विसरायचं म्हणलं तरी
मन अधिक भरकटत
किती आवरा मनाला
नको तिथं गुंतून जातं…
ओल्या आठवणी साऱ्या
कातरवेळी मनात तरळतात
डोळ्यांतील अलगद थेंब मग
पापणी आड जमा होतात…
आठवणींचं गाठोडं कस
अलगद हलकं करायचं ?
रित्या मनाला खोलवर
कस सावरुन घ्यायचं…
नको होतात मग रात्री
तुझी आठवण ती येता
हळवे होते मन त्या वेळी
रात्र सुनी अबोल होते तेव्हा…
वळणावर चालतांना मग
मन नक्कीच गुंतून जातं
सोडायच्या वाटा वळणावरील
तो मार्ग सहज सोप्पा नसतो…
भिजलेले मन हलकेच तुझ्या
मिठीतल्या आठवणीत रमते
मन गुंतत जाते अधिक तेव्हा
मनाचे खेळ न कोणास कळते…
आठवणींच्या उंच झरोक्यात
कवडसा ही निःशब्द होतो
दिसत नाही जखमा काही
पण काटा नक्कीच बोचतो…
तुझ्या मिठीच्या चांदण्यात
अलवार मी मोहक गंधाळते
तुला न कळले चांदणे ते
रेशमी धाग्यात मी गुंतले..
काहूर मोहाचे अंतरी उठता
तू नक्कीच मनात असतो
भावनेत मी बंदिस्त होते
अलवार तू हृदय अंगणी मोहरतो…
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply