राहत नव्हतं . आणि आपणही सुखावलो होतो सर्व आप्तेष्ट बघून . आज तसंच वातावरण होतं , आहे मग आपल्या डोळ्यात अश्रू का ? ”
श्रीरामांनी डोळे टिपले आणि म्लान हसले.
” सीते , आनंद मलासुद्धा झाला . पुन्हा एकदा जन्मगृही यायला मिळणार , रामलल्ला म्हणून पुन्हा एकदा कोडकौतुक पुरवलं जाणार , शरयुतीरावर पुन्हा एकदा क्रीडा रंगणार . पूर्वीच्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होणार याचा आनंद आहेच , पण …”
ते क्षणभर थांबले. दीर्घ श्वास घेतला. काही काळ शांतता पसरली. जानकीदेवींना ती शांतता असह्य झाली. अशी शांतता म्हणजे श्रीरामांच्या मनातला कल्लोळ असतो हे त्यांना अनुभवानं माहीत झालं होतं.
अशावेळी आपण शांत राहायचं असतं , हेही ठाऊक होतं. तसंच झालं.अंगावरचं उत्तरीय अधिक लपेटून घेत प्रभुनी मौन सोडलं .
” सीते , मला माहीत आहे , आज प्रत्येक हिंदू कृतार्थ झाला असेल . कारण शतकानुशतकं प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार माझं जन्मगृह परकीयांच्या हातून मुक्त करण्यासाठी प्रयत्नरत होता . रामजन्मभूमीच्या संकल्पाचं उदक जुनी पिढी नव्या पिढीच्या हाती सोडत होती . त्यासाठी नव्यानं संघर्ष करीत होती . माझं अस्तित्व पुसण्यासाठी प्रचंड कारस्थानं करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर लढा उभारत होती . जनजागरण करीत होती . यात संघर्ष उभा राहिला होता . अनेकांवर अत्याचार झाले होते . रक्त सांडलं होतं .माझ्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्कारलं होतं . निर्दयी शासकांनी निर्घृणपणे अत्याचार करून वध करून , मृतदेहांची विटंबना करून, शरयूच्या पाण्यात कलेवरं फेकली होती . त्यावेळचं शरयूचं मूक दुःख मी पाहिलं होतं . कारसेवकांची उपासमार , फरपट , त्यांच्यावर रक्षकांनी केलेले अत्याचार , जाळलेले देह सगळं सगळं माझ्या डोळ्यासमोर येत होतं आज . तरीही जिद्द , निष्ठा , दुर्दम्य आशावाद , संस्कृती जपण्यासाठी चाललेला अव्याहत प्रयास यामुळं मी भारावून गेलो आहे . त्यामुळं डोळ्यात आनंदाश्रू आहेत आणि माझ्यासाठी कराव्या लागलेल्या पाचशे वर्षांच्या संघर्षाबद्दलचा सल सुद्धा मनात आहे . या सर्वांचा उतराई कसा होऊ तेच कळत नाही .”
पुन्हा एकदा शांतता .
” हा श्रद्धेचा अमूल्य ठेवा मी जपणार आहे , जानकी . त्यांना अपेक्षित असणाऱ्या रामराज्यासाठी मनोवांच्छित बळ देणार आहे . त्यांचे श्वास माझ्यासाठी फुलं असतील आणि त्यांचा उत्कर्ष माझं कर्तव्य असेल . बरोबर आहे ना ? यात मला तुझी , लक्ष्मणाची ,भरत , शत्रुघ्नची आणि हनुमंताची सुद्धा साथ लागणार आहे .”
जानकीदेवींनी मंद स्मित करीत होकार दिला .
सगळं वातावरण पुन्हा एकदा भारावल्यासारखं झालं .
सभोवतालची राम धून अधिक गोड वाटू लागली .
– मंदिरातील घंटानाद कानावर आला आणि श्रीराम जानकी लगबगीनं मंदिराकडे निघाले .
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६
Leave a Reply