काल “अम्मांचा ” ( माता अमृतानंदमयी माँ ) वाढदिवस आणि आज लताचा ! दोघींनी अवघ्या विश्वाला कवेत घेतलंय.
अम्मांच्या अमृतमिठीत सामावण्याचे भाग्य ज्यांना लाभलंय ( मी सुदैवी- आजतागायत त्यांनी मला ९-१० वेळा कुशीत घेतलंय. माझी पत्नी त्याहून भाग्यवान – तिने तर अम्मांचे मराठीतील पहिले चरित्र लिहिलंय, जे खुद्द अम्मांच्या हस्ते पुण्यात आणि मुंबईतही प्रकाशित झालंय.) तेच त्याचं महत्व सांगू शकतात आणि लताचा कार्यक्रम प्रेक्षागृहातून “लाईव्ह ” ऐकलेले कृतकृत्य श्रोते तिच्या सुरांची आकाशझेप अनुभवू शकतात. (याही बाबतीत आम्ही पती-पत्नी भाग्यवान आहोत.)
केरळच्या त्यांच्या आश्रमात बसून अम्मा सध्या सातत्याने ” श्रद्धा आणि प्रार्थना ” हे दोन उपाय सुचविताहेत या कोविड महामारीवर ! संत-महात्मे विश्वाच्या अव्याहत चक्रात हस्तक्षेप करीत नाहीत, फक्त आपल्या पायांत बळ देतात- साऱ्या संकटांना तोंड देण्याचे ! आणि हो, आपल्यासाठी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थनाही करीत असतात – आपल्या नकळत ! म्हणून तर माझ्यासारखे त्यांच्या कवचा आड गेले सात महिने निर्धास्त झोपू शकतात. ” अम्मा ” आहेत, एवढी समजूत / फुंकर डोळ्यांवर निर्धास्त निद्रा आणू शकते.
आणि लताच्या स्वरांच्या कुशीत तर अगणित वेळा डोळे मिटून पडलोय. रागदारी माहीत नसली तरी चालते, पंचम, गांधार, सप्तक इ शिकलो नसलो तरीही चालते, लताच्या आवाजात निश्चिन्तपणे विसावता येते. ती आहेच, एवढा दिलासा सर्वदूर तारून नेतो.
लता भारतीय संस्कृतीचा हिस्सा आहे, तर अम्मा विश्वव्यापी निसर्गाचे प्रतिनिधित्व करतात. लता आपल्या यशापयशाची, प्रेमाची, आनंदाची प्रतिकृती आहे तर आपल्या श्रद्धेला, भक्तीला, मनःशांतीला अम्मा सबळ बनवितात. जगातील सर्व मानसन्मानांच्या पलीकडे या दोघी पोहोचल्या आहेत.
आम्हां इंजिनिअर्सना ” PMM ” ( Perpetual Motion Machine) ही संकल्पना शिकविण्यात येते. अशी एखादी यंत्रणा /मशीन बनविता येईल कां, जेथे कोणत्याही प्रकारचे लॉसेस होणारच नाहीत आणि इनपुट =आउटपुट असेल. या प्रयत्नांत सारे अभियंते गुंतलेले आहेत. ही मग एक आदर्श यंत्रसामुग्री असेल.
परमेश्वर नामक संरचनाकाराने हे आधीच दृश्य स्वरूपात आपल्यापुढे ठेवलेले आहे असे मला वाटते.
अम्मा आणि लता या संकल्पनेचे मूर्त रूप आहे,
देव्हाऱ्यातल्या दैवतांची पूजा करायची असते, त्यांना शुभेच्छा द्यायच्या नसतात, असं माझा मित्र ” जयंत असनारे ” मानतो.
तेव्हा….
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply